आज मला कृतार्थ वाटते !
१९५६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. बाबासाहेबांच्या धर्मांतराने देश ढवळून निघाला. पूर्वाश्रमीचे अस्पृश्य महार आता बौद्ध बनले. त्यांनी हिंदू धर्माशी असलेले संबंध तोडले. भारतीय घटनेने अनुसूचित जातींच्या विकासासाठी आरक्षण व इतरही अनेक सवलती बहाल केल्या होत्या. साहेब मुख्यमंत्री असताना घटनेनुसार मागासवर्गीयांना अनुसूचित जाती म्हणून मिळणा-या सवलती चालू ठेवायच्या, की बंद करायच्या असा प्रश्न मंत्रीमंडळासमोर चर्चेला आला.
घटनेनुसार सरकारवर तसे बंधन नव्हते. बाबासाहेबांचा काँग्रेसविरोध सर्वश्रुत होता व धर्मांतरामुळे मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याविषयी खूप नाराजी होती. त्यामुळे सवलती चालू ठेवण्याच्या मुद्यावर कडाक्याची चर्चा झाली. मंत्रिमंडळातील सदस्यांची मते आजमावण्यात आली, तेव्हा बहुसंख्य सदस्य सवलती चालू ठेवण्याच्या विरोधात आहेत असे दिसून आले. स्वत: साहेब आणि मधुकरराव चौधरींसारखे इतर दोन मंत्रीच फक्त सवलती चालू ठेवाव्यात या मताचे होते. कारण धर्म बदलला म्हणून मागासलेपणा जात नाही व कायदेशीर बंधन नसले तरी नैतिकदृष्ट्या सवलती चालू ठेवणे गरजेचे आहे अशी या चौघांची भूमिका होती. पण फक्त चौघांना असे वाटून काय उपयोग ? या मुद्यावर मुख्यमंत्रीच अल्पमतात आले होते. असा विचित्र प्रसंग प्रथमच निर्माण झाला होता. साहेब खूप दु:खी झाले. त्यांनी अतिशय कळवळून बाजू मांडली. शेवटी बरीच चर्चा होऊन हा विषय तहकूब ठेवण्यात आला व मुख्यमंत्र्यांनी याबाबत पंतप्रधान पं. नेहरुंशी चर्चा करावी असे ठरले.
यशवंतरावांनी पंडितजींशी चर्चा करुन होकार मिळविला व त्या चर्चेचा वृत्तांत दुस-या बैठकीत त्यांनी मंत्रिमंडळाला सांगितला. अखेर नवबौद्धांना अनुसूचित जातीसाठीच्या सवलती चालू ठेवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ती बैठक संपल्यावर यशवंतराव समाधानाने त्यांच्या सहका-याला म्हणाले, ' आज मला कृतार्थ वाटते !