कथारुप यशवंतराव- रोपट्याचाच महावृक्ष होतो !

रोपट्याचाच महावृक्ष होतो !

साता-यातील ज्येष्ठ विचारवंत प्रा. संभाजीराव पाटणे यांनी सांगितलेली ही आठवण  ! ते १९५६ साल होते. यशवंतराव मुंबई राज्याचे पुरवठामंत्री होते, तेव्हा वाई येथील काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महर्षि विठ्ठल रामजी शिंदे विद्यालय सुरू करण्याचे ठरविले. या विद्यालयाचे उदघाटन यशवंतरावांच्या हस्ते व्हावे अशी सर्वांचीच इच्छा होती. उदघाटनसाठीचे निमंत्रण देण्यासाठी ही सर्व मंडळी जेव्हा यशवंतरावांकडे गेली तेंव्हा त्यांनी अतिशय आनंदाने होकार दिला. एकतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे उदघाटन करणे यशवंतरावांना आवडत असे. कारण भावी पिढ्यांना आकार देण्याचे कार्य अशा ठिकाणी घडत असते अशी त्यांची श्रद्धा होती, आणि त्यातही महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावानं सुरू होणा-या शाळेचे उदघाटन करणे हा मोठा सन्मान आहे असे त्यांना वाटले. कारण त्यांच्या लहानपणी कराडात सुरू केलेल्या अस्पृश्य मुलांच्या शाळेच्या उदघाटनासाठी यशवंतरावांनी खुद्द महर्षि शिंदेनाच बोलावले होते. महर्षिंविषयी त्यांना नितांत आदर होता.

या सर्व पार्श्वभूमीवर यशवंतराव ११ मे १९५६ रोजी उदघाटनसाठी वाईत आले. जेमतेम चार - पाच खोल्यांची इमारत होती. त्यातल्याच एका खोलीला रिबीन बांधली होती. संभाजीराव पाटणे हे यशवंतरावांच्या बाजूलाच उभे होते. त्यांनी रिबीन कापल्यावर संभाजीराव म्हणाले, ' शाळा तशी खूपच लहान आहे. '

यावर हसून यशवंतराव म्हणाले, ' रोपट्याचाच पुढे महावृक्ष होतो  !'


यशवंतरावांचे हे भाकित तंतोतंत खरे ठरले. केवळ पंधरा-वीस विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या या शाळेत आज दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. यशवंतरावांचे बोलणे हे असे द्रष्टेपणाचे असे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org