नात्यापेक्षा तत्त्व मोठे
यशवंताचे थोरले बंधू गणपतराव यांनाही राजकीय घडामोडींमध्ये रस होता. त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचा विशेष प्रभाव होता. कराडमध्ये कळंबे गुरूजी सत्यशोधक समाजाचे काम करीत होते. गणपतराव त्यांचे शिष्य बनले. यशवंतानेही आपल्याबरोबर सत्यशोधक समाजाचे काम करावे अशी गणपतरावांची इच्छा होती. त्यांनी अनेकवेळा यशवंताचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण यशवंताचा पिंडच वेगळा होता. आपला थोरला भाऊ सांगतोय म्हणून त्याचे ऐकायचे व त्याप्रमाणे वागायचे हा त्यांचा स्वभाव नव्हता. स्वत: अनुभव घ्यायचे आणि त्या आधारे स्वत:चे स्वतंत्र निष्कर्ष काढायचे ही यशवंताची पद्धत होती.
त्या पद्धतीनुसार सत्यशोधक समाजाचे कार्यंकर्ते टोकाची भूमिका घेत आहेत आणि काँग्रेस मध्यममार्गी आहे असे त्याला वाटले म्हणून त्याने मनोमन काँग्रेसची निवड केली होती. एकदा गणपतराव कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले. काँग्रेसने त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला. यशवंताला मोठा पेच पडला. इकडे भाऊ आणि तिकडे पक्ष. कोणाची निवड करायची ? कोणाचा प्रचार करायचा ? यशवंताला मोठे कोडे पडले. पण शेवटी त्याने निर्णय घेतला- काँग्रेस पक्षाचे काम करायचे. आणि मनावर दगड ठेवून त्या निवडणुकीत यशवंताने काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला. मतदान झाले, निकाल लागला. गणपतराव पराभूत झाले. यशवंताच्या पक्षाचा उमेदवार जिंकला, पण यशवंताला आनंद झाला नाही. आपल्या बंधूच्या पराभवाला आपणही काही प्रमाणात जबाबदार या भावनेने त्याला अपार यातना झाल्या. विमनस्क अवस्थेत तो गावाबाहेर जाऊन एकटाच शोक करीत बसला. अंधार पडला तरी त्याला घरी जावेसे वाटेना. शेवटी गणपतराव त्याला शोधत आले. म्हणाले, ' वाईट वाटून घेऊ नकोस, तुझे काही चुकले नाही. नात्यांपेक्षा तत्त्वे महत्त्वाची असतात.'
आणि मग दोघे भाऊ घराकडे निघाले.