सह्याद्री
काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीची बैठक मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ३० मार्च १९४६ रोजी होणार असल्याचं पत्र साहेबांना मिळालं. जिल्ह्यातील वयोवृद्ध नेते भाऊसाहेब सोमण यांच्यासह सातारा जिल्ह्यातून निवडून आलेले सर्व प्रतिनिधी मुंबईला पोहोचले. मंत्रिमंडळ बनविण्याबद्दल चर्चा सुरू झाली. सोमण यांनी तपासे या मागासवर्गीय उमेदवाराला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळावं याकरिता प्रयत्न सुरू केले. बाळासाहेब खेर साहेबांना ओळखतही नव्हते. के. डी. पाटील आणि मोरारजी देसाई यांची येरवडा जेलमध्ये ओळख झालेली होती.
के. डी. पाटील साहेबांना म्हणाले, ''आपण मोरारजी देसाई यांना भेटू.''
साहेबांनी के. डी. पाटलांना नकार दिला.
उलट के. डी. पाटलांना साहेब म्हणाले, ''तुम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करून बघा.''
के. डी. पाटलांना मंत्रिमंडळात जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. प्रयत्न करायचा तो साहेबांसाठी, असं त्यांनी ठरवलं होतं.
माधव आश्रमात साहेब एकटेच वर्तमानपत्र वाचत बसले होते तोच खोलीचा दरवाजा खटखटल्याचा आवाज आला. साहेबांनी खोलीचा दरवाजा उघडला तर समोर आमदार बाबासाहेब शिंदे व त्यांच्यासोबत शिराळा येथील माधवराव देशपांडे. बाबासाहेबांनी साहेबांना बाहेर चालण्याचा आग्रह केला.
साहेब त्यांना म्हणाले, ''के. डी. पाटील बाहेर गेलेत. ते आले म्हणजे आपण जाऊत.''
त्यांच्यासोबत आलेले देशपांडे म्हणाले, ''तुम्हाला एकट्यालाच घेऊन येण्याचा निरोप आहे त्यांचा.''
साहेबांनी देशपांड्यांना विचारण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. साहेब बाबासाहेबांनी सोबत आणलेल्या गाडीत बसले. समोरच्या सीटवर देशपांडे बसलेत. गाडी वेगाने कुठे जातेय हे साहेबांना कळेना.
तेवढ्यात देशपांडे म्हणाले, ''बाळासाहेब खेरांनी तुम्हाला घेऊन यावयास सांगितलं आहे. आपण बाळासाहेब खेरांकडे जात आहोत.''
गाडी बाळासाहेब खेरांच्या बंगल्यासमोर थांबली. साहेब आणि ते दोघे गाडीतून उतरून बंगल्यात शिरले. खेरांनी साहेबांचं स्वागत केलं.
खेर म्हणाले, ''चव्हाण, मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही; पण पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मी तुमची निवड केलेली आहे. तुम्हाला लवकर कामावर हजर व्हावं लागेल.''
''मला लगेच हजर होता येणार नाही. मला थोडा अवधी लागेल हजर व्हायला.'' साहेब.
बाबासाहेब शिंदे आणि साहेब बंगल्याबाहेर आले. बाबासाहेब शिंदेंचा साहेबांमध्ये जीव होता. त्यांनी साहेबांना ही संधी दवडू नका म्हणून सल्ला दिला. साहेबांनी 'बघू' म्हणत बाबासाहेबांचे आभार मानले व टॅक्सी करून माधव आश्रमात आले.