माझ्या राजकीय आठवणी ३०

सन १९३४ च्या अखेरीस मुंबई असेंब्लीची त्रैवार्षिक निवडणूक झाली. तीत काँग्रेसनें  ४२ जागा जिंकल्या. या नव्या असेंब्लीत जाईंट सिलेक्ट कमिटीनें शिफारस केलेल्या सुधारणा हिंदी लोकांना नापसंत असल्याचा ठाराव ता. ७ फेब्रुवारी १९३५ रोजी. काँग्रेसच्या प्रतिनिधींनी मोठ्या बहुमतानें पास केला. शुभ्र पत्रिका व संयुक्त कमिटीचा रिपोर्ट व अखेर पास झालेला कायदा या तिन्हीचें स्वरुप आशय दृष्टीने एकच असलें तरी त्यांतहि दरवेळीं जे बदल होत गेले ते महत्वाचे आहेत व त्यामुळें सुधारणा कायदयाचे स्वरुप संकोच पावले आहे. शुभ्र पत्रिकेंत असेंब्लीची निवडणूक मतदाराकडून प्रत्यक्ष व्हावी अशी शिफारस केली असतां संयुक्त कमिटीनें ती अप्रत्यक्ष म्हणजे प्रांतिक कायदे मंडळांतील सभासदांना करावी असे ठरविले. पार्लमेंटमध्यें बील पास होत असतांनाच मुंबई व मद्रास या इलाख्यांतूनहि इतर कांहीं प्रांतांना आहेत, त्याप्रमाणें जोड कायदे-मंडळे असावीत असे ठरविण्यांत आले. या कायद्याप्रमाणें व्यवस्था अमलांत आणण्यासाठी भारत सरकारचे काम झपाटयानें सुरू झाले. सन १९३६ साली संयुक्त सरकार व भावी प्रांतिक सरकार यांचे आर्थिक संबंध निश्चित करणारा रिपोर्ट प्रसिद्ध झाला. यास ‘ओरोनेमियर कमेटी रिपोर्ट’ असे म्हणतात. तसेंच प्रत्येक प्रांतांतील कायदेमंडळांत निवडून यावयाचे प्रतिनिधी जिल्हयावार व  शहरावार कसे निवडून यावेत हे ठरविण्यासाठीं नेमलेल्या हॅमंड कमिटीनेही आपला रिपोर्ट प्रसिद्ध केला. भारतसरकार यापुढें संयुक्त सरकार होणार असल्यानें प्रांतिक सरकार व वरिष्ठ सरकार यांची अधिकार क्षेत्रे निरनिराळी होतील. त्याप्रमाणें त्यांनी कायदेशीर बदल घडवून आणणेसाठी दिल्लीस रिफॉर्म्स ऑफिस उघडले. त्यास विलायतेंतील इंडिया ऑफिस मदत करीत होते.

सन १९३४ साली काँग्रेसचे अधिवेशन मुंबईस होऊन त्यांत पुढें इंग्लंडात होऊ घातलेल्या राज्य सुधारणांच्या कायद्याप्रमाणें मंडळांत शिरून प्रांतिक सरकार राबविण्याला काँग्रेसनें सम्म्ती दिली  व त्याप्रमाणें निवडणूका लढविण्याचे ठरले. त्याप्रमाणें सन १९३७ साली दक्षिण सातारा जिल्हयांतून चार प्रतिनिधी निवडून द्यावयाचे होते. तेव्हां सातारा जिल्हा काँग्रेसतर्फें उमेदवाराचे निवडीबाबत जिल्ह्याचे तत्कालीन एकमेव नेते दे. भ. भाऊसाहेब सोमण यांचे नेतृत्वाखाली चर्चा सुरू झाली. श्री. यशवंतरावांनी श्री. आत्माराम पाटील यांचे नांव सुचविले, तेंव्हां काँग्रेसमधील कांही मंडळींनी त्यांच्या उमेदवारीस विरोध केला. विरोधकांचे म्हणणे कीं, सेवेपेक्षां धनवानांना मान्याता मिळते. त्यांचेजवळ निवडून येणेंसाठी अवश्य तेवढे धनहि उपलब्ध नाही. तेंव्हा श्री. आत्मराम पाटील यांच्या उमेदवारीस पाठिंबा म्हणजे काँगेसची