पंढरपूर येथील माझे श्वशुर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विधिज्ञ मा. अॅड. श्री वामनराव माने हे यशवंतरावांचे निस्सिम चाहते आहेत . स्व. चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊनच गेली चाळीसहून अधिक वर्षे ते सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मला सुरूवातीपासून लाभले. मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. माझे पीएच. डी . चे मार्गदर्शक डॉ. पी. एम. पाटील सर यांनी मला माझे संशोधन चालू असतानाही या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रोत्साहन दिले. ' एकवेळ संशोधन थोडे रखडले तरी चालेल ; पण महाराष्ट्रातील उगवत्या पिढीला प्रेरणा देणारे हे पुस्तक लवकरात लवकर लिहा ' अशी आदेशवजा प्रेमळ सूचना त्यांनी मला दिल्याने मला खूप आधार वाटला. त्यांचे मी मन: पूर्वक आभार व्यक्त करतो.
माझी आई श्रीमती कांताबाई लोखंडे, पत्नी सौ. प्रतिभा, बंधू अंकुश व त्याची पत्नी सौ. वनिता तसेच सौ. लतिका व श्री. मिलिंद गडदे या माझ्या परिवारातील सदस्यांचे ऋण शब्दातीत आहेत. त्यांच्या निरपेक्ष सहकार्यामुळेच मी हे कार्य करू शकलो. शेवटी या ग्रंथाच्या निर्मितीप्रक्रियेत ज्यांची बहुमोल मदत झाली त्या सर्वांचे मी आभार मानतो.
हा ग्रंथ परिपूर्ण आहे असा माझा मुळीच दावा नाही. स्व. यशवंतरावांच्या बहुआयामी जीवनातील इतर अनेक प्रसंगांची भर यात टाकता येईल याची मला विनम्र जाणीव आहे. या संदर्भात सर्व रसिक वाचकांकडून येणा-या सूचनांचे मी स्वागत करतो. या पुस्तकात समाविष्ट होऊ शकेल अशी एखादी अप्रकाशित आठवण आपणाकडे असेल तर कृपया ती लिखित स्वरूपात पाठवावी. या निमित्ताने तुम्ही व मी मिळून हा ग्रंथ अधिक समृद्ध करूया. स्व. चव्हाणसाहेब यांच्यासारखे दृष्टे व युगप्रवर्तक नेतृत्व पुन:पुन्हा जन्माला येत नसते. पण त्यांच्या विचारांचा व कार्याचा जागर होत रहावा यासाठी त्यांच्या आठवणींचा नंदादीप सतत तेवता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.
महाराष्ट्राच्या या थोर शिल्पकाराच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून ही कथापुष्पे मी आपल्या हाती सोपवितो. धन्यवाद !
प्रा. नवनाथ लोखंडे