मला कॉलेज जीवनाची आठवण झाली... !
समयसूचकता हे यशवंतरावांच्या वक्तृत्वाचे खास वैशिष्ट्य होते. या एका गुणाच्या बळावर त्यांनी कित्येक सभा जिंकल्या. भाषणाच्या पहिल्या एक दोन वाक्यातच श्रोत्यांना ताब्यात घेणा-या महान वक्त्यांपैकी ते एक होते. सोलापूर शहरात एकदा त्यांना असेच कसोटीचे भाषण करावे लागले. शहरातील दयानंद कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते गेले होते. यशवंतरावांचे भाषण ऐकायचे नाही, असे काही टारगट विद्यार्थ्यांनी ठरवले. प्रास्ताविकानंतर यशवंतराव भाषणासाठी उठले आणि विद्यार्थ्यांमधून शिट्टयांनी व कर्कश्श आवाजाने सभागृह दणाणून गेले होते. जवळपास पाच मिनिटे हा प्रकार चालू होता. यशवंतराव मात्र गालातल्या गालात हसत माईकसमोर उभे होते. आवाज कमी झाल्यावर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीलाच ते म्हणाले, ' विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता जे काही केले त्यामुळे मला माझ्या कॉलेज जीवनाची आठवण झाली. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो , की तुम्ही आता जो दंगा केलात त्यापेक्षा दहापटींनी अधिक दंगा आम्ही केला होता.'
या वाक्यावर प्रचंड टाळ्यांचा गजर झाला आणि विद्यार्थ्यांनी यशवंतरावांचे पुढचे सगळे भाषण शांतपणे ऐकून घेतले.