नाट्यगृहाचे नाट्यमय उदघाटन !
संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली. मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जनमताची अवहेलना केल्यामुळे आंदोलन पेटले. अशा वातावरणातच यशवंतराव द्विभाषिकाचे मुख्यमंत्री झाले. ' महाराष्ट्रापेक्षा मला नेहरु मोठे वाटतात' या त्यांच्या विधानामुळे त्यांच्याविरुद्ध जनक्षोभ उसळला. द्विभाषिकाचे मुख्यमंत्री असताना यशवंतराव पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या नाट्यगृहाचे उदघाटन करण्यासाठी पुण्याला आले होते. पुणे हा तर संयुक्त महाराष्ट्र समितीचा बालेकिल्ला होता. काही झाले तरी यशवंतरावांना नाट्यगृहाचे उदघाटन करू द्यायचे नाही, असा चंग आंदोलकांनी बांधला होता.
नाट्यगृहाबाहेर संयुक्त महाराष्ट्र समितीची निदर्शने चालू होती. यशवंतराव आले. व्यासपीठावर विराजमान झाले. कमिशनर ( आयुक्त ) नाईक यांनी प्रास्ताविक केले व यशवंतरावांना उदघाटनाचे भाषण करण्याची विनंती केली. यशवंतराव उठले. ते भाषणाला सुरुवात करणार इतक्यात सभागृहात आरडाओरडा सुरू झाला. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमती भीमाबाई दांगट धावत स्टेजवर आल्या. यशवंतरावांच्या दिशेने बांगड्या फेकत त्या ओरडल्या, ' सूर्याजी पिसाळ, चालता हो.' सभागृहात एकच गोंधळ उडाला. बाहेर पोलीस निदर्शकांना आवरीत होते. कोणीतरी जिल्हा पोलिस अधीक्षकांना बोलावून आणले. भीमाबाई व त्यांच्या सहका-यांना बाहेर नेले गेले व सभागृहात शांतता निर्माण झाली. यशवंतराव पुन्हा एकदा उदघाटनाचे भाषण करण्यास उभे राहिले. त्यांचा घोर अपमान झाला होता. त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील, याची आपण कल्पना करु शकतो, पण प्रचंड आत्मसंयमाच्या जोरावर त्यांनी हा अपमान पचवला व भाषणाला सुरुवात केली. हसत हसत त्यांनी पहिलेच वाक्य उच्चारले, ' इतक्या नाट्यमय पार्श्वभूमीवर जगातल्या कोणत्याही नाट्यगृहाचे उदघाटन झाले नसेल.' त्यांच्या या वाक्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.