माझ्या राजकीय आठवणी ३४

सन १९४० मध्यें महात्मा गांधी काँग्रेसच्या जबाबदारींतून बाहेर पडले. ते काँग्रेसचे सभासदहि राहिले नाहींत. त्यांनी भारत सरकारनें स्विकारलेल्या धोरणास वैयक्तिकरात्या विरोध ठरविले. त्याप्रमाणें त्यांनीं वैयक्तिक सत्याग्रह करण्याचे ठरविले. पसंतीप्रमाणें जिल्हावार सत्याग्रही निवडण्याचे जाहीर झाले. अनेक उत्साही सत्याग्रहीचे अर्ज महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडे गेले. त्यांत कराडांतून धर्मवीर बटाणे, बाबुराव गोखले, यशवंतराव चव्हाण, वालचंद गांधी, हरीभाऊ लाड, गौरीहर सिंहासने आदि पुष्कळ सत्याग्रहींचे अर्ज परवानगीकरितां महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडे गेले, त्यापैकीं धर्मवीर बटाणे, श्री. वालचंद गांधी व गौरीहर सिंहासने यांचे अर्ज मंजूर झाले. श्री. वालचंद गांधींनी कराड येथें जैनमंदीरासमोर सत्याग्रह केला. श्री. गौरीहर सिंहासनें यांनी कलेढोण ता. खटाव येथें हरीभाऊ लाड यांचे अध्यक्षतेखालीं सत्याग्रह केला, त्यांत त्यांना ६ महिन्याची सक्त मजूरीची शिक्षा झाली. वालचंद गांधींना ४ महिन्याची सक्तमजूरीची शिक्षा झाली. धर्मवीर बटाणे यांनी घरगुती आपत्तीमुळें सत्त्याग्रह करण्याचे स्थगित केले. विशेष हे कीं, इंग्रजांच्या अशा अत्यंत संकटाच्या व आणिबाणीच्या काळांत गांधीप्रणीत गांधीयुगांतील राजकिय कैद्यांना वागवितांना जे सौजन्य व औदार्य इंग्रजी सत्तेनें दाखविले ते युरोपातील दुस-या एकाहि देशानें दाखविले नसते.

ता. १६ जानेवारी सन १९४१ ला कलकत्त्याहून गुप्तपणें नेताजी सुभाषचंद्र बोस सरकारी नजरकैदेंतून शिताफिने भारताबाहेर निसटले. त्यांनी ता. २६ जानेवारीला अफगाणिस्तान मास्कोमार्गे बर्लिनला जाऊन हेर हिटलर यांची भेट घेतली. त्यांचे मनसुभे ठरलें त्याप्रमाणें त्यांनी अस्थायी भारतसरकारची स्थापना केली. या अस्थायी भारतसरकारला जपान, जर्मनी, स्वतंत्र फिलीफाइन्स, स्वतंत्र ब्रम्हदेश या सरकारांनी मान्यता दिली. भारत अस्थायी सरकारनें जर्मनीचे मदतीनें या सरकारतर्फे आझाद हिंद सैन्याची निर्मिती केली व आपला कारभार अंदमान निकोबार बेटावर सुरू केला. अमेरिका वगैरे अन्यदेशांतील भारतीय लोकांकडून कोट्यावधि रुपयांचा निधी जमविला. सन १९४१ च्या डिसेंबरांत पूर्वेकडे जपाननें दोस्त राष्ट्राशी युद्ध जाहिर केले. चार महिन्यांत या भागांतील फ्रान्स, डच, इंग्लंड वगैरेच्या ताब्यांतील सर्व देश जपाननें जिंकला. सन १९४२ च्या एप्रिल महिन्यांत जपानी फौजांनी भारताच्या सरहद्दीवर आपली ठाणी स्थापन केली.

ता. ९ ऑगष्ट सन १९४२ रोजीं मुंबईत गवालिया टँकवर काँग्रेसचे अधिवेशन भरले. त्यांत महात्मा गांधींनी ‘चलेजाव’ चा ठराव मंजूर केला. महात्मा गांधीनी ‘चलेजाव’ घोषणेनें संपूर्ण असहकार पुकारला. सारे लहान मोठे पुढारी व काँग्रेसचे कार्यकर्ते सरकारनें कैद्यांचा छळ, सभाबंदी व जामावबंदी असे सरकारी दडपशाहीचे तांडव सुरू झाले.

मुंबईच्या या काँग्रेसच्या अधिवेशनासाठीं सातारा जिल्ह्यांतून पुष्कळ लोक गेले होते. त्यांत श्री. यशवंतराव आदि मंडळी गेली होती. त्यांनी तिकडेच परस्पर काँग्रेसच्या आदेशाप्रमाणें चळवळ करणेसाठीं भूमिगत होऊन आपले कार्य सुरू केले. सरकारी धोरणाप्रमाणें कराडांत सर्व प्रथम श्री. पांडुआण्णा शिराळकर व गणपतराव अळतेकर वकील यांना कचेरींत बोलावून नेवून तेथेंच अटक केली. जनतेंत खळबळ माजली. बंदोबस्तासाठीं पोलीस कमी पडू लागले. तेव्हा कराडचे पोलीस सब-इन्स्पेक्टरनीं साता-याहून अधिक मदत मागविली. पण त्या मदतीबरोबर डी. वाय्. एस्. पी. कराडास मुक्कामास आले. श्री. बाबुराव गोखले, वामनराव फडके वकील व व्यंकटराव पवार वकील यांनी सत्याग्रहाची तारिख जाहिर केली. त्याप्रमाणें सभा सुरू झाली. मला सत्याग्रहीनीं भेटीसाठीं बोलाविले आहे असा निरोप आला. मीहि निरोपाप्रमाणें भेटावयास सभेच्या ठिकाणी गेलो. तेथेंच त्या सत्त्याग्रहाबरोबर मलाहि अटक करण्यांत आली. याचवेळीं अनेक तरुण कार्यकर्त्यांना याच मोटारींतून कचेरीत नेले. त्यापैकीं बाबूराव माळवदे यांस ठेवून घेऊन श्री. माधवराव जाधव वगैरे प्रमुख ६-७ कार्यकर्त्यांना सोडून दिले. श्री. यशवंतरावांनी भूमिगत राहून आपलेबरोबर शांताराम इनामदार, माधवराव जाधव, डी. एम्. पाटील, बी. आर. कोतवाल, बी. बी. काळे आदि तरुण कार्यकर्त्यांची अभेद्य संघटना स्थापन करून प्रस्थापित ब्रिटिश राज्यसत्ता जेणेंकरून खिळखिळी करतां येईल असे कार्यक्रम या कार्यकर्त्यांनी अमलांत आणले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org