ममईतलं पगारपाणी पुरते ना ?
यशवंताने खूप शिकून मामलेदार व्हावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्या माऊलीच्या दृष्टीने ' मामलेदार ' हेच जगातील सर्वोच्च पद होते पण यशवंतराव राजकारणात ओढले गेले. तरुणपणी तुरुंगात गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते सत्तेत सहभागी झाले. संसदीय सचिव, पुरवठा मंत्री व शेवटी मुख्यमंत्री झाले. ही पदोन्नती व त्यांचे महत्त्व विठामातेला समजणे अशक्य होते.
मुख्यमंत्री असताना एकदा यशवंतराव कराडच्या घरी आले होते. साहजिकच त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले. यशवंतरावही सर्वांशी आपुलकीने बोलत होते. त्यांच्या समस्या जाणून घेत होते. इतके सगळे लोक पहिल्यांदाच घरी आल्यामुळे विठामाता अस्वस्थ झाल्या. त्यांनी यशवंतरावांना जवळ बोलावले. यशवंतराव आज्ञाधारकपणे आईजवळ गेले. मग विठामाता हळूच म्हणाल्या, ' अरे, एवढी माणसं जमवतोस ? आन् त्यांना चहापाणी करीत बसतोस. इतके पैसे हाईत का तुझ्याकडं ? ममईतलं पगारपाणी पुरते ना ?'
यशवंतरावांना हसू फुटले, पण आईची काळजी खरी होती. ते म्हणाले, ' आई, ही सगळी कामाची माणसे आहेत.'
मग विठामातेचे समाधान झाले. इतके सगळे लोक आपल्या मुलाला मानतात, त्याचे ऐकतात याचा त्यांना अभिमान वाटला.