म्हणाले, ''मी मुख्यमंत्री झालो म्हणजे हा लोकशाहीचा विजय आहे. माझ्यासारखा सामान्य घरातील मुलगा कर्तृत्वाच्या बळावर इथपर्यंत येऊन पोहोचतो ही लोकशाहीची देण आहे. नेहरूजींच्या समाजवादी विचाराचा हा विजय आहे. ज्यांच्यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यांच्या जीवनात स्वराज्य निर्माण करायचं आहे. स्वराज्य म्हणजे त्यांना असं वाटायला पाहिजे की, हे माझंच राज्य आहे. मी माझ्या उन्नतीसाठी अधिक काम करावयास पाहिजे. माझी उन्नती झाली म्हणजे माझ्या राज्याची उन्नती होईल ही भावना सामान्य नागरिकाच्या मनात फुलवायची आहे. हे त्यांच्या कष्टाला व घामाला प्रतिष्ठा मिळेल तेव्हाच शक्य आहे. त्यांच्या पदरात कष्टाचं उचित मूल्य पडलं म्हणजे ते आपलं जीवन सुखासमाधानानं जगतील. सर्वात शेवटचा माणूस सुखी झाला म्हणजे लोकशाहीचा उद्देश सफल होईल. हे कारणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा येथे शांतता नांदेल.
भारत सरकारनं आतापर्यंत चौदा प्रादेशिक भाषांना राजमान्यता दिली आहे. या चौदा भाषा भारतामध्ये आपापला विकास साध्य करीत आहेत. देशाच्या प्रगतीमध्ये कुठे त्यांचा अडथळा निर्माण होताना दिसत नाही. आपल्या प्रांतात दोन भाषा आहेत. या दोन भाषा एकदुसर्याच्या भगिनी आहेत, आमच्या कन्या आहेत. त्यांच्या विकासाकरिता समान धोरण आखलं जाईल. देशहिताचा विशाल दृष्टिकोन समोर ठेवून मुंबई राज्य द्वैभाषिकाच्या रूपानं मराठी-गुजराथी बांधवांच्या हाती मोठ्या विश्वासानं सुपूर्द केलं आहे. कुठलाही किंतु मनात न ठेवता आपल्याला या द्वैभाषिकाचा विकास साधावयाचा आहे. एक नवीन इतिहास निर्माण करावयाचा आहे. भारतीय लोकशाहीनं समाजवादी समाजरचनेचं ध्येय अंगीकारलेलं आहे. हे साध्य करण्याकरिता वेगवेगळे मार्ग अवलंबिले जाऊ शकतात. विचार वेगवेगळे असू शकतात. या वेगळ्या विचाराचं स्वागतही करण्यात येईल; पण ते विचार देशहिताचे व सकारात्मक विचार असावयास पाहिजे. सामान्यांचं भलं करणारे असावेत.
या राज्याची धुरा माझ्यावर सोपवलेली आहे. ही धुरा यशस्वीपणे सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. त्यात मी कुठलीही कुचराई करणार नाही. या राज्यात जात, धर्म, पंथ व भाषा या भेदांना आश्रय मिळणार नाही. सर्वांना समान वागणूक मिळेल. राज्य उदयाला आलं त्या दिवशी भाषिकवाद संपला. हे राज्य महात्मा गांधी, लोकमान्य टिळकांची कर्मभूमी आहे. सरदार पटेल, विनोबा भावे यांचं कर्तृत्व देशानं मान्य केलं आहे. त्यांच्या कर्तृत्वाला कुठे कमीपणा येईल अशी वर्तणूक आपल्या हातून होता कामा नये याची दखल आम्हाला घ्यावी लागेल. वंचितांच्या जीवनात सुखाची प्रभा फाकताना मला पाहावयाची आहे. याकरिता वडीलधार्यांच्या अनुभवाची शिदोरी माझ्या पाठीशी हवीय. तरुणांचं सहकार्य माझ्या बरोबरीनं हातात हात घालून चाललं तरच सामान्य माणसाचं भलं या राज्यात होईल.''
कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील साहेबांच्या चाहत्यांची रीघ घरी लागलेली. कराडला केव्हा येणार ? सांगलीला सत्कार आयोजित करायचा आहे. निरोपावर निरोप येताहेत. मुंबईतील कारखानदार, उद्योगपती, भांडवलदार साहेबांना अजमावून पाहताहेत. या राज्यात आपल्याला संरक्षण मिळेल किंवा नाही याची चाचपणी करताहेत. साहेब प्रत्येकाचं समाधान करण्यात गुंतलेले. भविष्यात मुंबईत गुंतवणूक करावी किंवा नाही या विचारानं भांबावलले हे भांडवलदार साहेबांना बैठकांना बोलावू लागले. साहेब त्यांच्या पंचतारांकित बैठकांना जाऊन सहज, लीलया त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांचं समाधान करू लागले. त्यांच्यात विश्वास निर्माण करू लागले. भांडवलदार आपापसांत कुजबुजू लागले, 'ए मराठी छोरा कुछ और है.' साहेब त्यांच्याशी बोलताना मधूनच गुजराती साहित्यातील सुभाषितांची पेरणी करू लागले. साहेबांनी या भांडवलदार मंडळींचा विश्वास संपादन केला.