थोरले साहेब - ८५

म्हणाले, ''ग्रामीण जनतेचे प्रश्न घेऊन ते तुमच्यासमोर येणार आहे.  ते हे प्रश्न काँग्रेसमध्ये राहूनही सोडवू शकले असते; पण त्यांनी या प्रश्नांकरिता वाममार्ग स्वीकारला, जो बहुजन समाजाच्या हिताचा नाही.  तो बहुजनांच्या उन्नतीला मारक आहे.  काँग्रेस शेतकरी, शेतमजूर आणि बहुजनांच्या हिताचा कार्यक्रम राबविण्यासाठी बांधलेली आहे.  नेहरूजींनी तसा निर्धार केलेला आहे.  आर्थिक आणि सामाजिक न्यायासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करणार आहे.  शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरेबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली.  गांधी-नेहरूंनी शिवाजी महाराजांप्रमाणे सर्व जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन हे स्वातंत्र्य मिळविलं आहे.  या स्वातंत्र्याला सुराज्यात आपल्याला बदलायचं आहे.  प्रत्येक भारतीयाला वाटलं पाहिजे, हे राज्य माझं आहे.  ग्रामीण भागातील अठरापगड जातीतील लोकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता काँग्रेस शर्थीचे प्रयत्‍न करीत आहे.  या धनदांडग्या मंडळींच्या भूलथापांना बळी पडू नका.''

या दौर्‍याचा परिणाम असा आला की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनता काँग्रेसच्या पाठीमागे एकवटली.  साहेबांच्या दौर्‍यामुळं बहुजन समाजातील पिचलेला, दबलेला वर्ग जागृत झाला.  त्याला आपले प्रश्न कोण सोडवू शकतो याची जाण आली.  या धनदांडग्यांनीच सत्तेवर जो कोणी येईल त्यांचे मांडलिकत्व स्वीकारून या वर्गावर अन्याय-अत्याचार केले होते व आपले वर्चस्व अबाधित ठेवले होते.  याची जाणीव साहेबांनी सर्वहरा वर्गाल करून दिली.  जन्मानं स्वतःला श्रेष्ठ मानणारा वर्ग या धनदांडग्यांच्या विरोधात होताच.  हा वर्ग धर्मवर्चस्वाला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्‍नात काँग्रेसपासून दूर चालला होता.  तो काँग्रेसला पर्याय शोधत होता.  काकासाहेब गाडगीळ त्यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आपण राहिलं पाहिजे असं पटवून देऊ लागले; पण गाडगिळांना म्हणावं तसं यश मिळताना दिसत नव्हतं.  तशाही परिस्थितीत ते प्रामाणिकपणे प्रयत्‍न करीतच होते.  महाराष्ट्राच्या राजकीय, वैचारिक घुसळणीतून साहेबांना काँग्रेसचा विजय खेचून आणावयाचा होता.  

महाराष्ट्र प्रांतात निवडणुकीचं रूपांतर युद्धभूमीत झालं.  विचारांचं तुफान महाराष्ट्र प्रांतावर घोंगावू लागलं.  युद्धभूमीत एका बाजूनं शे. का. पक्ष तर दुसर्‍या बाजूनं काँग्रेस पक्ष.  या निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकाला पराजित करण्याच्या ईर्षेनं उतरलेले सेनापती आपापली रणनीती आखण्यात दंग झाले होते.  अशा या वादळात साहेबांची उमेदवारी कोलमडून पडते की काय असं वातावरण कराड मतदारसंघात निर्माण करण्यात आलं होतं.  साहेबांना आपल्या मतदारसंघाच्या चक्रव्यूहात अडकवून ठेवण्यात विरोधकांना यश आलं होतं.  

साहेब वेळ काढून कराडला आले.  त्यांनी काँग्रेसच्या तरुण व वयोवृद्ध कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली.  या बैठकीत साहेबांना प्रकर्षानं जाणीव झाली ती आत्माराम पाटील यांची.  आत्माराम पाटलांसारखा पाठीरामा आज आपल्या पाठीशी नाही.  ते आपल्याला सोडून वेगळ्या वाटेनं रॉयसोबत गेले, ज्यांनी मला व माझ्या कुटुंबाला जीवनमरणाच्या खाईतून ओढून काढलं आणि जिल्ह्याचं नेतृत्व माझ्या हवाली केलं ते त्यागमूर्ती कै. के. डी. पाटील, कै. चंद्रोजी पाटील आज आपल्यात नाहीत.  त्यांचा कुर्‍हाडीच्या राजकारणानं घात केला.  त्यांच्याविना मला हा विरोधकांचा चक्रव्यूह भेदता येईल का ?  मी यातून सहीसलामत यशस्वी होऊन बाहेर पडेल का ?  हे प्रश्न साहेबांना सतावू लागले.  आशेचा एक किरण तात्यासाहेब कोरे, जगताप, किसनवीर या मंडळींच्या रूपानं साहेबांना दिसला.  चळवळीतून मिळविलेले सर्व सवंगडी बैठकीला हजर असल्याचं पाहून साहेबांचा उत्साह वाढला.  मनात चाललेल्या नकारात्मक गोंधळाला साहेबांनी झटकून टाकलं.  त्यांच्यात निवडणुकीचं वारं संचारलं.

साहेब कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ''माझ्यासाठी संसाराची राखरांगोळी करणार्‍या माझ्या पाठीराख्यांनो, मी तुम्हाला आतापर्यंत काय दिलं याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा दुःख आणि कष्टाशिवाय मी तुम्हाला अधिक काही देऊ शकलो नाही असे मला वाटते.  तरीही तुम्ही माझी पाठराखण करीत आहात.  आपले काहीतरी ॠणानुबंध असावेत व ते बंध न तुटणारे आहेत.  आजची उपस्थिती हे त्याचं द्योतक आहे असं मला वाटतं.  ही निवडणूक नेहरू-पटेल यांच्या बहुजन व सर्वहरा वर्गाच्या उन्नतीच्या विचाराच्या पाईकाविरुद्ध वाट चुकलेल्या खानदानी धनदांडग्यांमध्ये होत आहे.  आपण सर्वजण नेहरू-पटेल यांच्या विचारांचे पाईक आहात.  या निवडणुकीत वाट चुकलेल्यांना पराभूत करून आपल्याला आपला विकास साधावयाचा आहे.''

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org