कथारुप यशवंतराव- प्रामाणिकपणाची मीठभाकरी

प्रामाणिकपणाची मीठभाकरी

सन १९५७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर यशवंतराव पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांचे भाचे श्री . बाबुराव कोतवाल हे बाळासाहेब देसाईंचे स्वीय सहाय्यक होते. बाळासाहेब तेव्हा दळणवळण, सिंचन व ऊर्जा या खात्यांचे मंत्री होते. बाबुरावांनी स्वातंत्र्यचळवळीत केलेले काम बाळासाहेबांना माहित होते, म्हणून त्यांनी कोतवालांची निवड केली होती. बाबुराव यशवंतरावांच्या ' सह्याद्री ' बंगल्यावर राहू लागले. कामाच्या निमित्ताने बाबुरावांना दररोज अनेक क्षेत्रांतील व वेगवेगळ्या पक्षातील लोक भेटत असत. ते त्यांच्याशी विशेष सलगीने व आपुलकीने वागू लागले. रोज रात्री घरी गेल्यावर यशवंतराव बाबुरावांची आवर्जून चौकशी करायचे.

असेच एकदा रात्रीच्या वेळी सर्वजण जेवण करीत असताना जवळच असलेल्या बाबुरावांना उद्देशून यशवंतराव म्हणाले, ' बाबुराव, बरेच दिवस बोलेन बोलेन म्हणत होतो, तो योग आज आलाय. तू एका जबरदस्त मंत्र्याचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करतो आहेस. तुमच्याकडे महत्त्वाची खाती आहेत. तू माझा भाचा आहेस हे अनेकांना माहित आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेव. तुझ्या ऑफिसमध्ये आणि ऑफिसबाहेरही अनेक लोक तुला भेटायला येतील, गोड बोलतील, हॉटेलमधे नेऊन लालूच दाखवतील, पैशाचे अमीष दाखवतील. पण तू अतिशय सावध राहिले पाहिजेस. काहीही झाले तरी तू अशा प्रलोभनाला भुलू नकोस. कारण तू फसलास की माझे नाक कापले जाईल. जी आपली प्रामाणिकपणाची मीठभाकरी आहे त्यातच खरे सुख आहे. आपल्याला तूप- साखरेची चोरी नको. सावध रहा....  ! '

मामाचा हा कानमंत्र बाबुरावांना खूप उपयोगी पडला. आपल्या सर्व कारकिर्दीत त्यांनी यशवंतरावांना वाईट वाटेल किंवा कमीपणा येईल असे काहीही केले नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org