त्याचे ज्ञान मातीमोल होता कामा नये !
शेतीला उद्योगांची जोड दिल्याशिवाय राज्याचा विकास होणार नाही, हे यशवंतरावांनी खूप लवकर ओळखले होते. राज्यात उद्योगधंदे वाढावेत यासाठी ते नेहमीच प्रयत्न करीत असत. एखादा उद्योग सुरू करण्यासाठी ते उद्योगपतींना शंभर एकर जमीन द्यायला तयार व्हायचे, पण ' किती दिवसांत कारखाना सुरू करणार, आणि किती बेकारांना काम देणार ?' हे मात्र आग्रहाने विचारून घ्यायचे.
एकदा एका मराठी कारखानदाराने कागदाचा कारखाना काढायचे ठरवले. शेकडो एकर जंगल अक्षरश: पायाखाली घालून त्याने कागद निर्मितीचा कारखाना सुरू करण्याची योजना आखली. यासाठी त्याने स्वत:चे लाखभर रुपये खर्च केले, पण योजना एवढी मोठी झाली की त्याचा खर्च त्याच्या आवाक्याबाहेर गेला. कारखाना उभारणीसाठी राज्य सरकारने दिलेल्या प्राथमिक परवान्याची मदत संपत चालली होती. शेवटी त्या कारखानदाराने आपला परवाना कलकत्त्याच्या एका भांडवलदाराला देण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली. यशवंतराव तेव्हा मोरारजींच्या मंत्रीमंडळात वनमंत्री होते. आयता उभा राहिलेल्या कारखाना चालवायला मिळणार याचा त्या भांडवलदाराला आनंद झाला होता. पण एका मराठी उद्योजकाला केवळ पैशाअभावी उद्योग उभा करता आला नाही ही खंत यशवंतरावांना वाटत होती. त्यांनी त्या उद्योजकाला धीर व प्रोत्साहन दिले, पण ' कारखाना विकावाच लागले ' असे तो म्हणाला.
इकडे भांडवलदाराचे सचिवालयात हेलपाटे वाढू लागले. त्याला वाटले आपले काम सहज होईल, पण वेळ लागत चालला. एकदा या भांडवलदाराने वनमंत्र्यांची ( यशवंतरावांची ) भेट घेतली तेव्हा ते म्हणाले, ' हे जंगल तुडवून योजना उभी करणा-याला थोडी मुदत द्यायला नको ? शेवटी या सगळ्यात त्याला काय मिळाले ? त्याचे कष्ट व त्याचे ज्ञान मातीमोल होता कामा नये.'