एक गोष्ट मात्र सांगितली पाहिजे, की या सर्व समाजापासून दूर व गावाबाहेर राहणा-या महार, मांग, चांभार या मंडळींचा गावाशी फार कमी संपर्क असे. आणि जो असे, तो काही, ज्या माणुसकीचे मी वर कौतुक केले, तिच्याशी सुसंगत होता, असे म्हणता येणार नाही. आज दलितांचा प्रश्न म्हणून आम्ही ज्या प्रश्नाकडे पाहात आहोत, तो दलित समाज तेव्हा या गावगाड्याच्या बाहेर जे एक वेगळे जीवन जगत होता, त्याला जीवन हे नाव द्यायचे, की नाही, हाही एक वेगळा प्रश्न आहे.
पण मी येथे उल्लेख करत होतो, त्या लहानसहान जमातींचा. पाटील मंडळींची घराणी मानाची होती आणि त्यांमध्येही इज्जतदार वडीलधारी मंडळी सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत असत. पण त्याच्या पाठीमागचे एक सूत्र होते. मी जे पुढे अनुभवाने समजलो, त्यावरून राज्य शासनाशी जुळते मिळते घेऊन नमून राहणे हे त्या सूत्राचे नाव होते, असे म्हटले, तरी चालेल. छोट्या-मोठ्या लोकांनी गावच्या पाटलाला मानावे. गावच्या पाटलांनी शेजारच्या पोलीस ठाण्यावरच्या पोलीसांना मानावे, अशी रीत होती. गावचा तलाठी हा कर्ता माणूस मानला जात असे. आणि या सगळ्यांत मोठी असामी म्हणजे तालुक्याचा मामलेदार जेव्हा गावी येई, तेव्हा त्याची कोण सरबराई होत असे ! मुलाबाळांपासून तो मोठ्यांपर्यंत गावात कोणीतरी मोठा पाहुणा येणार, म्हणून गडबड असायची.
शासनाला भीतीने नमून वागण्याची ही प्रवृत्ती त्या वेळच्या जीवनाचे एक गृहीतकृत्य होते. त्यामुळे पुढे ज्या राजकीय चळवळी झाल्या, त्यांचा लवलेशही तेथपर्यंत त्यावेळी पोचलेला नव्हता. शिक्षण कमी, बाहेरच्या जगाशी संपर्क कमी, आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती, कुणाच्या अध्यात मध्यात न पडावे, असे तटस्थ राहावे, हे धोरण, हीच तेथल्या जीवनाची रीत होती. त्यामुळे त्यात गतीही नव्हती. आणि प्रगतीही नव्हती. या गावचा आलेला हा अनुभव पुढे मी कार्यकर्ता म्हणून जेव्हा जिल्ह्यात इतरत्र हिंडू -फिरू लागलो, तेव्हाही थोड्याफार फरकाने मला पुन्हा आला. काही ठिकाणी सुबत्ता जास्त असे. तेथील धनिक लोकांची आक्रमकता गरीब माणसाच्या बाबतीत मात्र जास्त असे. हा एवढा फरक कोठे कोठे जरूर जाणवला. पण शासनाच्या विरूद्ध आवाज काढायचा नाही, हा त्या वेळच्या शेतकरी समाजाचा आणि शेतकरी समाजावर अवलंबून राहणा-या ग्रामीण समाजाचा जणू स्वभाव बनून गेला होता.
माझ्या लहानपणी माझ्या गावात मी पाहिलेली काही माणसे, त्यांचे स्वभावविशेष माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. मी लहानपणी त्या गावी गेलो, की काही ठिकाणे अशी होती, की तेथे मी हमखास जाऊन येत असे. त्यांमध्ये वयाने पन्नाशीला आलेला बाबू तेली हे एक मोठे नमुनेदार व्यक्तिमत्त्व होते, दिवसातून एक-दोनदा तरी बाबू तेल्याच्या घरी गेल्याशिवाय मी राहत नसे. आजोळच्या घराशी त्याचे जवळिकीचे संबंध असल्यामुळे ते ही मला मोठ्या प्रेमाने वागवीत असे. त्याच्या घरात तेलाचा घाणा सुरू असे. भुईमुगाच्या शेंगा एका मोठ्या लाकडी घाण्यात टाकून त्याच्या भोवती फिरणारा बैल व त्याच्या पाठीमागे हिंडणारा बाबू तेली हा मला नेहमी आठवतो. चक्राकार फिरणा-या बैलाच्या पाठीमागे त्या घाण्यावर एक जागा असे. त्या जागेवर बसून किती तरी वेळ मी मजेने काढला आहे. हा बाबू तेली मला अधून मधून वेगळ्या गोष्टी सांगे. देवराष्ट्रातल्या माणसांच्या खोड्या सांगे नि खूप हसवी. सोललेल्या शेंगा देऊन माझा पाहुणचारही करीत असे.
याच्यासारखी आणखीही कित्येक माणसे होती.