थोरले साहेब - ८६

या बैठकीत कार्यकर्त्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.  मनोगत व्यक्त करण्यामध्ये पाटीलभाऊ, हरिभाऊ लाड, पुण्याचे पी. डी. पाटील, शिवाजीराव बटाणे, राघूअण्णा लिमये, माधवराव जाधव, ज्ञानोबा डुबल, सिंहासनेअप्पा, कासेगावकर वैद्य, बाबुराव कोतवाल, शांतारामबापू, बाबुराव काळे, बदियानी, गजानन पावसकर, राजाभाऊ बळवडे, बाबुराव चिवटे, नारायणराव घाडगे, ग्रामीण भागातून - कार्वे गावातून आत्माराम जाधव, पार्लेबनवाडीतून आबासाहेब पाटील, चरेगावचे गांधी बाबा, निगडीचे निगडीकर मास्तर, काशिनाथ देशमुख, व्यंकटराव माने, उरुलचे जयसिंगराव, रेठर्‍याचे विष्णू पाटील होते.  या सर्व मंडळींनी साहेबांना निवडून आणण्याच्या आणाभाका घेतल्या.

शे. का. पक्षानं साहेबांची चोहोबाजूंनी नाकेबंदी केली.  त्या पक्षानं उमेदवाराची निवड अत्यंत धूर्तपणे केली.  कराडमधील साहेबांचे जिवलग मित्र व्यंकटराव पवार यांचे पुतणे केशवराव पवार या उमेदवाराला उमेदवारी देऊन निवडणुकीची पहिली फेरी शे. का. पक्षानं जिंकली.  केशवराव पवार हे बहुले या आपल्या गावी राहत असत.  व्यंकटराव मूळचे काँग्रेसचे.  साहेबांचे कराडमधील विश्वासू मित्र.  त्यांचा कराडच्या राजकारणात दबदबा होता.  याचा फायदा केशवराव पवारांना होणार होता.  व्यंकटरावांना मानणारे सर्व कार्यकर्ते शे. का. पक्षात गेल्यानं साहेबांनी वार कुणावर करायचा ?  हे सर्व कार्यकर्ते साहेबांसाठी जीवाची बाजी लावणारे; पण आज विरोधात गेलेले.  चळवळीत खांद्याला खांदा लावून एकत्र लढलो, तुरुंगवास भोगला, एका ताटात जेवलो, रक्ताच्या नात्यापेक्षा एकमेकांच्या जवळ आलो, हे नातं प्राणपणानं जपलं; पण आज तेच एकमेकांवर उलटले.  एकदुसर्‍यावर शब्दास्त्रांचे वार करू लागले.  महाभारतातील अर्जुनाच्या मनःस्थितीत साहेब पोहोचले.  कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव या रक्ताच्या नात्यातील युद्धाला तोंड फुटणार होतं.  या युद्धात स्वार्थ होता.  कौरवांनी अनीतीनं राज्य बळकावलं होतं.  पांडव नीतीनं ते मिळविण्याच्या प्रयत्‍नात होते.  नीती विरुद्ध अनीती असा हा महाभारतातील संघर्ष होता.  त्यात दोन्ही बाजूंचा स्वार्थ होता.  साहेबांचा हा संघर्ष स्वार्थासाठी नव्हता.  साहेबांना वैयक्तिक कुठलं राज्य मिळवायचं नव्हतं.  केवळ वंचितांच्या उत्कर्षासाठी सत्ता मिळवून ती राबवायची होती.  कौरव-पांडवांची रक्ताची व पैपाहुण्यांची नाती होती.  साहेबांची नाती ध्येयानं प्रेरित झालेल्या अठरापगड जातीतील मित्रत्वाची नाती होती.  ती स्वार्थाची नव्हती तर ती त्यागाची होती.  हा एक फरक अर्जुन आणि साहेबांच्या मनःस्थितीमध्ये होता.  

कराडमधून साहेबांनी उमेदवारी अर्ज भरला.  प्रचाराची धुळवड सुरू झाली.  साहेबांच्या त्यागाची बाजी पणाला लागली.  निःस्वार्थ स्वातंत्र्य चळवळीतील भाग, त्यात घराची झालेली होरपळ, राजकीय चारित्र्यसंपन्नता, नैतिकतेचं अधिष्ठान, जीवाला जीव देणारी मित्रमंडळी, तळागाळातील समाजाची दुःखं ही आपलीच दुःखं मानून त्यांच्याशी साधलेली जवळीक, नेहरू-गांधींवर असलेली निष्ठा या सर्व साहेबांच्या गुणांचा परिणाम मतदारांवर जाणवत होता.  

साहेब नेहमी म्हणत, ''माणसाचं मोठेपण त्याच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या आजूबाजूच्या असणार्‍या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं.''

साहेबांनी अशी कार्यकर्त्यांची पलटण चळवळीतून निर्माण केली होती.  गौरीहर सिंहासने यांच्या गांधीजींप्रती असणार्‍या निष्ठा, बाबुराव कोतवालांचा त्याग, राघूअण्णा लिमये यांचं जातीविरहित कार्य साहेबांना या निवडणुकीतून तारून नेणार याबद्दल साहेबांना विश्वास होता.

विरोधकांनी चाणक्यनीतीचा वापर करून साहेबांच्या विरोधात नानासाहेब बुधकर यांना उभे केले.  नानासाहेब बुधकर हे जातीनं ब्राह्मण व प्रसिद्ध वकील.  १९४८ ला गांधीहत्या झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी ब्राह्मणांची होरपळ झाली ती कराडमध्ये झाली नाही.  त्याचं कारण साहेबांचे कार्यकर्ते.  साहेबांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कराड तालुक्यात ब्राह्मणांचे संरक्षण केले.  ब्राह्मणांची मते शेकापच्या उमेदवाराला मिळणार नव्हती.  ती मते साहेबांना मिळू नयेत म्हणून ब्राह्मण उमेदवार उभा केला.  या उमेदवाराच्या उमेदवारी अर्जावर बहुजन समाजातील नामांकित वकील पी. डी. पाटील यांची सूचक म्हणून सही घेतली.  हा कुटिल डाव पी. डी. पाटील यांच्या लक्षात आला.  पी. डी. पाटील यांनी मोठ्या बुद्धिचातुर्याने नानासाहेबांचा अर्ज काढून घेतला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org