ते मुख्यमंत्री आणि हे मुख्यमंत्री !
यशवंतरावांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभीच मोरारजी देसाई यांच्यासारख्या अनुभवी व निष्णात व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. गृहखात्याचे उपमंत्री म्हणून काम करताना यशवंतरावांना मोरारजींकडून खूप काही शिकायला मिळाले. असे असले तरी मोरारजींचा हट्टी व हेकेखोर स्वभाव मात्र यशवंतरावांनी स्वत:मध्ये येऊ दिला नाही. मोरारजींना माणसांपेक्षा तत्त्वे अधिक प्रिय होती, तर तत्त्वे ही शेवटी माणसांसाठीच असतात अशी यशवंतरावांची धारणा होती. म्हणूनच मोरारजींनी निदर्शकांवर गोळीबार केला तर यशवंतरावांनी चातुर्याने समस्या सोडविल्या.
या दोन मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तिमत्वातील फरक दर्शविणारा हा एक प्रसंग. एकदा एका प्रसिद्ध पत्रकाराने मुख्यमंत्री मोरारजी देसाईंना भेटण्यासाठी वेळ मागितली. मोरारजींनी वेळ दिली, पण तो पत्रकार ठरलेल्या वेळी येऊ शकला नाही. मोरारजी भडकले. त्यानंतर त्या पत्रकाराने अनेकदा भेटण्यासाठी वेळ मागितली, पण मोरारजी उत्तर द्यायलाही तयार नव्हते. अखेर त्या पत्रकाराने एक सविस्तर पत्र लिहून एका अनपेक्षित अडचणीमुळे आपण येऊ शकलो नाही असे सांगून माफी मागितली तेव्हा कुठे मोरारजींनी त्याला भेटीची वेळ दिली. अर्थात ही मुलाखतही ' थंड ' च होती.
असाच प्रसंग मुख्यमंत्री यशवंतरावांच्या बाबतीत घडला. एका इतिहास संशोधकाने एकदा यशवंतरावांना मुलाखतीसाठी वेळ मागितली. ती तत्परतेने देण्यात आली, पण काही अडचणीमुळे ते संशोधक त्यावेळी येऊ शकले नाहीत. मग त्यांनी दुस-यांदा भेटीची वेळ मागितली, तेव्हाही यशवंतरावांनी त्यांना लगेच वेळ दिली. पण त्याहीवेळी ते संशोधक गैरहजर राहिले. त्या संशोधकाने आपले पुस्तक पूर्ण करून छापायला पाठवले तरी यशवंतरावांची मुलाखत राहून गेल्याची खंत त्यांना होती. म्हणून त्यांनी आणखी एकदा भेटीसाठी वेळ मागितली आणि विशेष म्हणजे ती त्यांना मिळाली व एकदाची ती मुलाखत पार पडली. त्या दिवशी यशवंतरावांनी आपल्या दैनंदिनीत एवढीच नोंद केली - ' काय माणसे असतात !'