रात्रीच्या शाळेच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी साहेबांवर सोपवली. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे बहुजनांतील आदरणीय व्यक्ती होते. त्यांना कसं आणि कुणामार्फत भेटावं याचा विचार साहेब करू लागले. साहेबांनी आपण स्वतःच त्यांना भेटण्याचा शेवटी निर्णय घेतला. सकाळी सकाळी रेल्वेनं साहेब पुण्याला पोहोचले. रेल्वेस्टेशनवरच तोंड, हातपाय धुऊन तयार झाले. कपडे बदलण्याचा प्रश्न नव्हता. आहे त्या कपड्यांना झटकून ठाकठीक केलं. तोपर्यंत चांगलं उजाडलं होतं. विचारपूस करीत साहेब कर्मवीरांच्या घरी आठ-सव्वा आठला पोहोचले. पुण्यात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना 'आदरणीय कर्मवीर अण्णासाहेब शिंदे' म्हणत असत. योगायोगानं कर्मवीर अण्णासाहेब शिंदे घरीच होते. आस्थेवाईकपणानं साहेबांची विचारपूस कर्मवीरांनी केली. एक-दोन तास साहेबांसोबत चर्चा केली. घरात कोण कोण असतं याची चौकशी केली. साहेबांनी आईबद्दल थोडक्यात माहिती कथन केली. साहेबांचं सर्व म्हणणं शांतपणे कर्मवीरांनी ऐकून घेतलं व म्हणाले,
''मी येण्यास तयार आहे; पण माझी एक अट आहे.''
हे ऐकताच साहेबांचा चेहरा काहीसा पडल्यासारखा झाला. आशाळभूत नजरेनं साहेब कर्मवीर अण्णासाहेब शिंदेंकडे पाहू लागले.
कर्मवीर अण्णासाहेब पुढे म्हणाले, ''तुझ्या घरी हरिजन माझ्यासोबत पंगतीला जेवतील.''
साहेबांनी मागचा पुढचा विचार न करता 'चालेल' असा होकार दिला.
कर्मवीर अण्णासाहेबांनी पुढे विचारलं, ''घरी विचारून आलास काय ?''
साहेब म्हणाले, ''नाही.''
पुढे त्यांनी सांगितलं, ''अठरापगड जातींची माझी मित्रमंडळी माझ्या घरी येतात. त्यात हरिजनही असतात. माझी आई सर्वांना माझ्याच रूपात बघते.''
सर्व खात्री पटल्यानंतरच कर्मवीर अण्णासाहेबांनी कराडला येण्याचं मान्य केलं. दिलेल्या तारखेला अण्णासाहेब कराडला आले. शहरभर पायी फिरले. दलित वस्तीत हिंडले. हरिजन वाड्यात रात्रीच्या शाळेचं उद्घाटन केलं. त्यांच्यासोबत रमले. साहेबांच्या घरी दलित मंडळींसोबत जेवण घेतलं. या घटनेमुळं साहेबांचा दलित वस्तीत काम करण्याचा हुरूप वाढला.
साहेब महार वस्तीत फळा, खडू व काही पुस्तके घेऊन त्यांच्या एकत्र जमण्याच्या ठिकाणी गेले. पहिल्या दिवशी पाच-सहा मुले जमली. साहेबांनी त्यांना शिकविलं. दुसर्या दिवशी साहेबांना कळलं की ही शाळेत जाणारी मुलं आहेत. त्या वस्तीतील एका सद्गृहस्थाला साहेबांच्या चिकाटीची दया आली आणि त्यांनी पाच-दहा प्रौढ अशिक्षितांना रात्रीच्या शाळेत येण्याबद्दल सांगितलं. तीन-चार महिन्यांनंतर या शाळेकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही. साक्षरतेचे वर्ग चालविले. प्रौढ शाळा आपोआपच बंद पडली. हायस्कूलमधील दोन-चार हरिजन मुलं आता कॉलेजमध्ये शिकत होती. ती साहेबांच्या परिचयाची होती. त्यांच्याशी साहेबांनी संपर्क साधला. त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या एका टोकाच्या होत्या. ''मंदिरप्रवेश, शिक्षणाचा श्रीगणेशा याबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार जाणवला. अन्याय करणार्यांकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाच ठरेल. आता आमचे प्रश्न आम्हाला आमच्या ताकदीवर सोडवावे लागतील याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहिली नाही. डॉ. आंबेडकर आमचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. आम्ही केवळ त्यांचे नेतृत्व मानतो.'' अशा त्या भावना आहेत.