मीही या निवडणुकीच्या प्रचारात प्रथम भाग घेतला. डुबल गल्लीतील मला ओळखणार्या सौ. डुबल अक्का, सौ. घाडगे वहिनी, श्रीमती मुजावर भाभी यांना सोबत घेऊन मी कराडच्या गल्लीबोळात फिरले. स्वातंत्र्यचळवळीत मला अटक झाल्याची बातमी घराघरांत पोहोचलेली होती. मी ज्या रस्त्यानं जायचे त्या रस्त्यातील सर्व आयाबहिणी मला पाहण्यासाठी घरासमोर येऊन उभ्या राहायच्या. काही वयस्कर माता माझ्या गालावरून हात फिरवून त्यांच्या कानाजवळ हात लावून बोटं मोडायच्या. या वेळी मला गहिवरून यायचं. काही माझ्या वयाच्या महिला मला पाहून आपले अश्रू पदरानं टिपायच्या. मलाही भडभडून यायचं, कंठ दाटून यायचा; पण बोलू शकत नसे. मी फक्त हात जोडीत पुढे चालायचे. संपूर्ण कराडच्या गल्लीबोळात मी फिरले. मला महिला भगिनींकडून जो प्रतिसाद मिळाला त्यावरून मी अंदाज बांधला की साहेब निवडून येतील.
विरोधी पक्षाकडून साहेबांवर अनेक आरोप झाले. साहेबांनी संयम पाळला. वैयक्तिक कोणावरही आरोप न करता पक्षाची भूमिका सामान्य माणसांपर्यंत पोहोचविली. याचा चांगला परिणाम मतदारांवर झाला. साहेबांनी ही निवडणूक जिंकली. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र प्रांतात भरघोस यश मिळालं. शे. का. पक्षाच्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला. त्यांचं सत्ता काबीज करण्याचं स्वप्नं भंग पावलं. शेवटी काँग्रेसच्या ध्येयधोरणांचाच विजय झाला.
घरात आनंदाचं उधाण आलेलं. गेल्या सहा वर्षांत घराची झालेली धूळधाण साहेबांना आठवली. माझ्या आयुष्याच्या बांधणीत जे पायाचे चिरे झालेत ते माझे दोन्ही बंधू, माझ्या एक वहिनी, माझ्या अक्काचं सौभाग्य, माय आणि मातीने माझं केलेलं संगोपन मी विसरू शकणार नाही. माझ्या कुटुंबाच्या सुखदुःखाला आपलंसं करून घरातील सर्व सदस्यांची एकत्र माळ गुंफून ती माळ तुटणार नाही याची काळजी वाहणारी माझी पत्नी -वेणू हिचा त्याग, स्वातंत्र्यचळवळीत ज्यांनी आपले प्राण मायभूमीवर निशावर केले ते माझ मित्र के. डी. पाटील, चंद्रोजी पाटील, बालमित्र अहमद कच्छी यांची आठवण झाली. घरात पै. पाहुण्यांची रीघ लागलेली. साहेब सतत कार्यकर्त्यांच्या आणि मित्रांच्या गराड्यात अडकलेले. मुंबईहून सारखे निरोप येत आहेत - 'लवकर मुंबईला निघून या.'
साहेबांनी मुंबईला जाण्याचा बेत आखला. आपल्या दोन चिमण्या आणि सर्व पाखरांना जवळ घेतलं. त्यांच्याशी लाडालाडानं बोलले.
सोनू वहिनीला म्हणाले, ''या चिल्ल्यापिल्ल्यांची आई होऊन यांना तुम्हाला घडवायचे आहे. आई आता थकल्या आहेत. वेणू माझ्यासोबत मुंबईला राहील.''
''मी एकटी नव्हे, आईपण माझ्यासोबत मुंबईला येतील.'' मी.
सर्व मुलं साहेबांना बिलगली. साहेबांनी छोट्या राजाला उचलून कडेवर घेतलं. त्याचे गालगुच्चे पकडले. तोही न डगमगता कड्यावरून काकाच्या खांद्यावर चढण्याचा प्रयत्न करू लागला. साहेबांनी राजाला माझ्या हवाली केलं. आईचं दर्शन घेतलं. आईनं तोंडभरून आशीर्वाद दिला - ''यशवंत हो.''
बाहेर बैठकीत बाबुराव कोतवाल आल्यागेल्याचं चहापाणी पाहत होते. साहेब बैठकीत आले. सर्व मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी उरभेट घेतली. सर्वांचे आभार मानले. सर्व कार्यकर्त्यांचा ऊर अभिमानानं भरून आलेला. विजयाचा आनंद कार्यकर्त्यांच्या चेहर्यांवर ओसंडून वाहत होता. साहेब प्रत्येकाच्या हातात हात मिळवून त्यांच्या पाठीवर थाप मारीत होते. बैठकीत आलेल्यांना भेटून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.