एक जागा गमविणे होय. वाटाघाटी होऊन दे. भ. भाऊसाहेब सोमणांनी श्री. यशवंतरावांसह आम्हा सर्वांना वारंवार बजावून व परिस्थितीची जाणीव देऊन अखेर आमचे इच्छेप्रमाणें दक्षिण सातारा जिल्ह्यांत तीन उमेदवार उभे करण्याचे ठरवून पुढीलप्रमाणें नावें जाहिर केली. १) पांडुआण्णा शिराळकर २) भाऊसाहेब कुदळे ३) आत्माराम पाटील, याप्रमाणें निकाल झाल्यावर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारकार्यांस प्रारंभ झाला. पण काँग्रेसच्या कांही मंडळींचा श्री. आत्माराम पाटलांच्या निवडीस विरोध असल्यानें त्यांनी प्रचारकार्यात विघ्ने निर्माण करण्यास सुरवात केली. ही गोष्ट लक्षांत येता़च श्री. यशवंतराव व आम्ही सर्वांनी दे. भ. भाऊसाहेब सोमणांना भेटून सर्व परिस्थिती त्यांचेसमोर मांडली. तेव्हां भाऊसाहेबांनी कराडास काँग्रेसचे तिन्ही उमेदवार व त्यांचे सहकारी यांना प्रत्यक्ष बोलावितो व त्यांचेसमोर तुमची बाजू मांडून योग्य तो उपाय योजना करू असे सांगितले. प्रचाराबाबत तुम्ही आपली योजना मांडा. ठरल्याप्रमाणें प्रचारकार्यांस आरंभ करू असेहि त्यांनी आश्वासन दिले. तिन्हीहि उमेदवार व त्यांचे सहाय्यक कराडांत जमले. दे. भ. भाऊसाहेब सोमणांनी परिस्थितीची कल्पना दिली व त्यांनी सूचना असल्यास द्याव्या असे सांगितले, काँग्रेस उमेदवारांचा प्रचार संयुक्तपणें करावा किंवा ज्याचा त्य़ानें आपापले सोयीप्रमाणें वैयक्तिक करावा असे पर्याय श्री. यशवंतरावांनी मांडले. मात्र आतां जे ठरेल त्यांत पुन्हा मुळीच बदल होणार नाहीं असे निक्षून बजावले. दोन्ही उमेदवारांनी वैयक्तिक प्रचार मान्य केला व त्याप्रमाणें श्री. आत्माराम पाटील यांच्या वतीनें आम्हीही मान्य केला. पण त्यांतील साधक बाधक बाबी व आपली फूट प्रतिपक्षास वरदान होईल याचीहि मीमांसा यावेळीं स्पष्टपणें मांडली. पण याचा अर्थ कांहीं मंडळींनी निराळा लावून वरील वैयक्तिक प्रचाराचा कार्यक्रम कायम केला. आता आमचेवर प्रचाराची जबाबदारी वैयक्तिक असल्यानें श्री. आत्माराम पाटलांचे प्रचारकार्यांची योजना श्री. यशवंतरावांच्या नेतृत्वाखालीं ठरविली. कराड तालुका काँग्रेसचा अध्यक्ष मी होतो. अखिल भारतभर पंडित जावाहरलाल नेहरुंचा दौरा जाहिर झाला. सातारा जिल्ह्यांत सातारा व काराड या गांवी त्यांची व्याख्यानें मुकर झाली. कराडातील  जनतेने व तरुण कार्यकर्त्यांनी तनमनधनानने आपापल्यापरी पंडीत नेहरूंच्या स्वागाताची तयारी केली. चौकाचौकांतून कमानी उभारल्या. व्याख्यानाचे व्यासपीठहि स्वामीचे बागेंत तयार केले. पंडीत जवाहर नेहरूना निपाणीहून कराडास आणणेची व्यवस्था कराड तालुका काँग्रेसनेच करावयाची असल्यानें ती जबाबदारी आमचेवर पडली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org