केशवरावांच्या कॉलेजचे लग्न करायचे आहे !
भाई केशवराव धोंडगे हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. १९५८ साली यशवंतराव द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना केशवरावांनी कंधार तालुक्यात श्री. शिवाजी मोफत विद्यालय सुरू करायचे ठरवले व या विद्यालयाच्या उदघाटनासाठी त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना बोलाविले. खरे तर शे. का. प. आणि काँग्रेस हे दोन पक्ष तेव्हा परस्परांचे कट्टर विरोधक होते. म्हणून केशवरावांच्या विद्यालयाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री येणार नाहीत असेच अनेकांना वाटत होते, पण यशवंतराव आले. स्वपक्षीयांच्या विरोधाला न जुमानता आले.
उदघाटन समारंभात आपले मनोगत व्यक्त करताना केशवराव म्हणाले ,' आज हे विद्यालय सुरू होतेय. पण एवढ्यावर मी समाधानी नाही. गोरगरीबांच्या आणि वाडी - तांड्यावरच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी शिवाजी महाविद्यालय सुरू करण्याचा माझा निर्धार आहे. आधी लग्न करेन ते शिवाजी महाविद्यालयाचे, नंतर माझे. ' ही जगावेगळी प्रतिज्ञा ऐकून यशवंतराव स्तब्ध झाले. केशवरावांच्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, ' केशवराव, तुमच्या या महाविद्यालयासाठी मी सुद्धा हातात झोळी घेऊन फिरेन.' त्यानंतर काही महिन्यांनी यशवंतराव नांदेडच्या दौ-यावर गेले होते. त्यांना केशवरावांची प्रतिज्ञा आठवली. त्यांनी नांदेडच्या विश्रामगृहावर केशवरावांना बोलावून घेतले. केशवराव गेले. यशवंतरावांबरोबर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक होते. यशवंतराव त्यांना म्हणाले, ' केशवरावांच्या कॉलेजचे लग्न करायचे आहे. ' केवळ असे म्हणून न थांबता , त्यांनी कॉलेजला मंजुरी मिळवून दिली. १६ जून १९५९ रोजी शिवाजी कॉलेज सुरू झाले व १५ ऑगस्ट १९६३ रोजी केशवरावांनी लग्न केले. केशवरावांसारखे झपाटलेले शिक्षण प्रसारक व यशवंतरावांसारखे खंबीर नेतृत्व लाभल्यामुळेच महाराष्ट्राच्या शिक्षणाची ' यत्ता ' उंचावली , हा इतिहास आहे.