आमचे मुख्यमंत्री -१६

मुंबईच्या लॉ कॉलेजचे सरकारी महाविद्यालयात रुपांतर करून कायद्याचे शिक्षण पूर्ण वेळ केले व पूर्ण वेळ प्राध्यापक नेमण्याची प्रथा पाडली. सिडनहॅम महाविद्यालयाच्या सध्याच्या इमारतीचे भूमीपूजन बाळासाहेबांच्या कारकिर्दीत झाले. (१९५२). पुणे, अहमदाबाद, मुंबई, धारवाड ह्या ठिकाणी तंत्र शिक्षणाकरता संचालनालये स्थापन केली. संस्कृत पाठशाळांना उदार हस्ते मदत केली. त्याचप्रमाणे सामाजिक व शासकीय दृष्टीने मागासलेल्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली. कान्हेरी नॅशनल पार्क स्थापून पशुपक्षांच्या अभ्यासाला उत्तेजन दिले. वरील गोष्टींशिवाय कला विद्यालयाची स्थापना, शारीरिक शिक्षणाची सोय, ग्रंथालय चळवळ, मुंबई मध्यवर्ती ग्रंथालयाची स्थापना व त्याची एशियाटीक ग्रंथालयाशी संलग्नता ह्या गोष्टीही बाळासाहेबांच्या कारकिर्दीत झाल्या.* राष्ट्रीय धोरणानुसार इंग्लिश हा विषय इयत्ता ८वी पासून निर्धारित केला. वैद्यकीय व्यवसाय व भारतीय शिक्षण पध्दतीला कायदा करून मान्यता दिली.(Regulated Medical Practices and Recognition of Indian System of Education) पुण्यास राष्ट्रीय संरक्षण संस्था (National Defence Academy) स्थापन करण्याकरता जागा दिली. राष्ट्रीय पुढा-याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांच्या जयंतीनिमित्त सुटी देण्यास सुरुवात केली.

बाळासाहेबांना कामगारांविषयी सहानुभूती होती. म्हणून कामगारांच्या संघटनेला बळ व स्थैर्य देण्याकरता मुंबई औद्योगिक संबंध कायदा (Bombay Industrial Disputes Act) पारित केला. ह्याच वेळी मध्यवर्ती सरकारने कारखाना कायदा (Factory Act 1948) केला. त्या कायद्यान्वये ५० किंवा जास्त मजूर असतील तर त्या ठिकाणी कामगार कल्याण अधिकारी नेमण्याची सक्ती झाली. तेव्हा इच्छुकांना हे शिक्षण देण्याकरता त्यांनी श्री. नंदांच्या सल्ल्याने महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेची १९४८ साली स्थापना केली.**

बाळासाहेबांना स्थानिक स्वराज्य संस्थांना भरीव भूमिका द्यावयाची होती. म्हणून त्यांनी स्थानिक स्वराज्यविषयक एक विधेयक कायदेमंडळात मांडले होते.

त्यांनी गुन्हेगारी जातीचा काळीमा काढून टाकला. हरिजनांना मंदिर प्रवेश मुक्त केला. खावटीकरता स्टोअर्स काढली. १९४८-४९ मध्ये सर्वोदय केंद्रे सुरू केली. निर्वासितांकरता उल्हासनगर वसविले. जंगल मक्तेदारांवर नियंत्रण आणण्याकरता त्यांनी जंगल कामगारांची सहकारी संस्था स्थापन केली. द्विभार्याप्रतिबंधक कायदा (Prevention of Polygamy) बाळासाहेबांच्या कारकिर्दीतच मान्य झाला.
------------------------------------------------------------------------
*एशियाटीक सोसायटीचा मी १९९९-२००२ पर्यंत माननीय अध्यक्ष होतो-डॉ. रायरीकर.

** ह्या संस्थेचा मी १९७०-७२ ह्या काळात संचालक होतो. – डॉ. रायरीकर.
----------------------------------------------------------------------
शेतकरी, कामगार, आदिवासी, स्त्रिया, शिक्षण ह्या विषयांसंबंधी त्यावेळी मान्य झालेल्या कायद्यांची संख्या पाहिली तर बाळासाहेबांची दूरदृष्टी व त्यांच्या प्रचंड कार्याची कल्पना येते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org