माझ्या राजकीय आठवणी १७

कायद्यानें भारतीय सभासद नेमण्यास मुळीच प्रतिबंध नव्हता. असे असूनहि कोणा हिंदी इसम या कमिशनवर नेमला गेला नाहीं. यामुळें भारतीय पुढा-यांत फारच असंतोष निर्माण झाला. अशा असमाधानकारक स्थितींतच सायमन कमिशन ३ फेब्रुवारी सन १९२८ रोजीं भारतांत आले. सायमन कमिशनमध्यें हिंदी सभासद नाहीं. या गोष्टीची वाण भरून काढणेसाठीं जणुकाय प्रत्येक प्रांतीक कायदेमंडळांतून व वरिष्ठ कायदेमंडळांतून सायमन कमिशनशी सहकार्य करणेंसाठीं एक एक कमिटी नेमण्यात आली. दरप्रांतांत कमिशन चौकशीसाठीं जाई कमिटी व हे कमिशन असे तीन कमिट्यांचे सभासद एकत्र बसत व साक्षीपुरावा ऐकत. या प्रकारास जाईट फ्री कॉन्फरन्स हे नांव असे.

कायदेमंडळातच जातवारीचे अनेक पक्षोपक्ष असल्यानें सायमन कमिशनशीं सहकार्य करणेसाठीं एक एक कमिटी नेमणे शक्य झाले. पण वरिष्ठ कायदेमंडळ व प्रांतिक असेंब्लीतील बहुसंख्य सभासदांचा पाठिंबा मिळाला नव्हता. पण तेवढ्यासाठीं सरकारनें आपले काम न थांबविता तसेंच चालू ठेविले.

देशांत या कमिशनच्या निषेधार्थ मोठेच वादळ निर्माण झाले. ज्या ज्या ठिकाणी या साहेबांनी आपल्या कमासाठीं प्रयाण केले. तेथे तेथें त्यांचे स्वागत काळ्या निशाणांनी मोठ्या प्रमाणांत करण्यांत आले. लाहोर येथें कमिशनच्या निषेधार्थ गर्दीत दे. भ. लाला लजपतराय प्रामुख्यानें होते.

पोलिसांनी निदर्शकांची गर्दी हटविण्यासाठी लाठीमार केला. लाठीमारानें लालाजी जखमी झाले व त्या आजारांतच ते मृत्यूमुखी पडले. त्यांचे मरण लाठीमारामुळे घडले व तो लाठीमार पोलिस अधिकारी सँडर्स यानें केला होता. परिणामी भरदिवसा क्रांतीवीर भगतसिंग यांनी सँडर्सला पिस्तुलाच्या गोळ्या झाडून ठार केले. सँडर्सच्या मारेक-यांना पकडण्यासाठी धडपड करणा-या चांचनसिंहावर क्रांतीवीर चंद्रशेखर आझादांनी गोळी झाडून त्यास ठार केले. मदतनीस सुखदेव व राजगुरु हें होते. पुढें सन १९२९ च्या एप्रिल महिन्यांत क्रांतीकारक भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या इंडियन ले. कौन्सिल हॉलमध्यें दोन बॉम्ब टाकून, पिस्तुलाचें कांही बार काढले. या कृत्यानें उडालेल्या गोधळांत वरील दोघेही शांतपणें सभागृहांत उभे होते. त्यांना पकडण्यास पोलिस सार्जंट येताच पिस्तुले फेकून देऊन ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. या क्रांतीकारकावर खटले होऊन त्यांना देहांताची शिक्षा देण्यांत आली.

भारतीय राजकारणाच्या प्रगतीस सायमन कमिशनचा कितपत हातभार लागला हे आतां पाहूं. कमिशनच्या कामास मदत करण्यासाठीं नियुक्त केलेल्या कमिट्यांचे अध्यक्ष म्हणून सर शंकरन् नायर यांची नियुक्ती करण्यांत आलेली होती. या कमिट्यांचे रिपोर्टस् एकामागून एक प्रसिद्ध झाले. परंतु कोणत्याहि कारणांने देशांतील सायमन कमिशनवरील असंतोष व बहिष्कार थंडावला नाहीं. भारतीय जनतेंनें भावी राजघटनेची योजना आखण्यासाठीं निवडक हिंदी व ब्रिटिश पुढा-यांची एक गोलमेज परिषद बोलवावी अशी मागणी केली.

सन १९२७ साली महाराष्ट्रात काँग्रेसमार्फत पुण्यास दे. भ. मेहेरअल्ली व आ. रा. भट यांनी युवक चळवळीस आरंभ केला. त्याचे मार्गदर्शन पं. जवाहरलाल नेहरू, वीर नरीमन व न. वि. गाडगीळ करीत होते. त्या यूथलीगचेकरितां श्री. यशवंतराव चव्हाणांनी प्रयत्न करून कराडहून कांही तरुण नेले. त्यांत मीहि होतो.

यांच साली महात्मा गांधींचा काँग्रेसतर्फे दुसरा अखिल भारतीय दौरा महाराष्ट्रांत सुरू झाला. महात्माजींच्या स्वागताची तयारी कराडातहि सुरू झाली. आमच्या श्री शिवछत्रपती मंडळानें श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवक दल तयार केले व सभेच्या इतर कार्यक्रमाची व्यवस्था ठेवली. सदर सभा श्रीकृष्णाबाईच्या वाळवंटात भव्य मंडप घालून भरविण्यांत आली होती. महात्माजींचे व्याख्यान प्रचंड जनसमुदायापुढें झाले. त्यामुळे काँग्रेसच्या धोरणासंबंधीचा आमचा विश्वास बळावला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org