''अरे, यशवंताला तर माझ्यापासून दूर पाठवून दिला. गणपतला तरी माझ्यापासून दूर करू नका.'' आई.
''आई, म्हणताहेत हे लोक तर दे परवानगी मला.'' गणपतराव.
आईने आपल्या काळजावर दगड ठेवून गणपतरावांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिली. साहेबांच्या सर्व मित्रांना आनंद झाला. सर्वांनी आईचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. गणपतराव तहानभूक विसरून कामाला लागले. निवडणूक चुरशीची झाली. साहेबांचं कार्य, मित्रमंडळींची साहेबांपोटी असलेली एकनिष्ठता कामी आली. गणपतरावांनी उभे केलेले सर्व उमेदवार निवडून आले. गणपतराव सर्वात जास्त मते घेऊन निवडून आले. निवडून आल्यानंतर सर्व उमेदवार आईचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी आले. आईनं सर्वांचं तोंड गोड केलं. 'एकदिलानं राहा, जनतेची कामं करा, माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील असे म्हणत चौघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आठ दिवसांनी नगराध्यक्षाची निवडणूक घेण्याचं जाहीर झालं. निवडून आलेल्या सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकी सर्व सदस्यांनी एकमुखानं गणपतरावांची नगराध्यक्ष म्हणून निवड केली. एक-दोन सदस्यांनी एकाच घरात दोन महत्त्वाची पदं कशाकरिता द्यायची, अशी कुजबूज सुरू केली; पण तिला काही प्रतिसाद मिळाला नाही. शिवाजीराव बटाणे, माधवराव घाटगे, गौरीहर सिंहासने, हरिभाऊ लाड, शांतारामबापू, माधवराव जाधव, ज्ञानोबा डुबल, तुकाराम शिंदे, राघूअण्णा लिमये आणि साहेबांच्या असंख्य चाहत्यांनी कष्ट घेतले. हे सर्वजण गणपतदादांच्या ॠणातून मुक्त झाले.
दुसर्या जागतिक महायुद्धानं ब्रिटिश राजवट खिळखिळी होत होती. जगावरील त्यांची पकड ढिली होऊ लागली. भारतीय स्वातंत्र्यचळवळीनं उग्ररूप धारण केलं होतं. भारतामधून महात्मा गांधी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद लोकचळवळीच्या रेट्यातून शेवटचा प्रहार ब्रिटिश सत्तेवर करीत होते तसेच सुभाषचंद्र बोस बाहेरून स्वतंत्र भारताची 'आझाद हिंद फौज' स्थापन करून ब्रिटिश भारतावर चाल करून येत असल्याचे कळल्यामुळे हैराण झालेलं ब्रिटिश सरकार भारताच्या स्वातंत्र्याविषयी गांभीर्यानं विचार करू लागलं. चळवळीच्या प्रखर मार्यानं भारतातील कायदा आणि प्रशासन कोसळून पडलं. शेवटी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारला घ्यावा लागला. १५ ऑगस्ट १९४७ हा सोनियाचा दिवस उगवण्यापूर्वी १४ ऑगस्टच्या मध्यरात्री ब्रिटिश ध्वज उतरून भारतीय तिरंगा मोठ्या दिमागानं दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकू लागला.
साहेब मुंबईतच होते. साहेबांचं वास्तव्य मरीन लाईन्सला होतं. स्वातंत्र्य चळवळीतील साहेबांचे जीवाभावाचे सवंगडी १४ ऑगस्टलाच मुंबईत त्यांच्या निवासस्थानी येऊन पोहोचले. महात्मा गांधींच्या एका हाकेवर अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या वेदीवर कुर्बान केली. अनेक मातांनी आपल्या पोटच्या गोळ्याला सुळावर चढताना पाहिलं. फासावर लटकविताना पाहिलं. अनेकांचा वंशबूड झाला तो केवळ आजच्या या एका दिवसाकरिता... साहेबांची नजर भिंतीकडे गेली. महात्मा गांधींचा फोटो भिंतीवर नाही हे साहेबांच्या लक्षात आले. साहेब कुणालाही न सांगता घराबाहेर पडले. मरीन लाईन्सला आले. महात्मा गांधींचा फोटो मिळविला. घरी आले. भिंतीवर त्यांचा फोटो लावला. या वेळी सर्व मित्र साहेबांकडे पाहतच राहिले. कारण साहेबांनी पूर्ण गांधीवाद कधीच स्वीकारला नव्हता; पण आजचे साहेबांचे रूप पाहून सर्व मित्रांना आनंद झाला.