गौरीहर सिंहासने, राघूअण्णा लिमये, निगडीकर मास्तर, शिवाजीराव बटाणे आणि बाबुराव कोतवालांसह साहेब कराड रेल्वेस्टेशनवर पोहोचले. साहेबांना निरोप देण्यासाठी कराडातील नागरिक रेल्वेस्टेशनवर अगोदरच पोहोचलेले होते. साहेबांनी रेल्वेस्टेशनवर एक छोटेखानी भाषण दिलं.
म्हणाले, ''आता निवडणूक संपली आहे. आपापसांतील वैरभाव विसरून जा. ज्यांनी आपल्याविरोधात निवडणुकीत आगळीक काढली असेल त्यांना क्षमा करा. कारण त्यांना आपण काय करीत आहोत याचं भान राहिलेलं नसेल. त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करायचं आहे. त्या सर्वांचं सहकार्य या कामी आपल्याला लागणार आहे. तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी सदैव राहो, ही अपेक्षा.''
साहेब सर्वांच्या शुभेच्छा सोबत घेऊन रेल्वेत जाऊन बसले. रेल्वे साहेबांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली.
नेता निवडीकरिता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली. खेर यांनी निवडणुकीला उभे न राहण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. खेर-मोरारजींची जोडी अशा तर्हेनं फुटली. साहेब, भाऊसाहेब हिरे, गाडगीळ, कुंटे यांनी महाराष्ट्र प्रांतात काँग्रेसचा गड शाबूत ठेवल्यानं विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांनी या चौघांचं वैयक्तिक भेटून अभिनंदन केलं. विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड बिनविरोध होणार हे निश्चित होतं. मोरारजी देसाई यांचे पक्षश्रेष्ठींशी असलेले संबंध, मुंबई आणि गुजरातच्या आमदारांचा भरभक्कम पाठिंबा या बाबी लक्षात घेऊन मोरारजी देसाई यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमुखानं निवड करण्यात आली. दुसर्याच दिवशी मोरारजी देसाईंनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकार्यांची नावं जाहीर केली.
भाऊसाहेब हिरे यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलं. साहेबांकडे नागरी पुरवठा, समाजकल्याण आणि जंगल खात्याची जबाबदारी देण्यात आली. भाऊसाहेब हिरे यांच्याकडे प्रांतिकचं अध्यक्षपदही होतं. इतर जिल्ह्यांतून मंत्रिमंडळात प्रतिनिधी घेताना प्रांताध्यक्षाशी सल्लामसलत करावी असा संकेत असताना मोरारजी देसाईंनी हा संकेत पाळला नाही. सातारा जिल्ह्यातून मालोजीराजे नाईक निंबाळकर व तपासे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. याबद्दल पक्षाच्या प्रांताध्यक्षांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. भाऊसाहेब हिरे यांना हा आपला अवमान वाटला. त्यांनी हा प्रश्न धसास लावण्याचं ठरविलं. ही कटुता टाळण्यासाठी साहेबांनी हिरे यांची समजूत काढली. म्हणाले, एकदा पक्षनेता निवडल्यानंतर मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं तो अधिकार त्या नेत्याचा असतो. साहेबांच्या शिष्टाईनं हा प्रश्न मिटला.
साहेब व हिरे यांना मिळालेली खाती ग्रामीण जनतेच्या जीवनाशी निगडित आहेत. मोरारजी देसाईंनी ग्रामीण व शहरी जनतेच्या आशा-आकांक्षांना न्याय दिला. महसूल खात्याच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न धसास लावता येतील. नागरी पुरवठा खाते मध्यमवर्ग व मजूर जनतेशी निगडित आहे. समाजकल्याण खाते हे उपेक्षित व वंचितांच्या कल्याणाकरिता राबविता येणार होते. मुख्यमंत्र्यांनी खातेवाटपासोबतच त्या त्या खात्याच्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्थाही जाहीर केली. साहेबांना मलबार हिलवर 'ऐरी बंगला' मिळाला. गृहखात्यात पार्लमेंटरी सचिव असताना खाजगी सचिव म्हणून साहेबांच्या सान्निध्यात आलेले डोंगरे यांना साहेबांनी आपल्याकडे घेतले. त्यांनी ऐरी बंगला ताब्यात घेतला. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बंगल्यात साहेबांना पाहिजे तशी व्यवस्था करून दिली.
साहेबांनी सचिवालयात जाऊन आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारली. त्या खात्यातील अधिकारी व कर्मचार्यांची बैठक घेतली. आपली काम करण्याची पद्धत त्यांना समजावून सांगितली.
म्हणाले, ''आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. त्यांचे प्रश्न सोडविणे हे आमचं आद्यकर्तव्य आहे. आपण जर मला सहकार्य दिलं तर मी जनतेला न्याय देऊ शकेल.'' साहेबांनी कर्मचार्यांचा विश्वास संपादन केला.