आमचे मुख्यमंत्री -१७

राजकारणातून निवृत्त

१९४८-५२ हा काळ बाळासाहेबांच्या कर्तबगारीचा उच्चबिंदू असला तरी ह्याच काळात त्यांच्यापुढे अनेक समस्या उभ्या होत्या. ब्रिटनचे पंतप्रधान अँटली ह्यांनी ३०-६-१९४६ रोजी ब्रिटनने भारत सोडण्याची घोषणा केली. मुस्लीम लीगने ह्याच वेळी प्रत्यक्ष कारवाईची घोषणा केली. ह्याच काळात भारतीय घटनेची जडणघडण होत होती. युध्द, जातीय दंगली, निर्वासितांचा प्रश्न, काळा बाजार, अन्नधान्याचा प्रश्न, चलनवाढ, नव्या भागांचा मुंबई इलाख्यात समावेश व ब्रिटिश अधिका-यांची निवृत्ती हे जटील प्रश्न होतेच. ह्याच काळात (३०-१-१९४८) महात्मा गांधींची हत्या झाली. ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ झाली.

अशा वेळी १९५० साली बाळासाहेबांना पहिला ह्रदयविकाराचा झटका आला व त्यानंतर त्यांनी प्रधानमंत्री म्हणून निवृत्त होण्याचे ठरविले. जरी श्री. मोरारजी देसाईंचा १९५२च्या निवडणुकीत त्यांचेच पुतणे अमुल देसाई ह्यांनी सुरतेस पराभव केला, तरी श्री. नेहरूंनी त्यांनांच मुख्यमंत्री करण्याचे ठरविले व त्याकरता विधानमंडळ कॉंग्रेस पक्षाच्या घटनेत बदल केला.

मुख्यमंत्री म्हणून निवृत्त झाल्यानंतर (२३-३-१९५२) एक वर्ष लंडनमध्ये हायकमिशनर होते. तेथून परत आल्यानंतर त्यांची शासकीय भाषा निगमाचे (Official Language Commission) अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. पुढे त्यांना कार्डिआक अस्थमाचा विकार झाला व जहांगिर नर्सिंग होममध्ये ८-३-१९५३ रोजी त्यांचे निधन झाले. बाळासाहेबांना पद्मभूषण हा किताब मिळाला होता.

मूल्यमापन
बाळासाहेब खेर हे पहिल्या दर्जाची विद्वत्ता असलेले गृहस्थ होते. ते एक उत्तम वक्ते होते. प्रभावी सामाजिक कार्यकर्ते, कायदेपंडित होते. स्वच्छ चारित्र्य, नैतिक मूल्यांवर निष्ठा, भ्रष्टाचारावद्दल घृणा हे त्यांचे गुण आजच्या काळात प्रामुख्याने उठावदार दिसतील. राजकारण त्यांनी कर्तव्यपूर्तीकरता स्वीकारले, स्वार्थाकरता नाही. त्यांनी अत्यंत निष्ठेने सर्व क्षेत्रांत कार्य केले. त्यांना मुंबई इलाख्याच्या विकासाची एक दृष्टी होती. म्हणून येथील विकासाच्या प्रमुख क्षेत्रांत त्यांनी जास्तीत जास्त कार्य केले. मग ते शिक्षण क्षेत्र असो, शेतक-यांचे प्रश्न असोत, आदिवासींचे प्रश्न असोत वा कामगारांचे प्रश्न असोत. अशा उंचीची व्यक्ती मुंबई इलाख्याला सुरुवातीच्या काळात मिळाली हे भाग्य. ती परंपरा, ती निष्ठा, तो प्रामाणिकपणा असलेली माणसे आता विरळ होत चालली आहेत ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. त्यांचे ध्येयवाक्य एकच होते.

नत्वेहम् कामये राज्यं (NA TWEHAMKAMAYE RAJYAM)
न स्वर्गम ना पुनर्भवम्। (NA SWARGAM NA PUNARBHAVAM)
कामये दुःखतप्तानाम् (KAMAYE DUKKHTAPTANAM)
प्राणिनाम आतिनाशनम्। (PRANINAM ARTINASHANAM)

“I do not desire kingdom nor heaven nor freedom from born again. I long for the eradication of all creatures who are afflicted with pains.”

संदर्भग्रंथः
कामत एम. व्ही – बी. जी. खेर १९८९
भारतीय विद्याभवन, मुंबई ४०० ००७.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org