थोरले साहेब - ७९

या तणावग्रस्त वातावरणाचा माझ्या प्रकृतीवर झालेला परिणाम मला जाणवू लागला.  काम करताना मला थकवा येऊ लागला.  अशक्तपणा वाढीस लागला.  झपाट्यानं माझी प्रकृती खालावू लागली.  त्यात भागीरथीताईला क्षयाची लागण झाली.  मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवावं लागायचं.  त्यांना मिरजेच्या दवाखान्यात हलविलं.  राधाक्का त्यांच्या मदतीला त्यांच्यासोबत असायच्या.  घरातील कामं करता करता आणि मुलांना सांभाळता सांभाळता जीव रंजीस यायचा.  दिवस कसे निघून जाऊ लागले हे मला कळायचं नाही.  या दगदगीनं शेवटी मीही अंथरूण धरलं.  मला श्वासोच्छ्वास घेणंही अवघड झालं अशी माझी हालत झाली.  खोकल्याची उबळ आली की माझ्या जीवाची घालमेल व्हायची.  आता माझं बरंवाईट होतं की काय अशी शंका यायची.  

मलाही क्षयाची बाधा झाली.  क्षयानं माझ्या हाडामांसात मुक्काम केला.  माझी प्रकृती चिंताजनक झाली.  मी अंथरुणात वळकटीएवढी दिसू लागले.  आई हादरून गेल्या.  त्यांना काय करावं काही सुचेना.  त्यांनी शामराव पवारांना मुलांच्या हस्ते बोलावून घेतलं.  माझी बहीण चंद्रिकाताईला निरोप पाठविला.  निरोप मिळताच चंद्रिकाताई कराडला आली.  साहेबांचे जीवलग मित्र तात्यासाहेब कोरे यांच्या कानावर ही वार्ता गेली.  ते आईच्या मदतीला धावून आले.  ते आणि दादासाहेब जगताप यांनी डॉ. रणभिसे यांच्याशी संपर्क साधून त्यांना माझ्या प्रकृतीविषयी कल्पना दिली.

डॉ. रणभिसे यांनी एका स्वतंत्र इमारतीत माझी राहण्याची व्यवस्था केली.  डॉ. वालेनसची वेळ घेऊन ठेवली.  मिशन हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. जॉन्सन यांना कल्पना दिली.  तात्यासाहेब कोरे यांचे मित्र इंजिनियर अडके यांनी गाडीची व्यवस्था केली.  घरातून गाडीपर्यंत चालत येण्याइतकंही अवसान माझ्यात नव्हतं.  शामराव पवारानं लहान मुलाला उचलावं तसं मला उचलून गाडीत आणून ठेवलं.  गाडी मिरजेच्या वाटेला लागली.  माझ्यासोबत चंद्रिकाताई आणि शामराव पवार.  डॉ. रणभिसे यांनी व्यवस्था केलेल्या इमारतीत आम्ही उतरलो.  डॉ. रणभिसे यांनी डॉ. वालनेस आणि डॉ. जॉन्सन यांना बोलावून घेतलं.  या तिघांनी काही काळजीपूर्वक तपासणी केली.  क्षयावर नुकताच नवीन महागड्या औषधाचा शोध लागला होता.  या औषधानं माझा क्षय बरा होऊ शकतो असा निष्कर्ष या डॉक्टरांनी काढला.  माझ्यावर उपचार सुरू झाले.  साहेब, तात्यासाहेब कोरे, जगताप मिरजेला आले.  डॉक्टर्ससोबत त्यांनी चर्चा केली.  मला ठणठणीत बरं करण्याचं आश्वासन डॉक्टरांनी साहेबांना दिलं.  नंतर माझ्या खोलीत आले.

चंद्रिकाताईनं मला हलवून जागं केलं व म्हणाली, ''बघ कोण आलंय ते ?''

डोळ्यांवरील पापण्या उघडण्याचंही त्राण माझ्यात नव्हतं.  शरीराचं सरमाड झालं होतं माझ्या.  साहेबांनी माझा हात आपल्या हातात घेतला.  एकमेकांच्या स्पर्शानं अंतःकरणाच्या माध्यमातून आमचं बोलणं झालं.  स्पर्शाची भाषा एकमेकाला उमगली.  साहेब आज मिरजेत थांबले.  भागीरथीबाईची दवाखान्यात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.  त्यांना आणि राधाक्कांना भेटून धीर दिला.  त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था केली.  दुसर्‍या दिवशी साहेब मुंबईला परतले.  डॉक्टर एक दिवस चिंतेत पडले.  त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला.  मला रक्त द्यावं लागणार असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.  मिरजेला रक्त मिळणं अशक्य होतं.  मुंबईहून हे रक्त मागवून घेण्याचं डॉक्टरांनी ठरविलं.  त्यात एक अडचण निर्माण झाली.  रक्तपेढीतून रक्त बाहेर काढल्यानंतर काही तासांतच ते रुग्णाला द्यायला पाहिजे.  त्याकरिता वेगवान वाहनाची गरज होती; पण ते मिळणं अशक्य होतं.  त्यामुळे डॉक्टरांनी मिरजेतील आमच्या नातेवाइकांचे रक्त तपासून पाहण्याचा निर्णय घेतला.  काय योगायोग पाहा - साहेबांच्या मावसबहिणीचा मुलगा शामराव पवारांचा रक्तगट माझ्या रक्तगटाशी मिळाला.  या वेळी शामरावचं वय केवळ सोळा वर्षांचं होतं.  शामरावच्या रक्तानं मला जीवनदान मिळालं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org