मला त्यांच्या संघटना-चातुर्याचे मोठे आश्चर्य वाटले. आम्ही तसेच पुढे गावात गेलो. तेथे एक जाणते म्हातारे गृहस्थ आम्हांला भेटले. त्यांनी सांगितले,
''येथे पारावर बसा आणि काही काळजी करू नका. पोलिसांची मी व्यवस्था करून आलो आहे. थोड्याच वेळात येथे पाच-पन्नास माणसे जमतील. त्यांच्या पुढे तुमची सभा करा आणि मग तुमच्याबरोबर एक माणूस येईल. त्याच्यासोबत गावातून बाहेर पडा. तेथून पुढे कोठे व कसे जायचे, ते मात्र तुमचे तुम्ही ठरवा.''
म्हातारा इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता, की मला तर नवलच वाटले. त्याने सांगितले, त्याप्रमाणे आम्ही या पारावर बसलो. आजूबाजूच्या घरांतून एकेक माणूस तेथे येऊ लागला. आम्ही आमच्या पिशवीतील झेंडे काढले आणि लोकांच्या हातांतील काठ्या मागवून घेऊन त्यांवर ते बांधले आणि फडकावले. महात्मा गांधींच्या नावाने जयजयकार केला. भारतमातेचा जयजयकार केला. जमलेल्या लोकांच्या पुढे भाषणे दिली. त्यांत त्यांचा सन्मान केला.
''स्वातंत्र्यासाठी असहकाराची चळवळ कशी चालवावी, याचे आदर्श उदाहरण तुमच्या बिळाशीने घालून दिले आहे. तुमच्याबरोबर जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर सर्व जनता आहे, हे सांगण्यासाठी आम्हांला पाठविले आहे. तुम्ही एकाकी नाही आहात.''
जिल्ह्यामध्ये इतरत्र चळवळ कशी चालली आहे, याचीही माहिती त्यांनी दिली.
प्रत्येकी दहा-पंधरा मिनिटांची आमची भाषणे झाली आणि आमची सभा संपली. तेवढ्यात ज्या म्हातारबुवाने आम्हांला बोलावले होते, ते तेथे आले.
राघूआण्णांनी म्हाता-याला विचारले,
''येथे पोलिस पार्टी आहे, असे आम्हांला सांगितले होते; पण पोलीस तर कुठे दिसले नाहीत.''
त्याने सांगितले,
''येथे आहेत जरूर, पण त्यांची मी व्यवस्था करून आलो, म्हटले ना ? ते चिक्कार दारू पिऊन पडून राहिले आहेत. त्यांना येथे काय चालले आहे, हे माहीत सुद्धा नाही. तुमची सभा नीट झाली ना ? आता हे पोर बरोबर घ्या आणि तो दाखविल, त्या रस्त्याने बाहेर पडा. मात्र रात्रीच वारणा ओलांडून पलीकडे जा, मग कुठे तरी थांबा. मात्र तोपर्यंत थांबू नका.'' असा त्यांनी सल्ला दिला व सोबतीला एक मुलगा दिला.
या तरुणाला बरोबर घेऊन, तो दाखवील, त्या रस्त्याने गावाच्या बाहेर पडलो आणि शेतातील पायवाटेने पुढे चालू लागलो.
आम्ही पुढे कुठे जाणार, याची आम्हांला काहीच कल्पना नव्हती. तास, दोन तास वाटचाल केल्यावर आम्हांला वारणा नदी लागली. तो मुलगा माहीतगार असल्याने त्याने आम्हांला नदीच्या उतारावर नेऊन पोहोचविले आणि सांगितले,
''येथे नदी ओलांडून पलीकडे गेले, की कोल्हापूर संस्थानाची हद्द लागते. तेथे आम्ही निरोप पाठविला आहे. कोणी तरी तुमच्या मदतील येईल.''