माझ्या राजकीय आठवणी २६

सन १९३१ च्या सप्टेंबर महिन्यांत दुसरी गोलमेज परिषद इंग्लंडचे मुख्य प्रधान रॅम्सेमॅग्डोनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. महात्मा गांधींनी हिंदू-मुसलमानांच्या राजकीय आकांक्षेतील मतभेद मिटविण्याकरितां कमालीचे परिश्रम केले. परंतु त्यांचा हेतू साध्य झाला नाहीं. उलट मुसलमानाप्रमाणेंच अस्पृश्य पुढा-यांनी स्वतंत्र मतदार संघ व राखीव जागांची मागणी केली व त्या फुटीर वृत्तीला राज्यकर्त्यांचा पाठिंबा मिळेल असे दिसू लागले. परिषदेंत संस्थानिक, मुसलमान, अस्पृश्य, हिंदुमहासभा अशा देशातील विविध पक्षांनी आपापले प्रतिनिधीत्व आंकडेवारीनें मांडून आपली स्वातंत्र्याची मागणी केली. त्यावेळीं वरील संस्थानीं जाहिर केलेल्य़ा आंकडेवारीवरून भारताची लोकसंख्या दुपटीनें भरू लागली शेवटी महात्मा गांधीनीं आपले प्रतिनिधीत्व ज्या जनतेच्यावर अवलंबून आहे त्याबद्दल बोलतांना ब्रिटिश भेदनीतीचा खरपूस समाचार घेऊन त्यांच्या कुटील कारस्थानाबद्दल अध्यक्ष रॅम्सेमॅग्डोनल्ड यांना लाजविले. विविध भारतीय पक्षांच्य़ा प्रतिनिधींच्य़ा आंकडेवारीची बेरीज करतां ती ७२ कोटी होते असे नजरेस आणून त्यांतून भारताची खरी लोकसंख्या ४० कोटी वजा करून ज्या ३२ कोटी लोकसंख्येची पोकळी निर्माण झाली आहे, तिचा मी प्रतिनिधी आहे असे बोचकपणे सांगून त्यांनी आपली मागणी पुढे मांडली ब्रिटिश साम्राज्यानें देऊ केलेल्या वसाहतीच्या स्वराज्यांतील देणगी भारतीय जनतेस न पेलणारी गोष्ट असल्यानें ती काँग्रेस संस्थेस मान्य नाहीं. तेव्हां आम्हांस संपूर्ण प्रांतिक स्वायसत्ता द्यावी. बाकी सर्व बाबी तूर्त सरकारनें सांभाळाव्या अशी मागणी केली. महात्माजींच्या या मार्मिक मागणीचा अर्थ भारतीय प्रतिनिधींना न समजल्याने त्यांनी महात्मा गांधींना त्यांच्या या मवाळ मागणीबद्दल दोष दिला. पण सदर मागणीतील मर्म ब्रिटिश राजकर्त्यांनांच समजले होते. तेव्हां त्यांनी महात्मा गांधींची ही मागणी नाकारून पहिल्या गोलमेज परिषदेप्रमाणें निकाल जाहिर केला. भारतीय जनतेला व सर्व पक्षीय पुढा-यांना महात्मा गांधीच्या मुत्सद्दीपणाबद्दल मागावून धन्यता वाटली.

परिषद संपली. महात्मा गांधी स्वदेशी परत आल्यावर फार दिवस तुरुंगाबाहेर राहाणार नाहींत अशी चिन्हे त्यांचा मुक्काम इंग्लंडमध्ये असतानांच स्पष्ट दिसू लागली होती व तेहि तुरुंगांत जाण्याच्या तयारीनेंच स्वदेशचा रस्ता चालत होते. वरील अंदाजाप्रमाणें महात्मा गांधींनी मुंबईच्या किना-यावर पाय ठेवताच त्यांना अटक करण्यांत आली.

गांधी आयर्विन कारारान्वये मुक्त झालेले काँग्रेस पुढारी त्यांचे अनुयायी गोलमेज परिषदेचे फलश्रुतीकडे डोळे लावून बसले असले तरी संघटनेचे त्यांचे कार्य सातत्यानें चालू होतेच. चळवळ गतीमान ठेवण्याची जबाबदारी आमच्या मंडळांतील लोकांनी श्री. यशवंतराव यांचेवर टाकली होती. ती त्यांनी चोखपणे बजावली. आम्ही एकत्र आलो. श्री. यशवंतराव भावनेपेक्षा ध्येयाची जपणूक करीत असत. त्यास अनुसरून त्यांनी एक कार्यक्रम तयार केला. कराड तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष मीच असल्यानें कराड तालुक्यांत गट परिषदाद्वारा प्रचारमोहिम श्री. यशवंतरावांनी सुचविलेप्रमाणें सुरू केली. तालुक्याचे भाग पाडले. इंदोली, मसूर, ओंड, उडाळे, काले अशी केंद्रे मुक्रर केली व त्या भागांत शिस्तबद्ध प्रचारकार्य सुरू केले. प्रत्येक गटपरिषदेस नवा नवा नामवंत पुढारी अध्यक्ष म्हणून आणला होता. काले येथील गटपरिषदेचे अध्यक्ष पू. सानेगुरुजी होते. गुरुजींच्या उपदेशानें जनतेंत अमाप उत्साह निर्माण झाला.

महात्मा गांधीच्या अस्पृश्यता निवारण कार्यक्रमाच्या दृष्टीनेहि आम्ही आपली पाउले पुढें टाकीत होतो. येरवडा तुरुंगाच्या अंधेरी विभागांत मी शिक्षा भोगीत असतां कर्मधर्म संयोगानें कर्मवीर विठ्ठल रामजीं शिंदे यांच्या सान्निध्याचा लाभ झाला. त्यावेळीं मी त्यांना कराडास व्याख्यानास येणेबद्दल विनंती केली. त्यांनीहि येण्याचे कबूल केले. पण आपला नेहमीचा शिरस्ता पाळला जात असेल तरच मी येईन असे त्यांनी सांगितले. ‘आपली उतरण्याची सोय हरीजन वाडयांत हरीजनाकडे झाली पाहिजे व निमंत्रकांनी त्याच घरी माझे समागमे तेथेंच भोजन केले पाहिजे’ हा त्यांच्या नियम पाळण्याचे कबूल करून सुटका होताच त्यांचे घरी जाऊन आम्ही कराडास परत आलो. योगायोग असा कीं, आमचे मंडळाचा शिवजयंती उत्सव जवळच आला होता. त्यांत कर्मवीर विठ्ठल रामजी उर्फ आण्णासाहेब शिंदे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवून पुण्यास त्यांना निमंत्रण देणेस श्री. यशवंतरावांना पाठविले व त्यांच्या नियमाप्रमाणें कराडांतील सर्व व्यवस्था करण्याचे कबूल करून श्री. यशवंतराव परत आले. कराड येथें कर्मवीर आण्णासाहेबांची उतरण्याची सोय श्री. गोविंदराव थोरवडे यांचे घरी केली. कर्मवीर आण्णासाहेब शिंदे यांचे पंगतीस श्री. यशवंतराव व मी यांनी जेवण केले. धर्मवीर बटाणे यांचे घरी तुकाराम दोडके (कडेगांव) नांवाचा हरीजन मुलगा त्यांनी आपल्या कुटुंबात ठेवून घेतल्याचे कर्मवीर आण्णासाहेब यांना सांगितले. हे ऐकून त्यांना फारच आनंद वाटला. कर्मवीर शिंदे यांच्या व्यख्यानाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org