त्यांनी सांगितले, ''अशा परिस्थितीत मी तुमचे नाव सुचविणे योग्य नाही. तुम्ही आपले जिल्हा काँग्रेसच सांभाळा.''
माझा मुक्काम त्यावेळी कायद्याच्या अभ्यासाकरता पुण्याला होता. त्यामुळे जिल्ह्यातून अटक होऊन येणा-या सत्याग्रहींचे पुणे स्टेशनवर स्वागत करावे, त्यांना सुताचे हार घालून त्यांचा सन्मान करावा आणि त्यांची मानाने जेलमध्ये रवानगी करावी, अशा तऱ्हेचे औपचारिक स्वरूपाचे काम मी करीत होतो. माझे हे कायद्याच्या परीक्षेचे दुसरे वर्ष होते. त्यातील पहिले सहा महिने माझे अभ्यासाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले होते. त्यातील पहिले काही दिवस प्रवास, चर्चा, अस्वस्थ मन, यामुळे अभ्यास न करण्यात वेळ गेला होता. त्यावेळी मी लॉ कॉलेजच्या समोर असलेल्या 'अध्यात्म भवन' या नावाच्या इमारतीत राहत होतो. माझे मित्र श्री. नानासाहेब अयाचित, मी आणि त्यांचे एक तरुण नातेवाईक अशा तिघांच्या भागीदारीत एक मोठी खोली आम्ही भाड्याने घेतली होती. माझ्याकडे येणा-या-जाणा-या लोकांची वर्दळ जास्त, त्यामुळे नानासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय येत असे; पण ते इतके सज्जन मित्र होते, की त्यांनी यासंबंधी कधी तक्रार केली नाही.
श्री. अयाचित यांचे जे नातेवाईक कायद्याचे विद्यार्थी होते, त्यांना आणि मला वाद घालण्याची मोठी हौस होती. सदर तरुणाचे मन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे झुकलेले होते आणि मी पक्का संघविरोधी होतो. जरी आर्. एस्. एस्. वाले वाटले, तरी ते मोठे सज्जन तरुण होते. देशात चाललेल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची आर्. एस्.ए स्. वाल्यांची एक वेगळी नजर होती, हे त्यावेळी माझ्या विशेष लक्षात आले.
त्यांचे आमचे हे असे पक्षभेद असले, तरी आम्ही 'अध्यात्म भवनात' काही महिने सलोख्याने राहिलो, ही गोष्ट कबूल केली पाहिजे. माझ्याकडे तेथे नेहमी येणारे माझे मित्र श्री. बिडेश कुलकर्णी हे तर, तेथे आले, म्हणजे या तरुण गृहस्थाला उद्देशून हाक मारणार,
''काय, खाकसार, चर्चा करायची काय?''
- आणि मग या दोघांमध्ये तुडुंब चर्चा होई. बिडेश कुलकर्णींचा आर्. एस्. एस्. वाल्यांकरता निवडून काढलेला शब्द 'खाकसार' हा अतिशय उचित शब्द होता. त्या वेळी हैदराबादमध्ये खाकसारांची चळवळ अशीच एकांगी तऱ्हेने वाढत होती, असे आम्ही वाचत होतो. त्यामुळे 'खाकसार' शब्दाची टोपी आमच्या संघवाल्यांना छान बसत होती.
आर्. एस्. एस्. च्या विचारासंबंधी आणि चळवळीसंबंधीची माहिती यापूर्वी मला जरूर झाली होती. मला आठवते, मी कोल्हापूरला कॉलेजला असताना एका सुट्टीत कराडला आलो होतो. त्यावेळी संघ-संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांची कराडला भेट चालू होती. १९३४-३५ सालचे ते दिवस असतील. कसे काय, कोण जाणे, घाटावरच्या रामाच्या मंदिरात त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी मलाही बोलावले होते आणि मी गेलोही होतो. डॉक्टर हेडगेवारांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी वाटले. परंतु त्यांनी सांगितलेल्या विचारांचा माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. मी त्यांना काँग्रेसच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न विचारले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याला उत्तरे दिली. ते आग्रहाने सांगत होते, की 'आमची हिंदुस्थानची व्याख्या मानणारे सगळे आमच्यांत सामील होऊ शकतील आणि - आसिंधू सिंधू....' वगैरे, ही बॅरिस्टर सावरकरांची व्याख्या पायाभूत धरून ते बोलत होते. 'या व्याख्येत जो जो बसेल, तो तो हिंदुस्थानचा खरा निष्ठावान नागरिक, अशी आमची भूमिका आहे,' असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.