कथारुप यशवंतराव- दादांदा मला मत देण्यास सांगा !

दादांदा मला मत देण्यास सांगा !

सन १९५७ साली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन तेव्हा ऐन भरात आले होते. शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस पक्षासमोर कडवे आव्हान उभे केले होते. विधानसभेची निवडणूक लढविण्याची यशवंतरावांची ही तिसरी वेळ होती. पण आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने अर्थातच ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. कराड विधानसभा मतदार संघातून यशवंतरावांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाने केशवराव पवार यांना उमेदवारी दिली. दोन्ही उमेदवारांचे प्रचारदौरे सुरू झाले. यशवंतराव आणि केशवराव दोघेही कराडमधील शुक्रवार पेठेत राहत होते. एकेदिवशी यशवंतरावांनी शुक्रवार पेठेतील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी पदयात्रा काढली. पेठेतील प्रत्येक घरात जाऊन ते मतदारांना मत देण्याची विनंती करीत होते. काही अंतर चाचलल्यावर पदयात्रा केशवरावांच्या घराजवळ आली. कार्यकर्त्यांना वाटले यशवंतराव केशवरावांचे घर ओलांडून पुढे जातील. विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या घरात प्रचार कोण करेल ? पण यशवंतराव अपवाद होते. ते केशवरावांच्या घराकडे वळले. कार्यकर्ते अवाक् झाले. दरवाजा बंद होता. यशवंतरावांनी दरवाजावर टकटक केली. केशवराव प्रचारासाठी सकाळीच घराबाहेर पडले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने दार उघडले. दारात यशवंतरावांना पाहून त्याही अचंबित झाल्या. ' केशवराव दादा घरी नाहीत का ?' यशवंतरावांनी विचारले.

' तुमच्यासारखेच तेही प्रचाराला बाहेर पडलेत.' वहिनींनी खुलासा केला.

' ठीक आहे. उद्याच्या निवडणुकीसाठी मी उभा आहे. तुम्ही तुमचे बहुमोल मत मला द्यावे अशी विनंती करण्यासाठी मी आलो आहे. दादा घरी आल्यावर त्यांनाही मला मत द्यायला सांगा. विसरू नका.' या जगावेगळ्या प्रचारनीतीने वहिनी थक्क झाल्या. त्यांनी यशवंतरावांना चहा घेण्याची विनंती केली. यशवंतराव थांबले. चहा घेतला आणि पुन्हा एकदा मत देण्याविषयी विनंती करून बाहेर पडले. कार्यकर्त्यांबरोबर चालू लागले.

खिलाडूवृत्तीचा राजकारणी कसा असावा याचे प्रात्यक्षिकच आज कार्यकर्त्यांना पहायला मिळाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org