आमचे मुख्यमंत्री -२५

यशवंतराव हे पट्टीचे रसिक होते. त्यांना चांगली पुस्तके जमविण्याचा व वाचण्याचा छंद होता. त्याच बरोबर नाटके, कलावंत, कलाक्षेत्र ह्यात त्यांना रस होता. त्याकरता त्यांनी जास्तीत जास्त सवलती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नाटकांवरील कर रद्द केला. नाट्यकर्मींना आर्थिक मदत देण्याकरता योजना आखल्या. खुल्या नाट्यगृहाची कल्पना प्रसृत केली. त्याचप्रमाणे साहित्यिकांना पुरस्कार आणि संगीत, नृत्य व नाट्यशाळा ह्यांना अनुदान सुरू केले.

थोडक्यात, त्यांचे प्रमुख ध्येय होते समाजाचे सर्वांगीण, बहुरंगी परिवर्तन करणे. एक विचारी, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्याकरता पोषक वातावरण निर्माण करणे व ते साध्य करण्याकरता सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, शेती व सांस्कृतिक क्षेत्राचा विकास करण्यास चालना देणे हा त्यांचा ध्यास होता.

सुदैवाने यशवंतरावांच्या स्वरुपात महाराष्ट्राला एक प्रभावी व द्रष्टे नेतृत्व मिळाले. महाराष्ट्राच्या विकासाची गंगा कोणत्या दिशेने वाहिली पाहिजे ह्याचा आराखडा त्यांनी पुढच्या पिढीला आपले धोरण व कृती यांच्या द्वारे देऊन महाराष्ट्राच्या सर्वंकष व विविधांगी विकासाच्या दिशा दाखवून दिल्या. – विठ्ठलराव पाटील.

यशवंतराव केंद्रीय मंत्री

चीनची भारतावर स्वारी आल्यानंतर श्री. कृष्ण मेनन यांच्या जागी यशवंतरावजी संरक्षण मंत्री झाले (२१-११-१९६२). परंतु थोड्या काळातच चीनने माघार घेतली. १९६७ साली ते नाशिक मतदार संघातून निवडून आले व केंद्रीय गृहमंत्री झाले. १९७० साली ते अर्थमंत्री झाले. १९७४ साली ते परराष्ट्रमंत्री झाले. ताश्कंदला लालबहादुर शास्त्रीजी गेले होते. त्यांच्याबरोबर यशवंतराही गेले होते. दुर्दैवाने ताश्कंदलाच शास्त्रीजींचे निधन झाले.

यशवंतराव विरोधीपक्ष नेते व उपपंतप्रधान

१९७७ साली कॉंग्रेसचा पराभव होऊन जनता पक्ष अधिकारारुढ झाला. कॉंग्रेसने यशवंतरावांना विरोधीपक्ष नेते म्हणून निवडले. पुढे जनता पक्ष फुटून श्री. चरणसिंग ह्यांचे मंत्रिमंडळ आले. त्यात यशवंतराव उपपंतप्रधान होते. परंतु चरणसिंगांचे मंत्रिमंडळ गेल्यावर यशवंतरावांना कोणतेच सत्तास्थान मिळाले नाही. एकूण त्यांची प्रतिमा संधिशोधू किंवा कुंपणावर बसणारा माणूस अशीच झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org