माझ्या राजकीय आठवणी २

जरूर तेवढेच प्रास्ताविक

आमचे देशभक्त मित्र श्री. हरि पांडुरंग लाड हे “माझ्या राजकीय आठवणी” या आपल्या पुस्तकाने ग्रंथकार म्हणून पुढे येत आहेत, ही मोठी अभिमनास्पद व अभिनंदनीय घटना आहे. कंत्राटदार, छापखानेवाले, अनेकानेक लहान मोठ्या कार्याचे छुपे सूत्रधार आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनातील चळवळ पुढारी म्हणून ते पुष्कळांना चांगले परिचित होते व आहेत. पण छापखान्याचे संचालक आणि “लोकक्रांन्ति” या वृत्तपत्राचे व्यस्थापक म्हणूनच त्यांचा आजवर साहित्यसृष्टीत अनुभवसिध्द परिचय होता. आता प्रस्तुत पुस्तकाने हरिभाऊ ग्रंथकार या चढत्या वाढत्या पदवीने लोकमानसात स्थान पटकावित आहेत.

श्री. हरिभाऊ लाड यांच्या राजकीय आठवणी म्हणजे त्यांच्या जीवनातील राजकारणासाठी केलेल्या हालचालींचा व तदनुषंगिक गोष्टींचा इतिहास आहे. हा इतिहास प्रामुख्याने क-हाड शहराशी व त्यातील नामदार यशवंतराव चव्हाण आणि स्वत: श्री. लाड यांच्या प्रगतिशीलतेशी निगडित असला तरी त्याची पार्श्वभूमि अखिल भारतीय स्वातंत्र्यान्दोलनाच्या आशा आकाक्षांची आहे. त्यामुळे हरिभाऊंच्या आठवणीना विशेष प्रतिष्ठा आहे. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळोणकरांचे वचन आहे की –

“इतिहास खरा म्हटला म्हणजे मनुष्यजातीच्या मनोव्यापारांचे शाश्वत स्वरुप कोणते व प्रसंगानुरोधाने त्यावर कसकशी कार्ये घडतात याचे ज्यात उद्घाटन केले आहे, असा लेख होय. इतिहासापासून मुख्य होणारा लाभ मानवजातीच्या मनोधर्माचे ज्ञान.”

शास्त्रीबुवांच्या या वचनाचा प्रत्यय की हरिभाऊंच्या या पुस्तकाच्या वाचनाने येतोच येतो.

राजकीय म्हटल्यातरी हरिभाऊंनी अनुषंगिक, सामजिक आणि संघटनात्मक आठवणीही या पुस्तकांत नमूद केल्या असल्या कारणाने हरिभाऊंचे आत्मचरित्र वाचकांना या पुस्तकांत तपशीलवार नसले तरी त्रोटकपणें पण साखळीसूत पहावयास सापडते. आणि सहजासहजी ना. यशवंतरावजी चव्हाण यांच्या बालपणापासूनच्या सहज प्रवृत्तींचा व सार्वजनिक जीवनासाठी विशाल होत गेलेल्या मनाचा आणि बुध्दिचा परिचय होत जातो. म्हणून क-हाडच्या गेल्या अर्धशतकातील राजकारणी जीवनाच्या मिळवणीने या पुस्तकाकडे पाहिले म्हणजे ते राष्ट्र जीवनरुपी शिवप्रभूला वाहिलेले बिल्वदल असल्याचा आल्हाद वाचकमनाला होतो.

दे. भ. लाड यांचे हे पहिलेच पुस्तक असल्याकारणाने, जशी त्यात नवीन वाटचालीची नवलाई आहे, तशीच भाषेची शैली व सोपेपणा यांची रंगतही आहे. आपल्या सगळ्या आठवणी तारीख महिन्यांच्या नोंदी घेऊन सांगणारे हरिभाऊ, गच्चीवर चांदण्यात नातवंडाच्या मेळावात बसून इतिहास सांस्कृतिक बिनचूकपणे आठ-आठवून सांगणा-या वत्सल आजोबासारखेही कित्येक ठिकाणी वाटतात. पुस्तकाचा हा विशेष मला हृद्य वाटतो.

क-हाडच्या जीवनात “मुख्य सूत्र हाती घ्यावे । करणे ते लोकाकरवी करवावे ।।” अशी जी लोकसंग्रही मंडळी आहेत, त्यांत दे. भ. हरिभाऊ यांचे एक आगळे स्थान आहे. ते स्थान साजरे करतांना हरिभाऊंना जसा अनेकांचा दुवा मिळाला, तसाच त्यांच्या करारी निश्चितार्थी वृत्तीमुळे काही प्रसंगी काहीजणांचा रुसवाही सोसावा लागला. सार्वजनिक जीवनाच्या चव्हाट्यावर उभे राहणाराने हाराकरता नुसती मान पुढे करून भागत नाही; प्रसंगविशेषी माराकरता पाठही ताठ ठेवावी लागते. हरिभाऊंना ते पक्के ठाऊक असल्याकारणाने, त्यांचे सार्वजनिक जीवन निभावले आहे. हरिभाऊच्या प्रस्तुत पुस्तकाचेही प्रबोधन हेच आहे की “मी सर्वप्रथम भारतीय असून मग कार्यक्षेत्राप्रमाणे लहान मोठा कोणीतरी दुसरा आहे.” विनयी पण विशाल दृष्टीची ही भारतीय नागरीकता आत्मसात करण्यासाठी लहान थोर सर्व क-हाडकरांनी आणि भारताच्या नागरीकातील क-हाडबद्दल आपुलकी, ओढ अगर आकर्षण असणारांच्या हाती हरिभाऊंचे हे पुस्तक जावे व त्यांच्या लेखन परिश्रम हेतूचे सार्थक व्हावे.

क-हाड
३० मे १९७४
पु. पां. गोखले

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org