थोरले साहेब - ६६

एके दिवशी मला विश्वासात घेऊन साहेबांनी विचारलं, ''वेणू, मी चक्रव्यूहात सापडलोय.  मला मार्ग दिसेनासा झालाय.  माझी बुद्धी काम करेनाशी झाली.  मी काय करू तूच सांग.''

''यापूर्वी तुमच्यावर अनेक संकटं आली तरी तुम्ही डगमगला नाहीत त्या वेळेस.  समर्थपणे मुकाबला केला त्या संकटांचा.  मग आजच असं काय झालं की, यातून तुम्हाला मार्ग काढता येत नाही ?''  मी.

''किती दिवस मी तुम्हाला त्रास देऊ ?  माझी काही जबाबदारी आहे की नाही ?  का तुम्हाला वार्‍यावर सोडून देशकार्य करीत राहू ?  माझ्या मनाला हे पटत नाही.  काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे.'' साहेब.

''तुम्हाला आठवत असेल - तुम्ही मला ९ ऑगस्ट १९४२ ला मुंबईहून पत्र लिहिलं होतं... त्यात तुम्ही लिहिलं होतं, 'तू माझं हृदय आहे, तर स्वातंत्र्यचळवळ माझा श्वास आहे.  श्वास आणि हृदय यांचा समन्वय माणसाला जिवंत ठेवतो.  मला जिवंत राहण्यास श्वास आणि हृदय सारखेच महत्त्वाचे आहे.  मी दोघांपासून दूर जाऊ इच्छित नाही.'  आठवा हे तुमचं पत्र आणि घ्या निर्णय.'' मी.

साहेब माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले.  माझ्या या आठवणीनं त्यांच्यातील देशभक्तीचा विचार जागा झाला.

मोठ्या आत्मविश्वासानं ते म्हणाले, ''वेणू, तुझ्या या आठवणीनं मी निर्णय घेतला - मला देशातील आपल्यासारखं जीवन जगणार्‍या हजारो-लाखो कुटुंबांसाठी तरी देशकार्य करायला पाहिजे.''

''तुम्ही घराची काळजी करू नका.  ज्ञानोबांच्या पत्‍नी सोनूताई, गणपतरावांच्या पत्‍नी भागीरथीताई व मी तुमच्या कच्च्याबच्च्यांना आणि आईला सांभाळण्यास समर्थ आहोत.  मुलांचे देवराष्ट्रचे घाटगेमामा, कामेरीचे जाधवमामा आमच्या मदतीला आहेतच.  आपले भाचे शामराव पवार आणि बाबुराव कोतवाल हे आमची काळजी घेताहेतच की... आपण निःसंकोच मनानं देशसेवा करावी.'' मी.

आई आणि माझ्यावर घराची जबाबदारी सोपवून साहेब मुंबईला पोहोचले.  स्वातंत्र्य मिळून जेमतेम सहा महिने लोटले.  खेर मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल धुसफूस सुरू झाली.  खेरांचा जातीय अहंकार आणि मोरारजींचा नागरी अहंभाव या धुसफुशीला कारणीभूत होता.  ग्रामीण भागातून निवडून आलेले प्रतिनिधी आर्थिक आणि सामाजिक प्रश्नासंबंधी उघडउघड बोलू लागले.  या सर्व प्रश्नांच्या बाबतीत खेर व मोरारजी उदासीन होते.  खेरांच्या आडून धर्मवर्चस्ववादी विचारावाले डोके वर काढू लागले.  बहुजन समाजातील सत्यशोधक विचाराची मंडळी या विचाराला ठेचून काढण्यासाठी टपून बसलेली.

अठ्ठेचाळीसचा जानेवारी उगवला.  ३० जानेवारीला स्वातंत्र्यावर मोठा आघात झाला.  गांधीजी या जगात राहिले नाहीत.  माथेफिरू विचारानं गांधीजींची हत्या केली.  देश पोरका झाला.  हत्या करणारा विचार महाराष्ट्राच्या भूमीत निपजला.  ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आता कुठे निवळत चालला होता; पण या दुर्दैवी घटनेनं त्यानं पुन्हा उचल खाल्ली.  मंत्रिमंडळाच्या कामकाजाबद्दलची नाराजी ही या घटनेच्या पथ्यावर पडली.  घडू नये ती घटना घडली.  ब्राह्मण समाजाचं जीवन उद्ध्वस्त करण्यात आलं.  महाराष्ट्राचं समाजमन दुभंगलं.  ग्रामीण भागात जाळपोळ झाली.  ब्राह्मणांची घरं लुटण्यात आली.  महाराष्ट्र सरकारनं तत्पर या विस्थापित समाजाला संरक्षण दिलं.  या विस्थापित समाजाचं पुनर्वसन शहरात केलं.  त्यांना अनुदान देण्यात आलं.  त्यांचे संसार सरकारनं उभे केले.  देशपातळीवरही हिंदू-मुस्लिम दंगे चालूच होते.  त्याला आवर घातला जावा याकरिता जनतेला सहभागी करून घेतलं पाहिजे हा विचार साहेबांना सुचला.  साहेब या वेळी गृहखात्यात काम करीत होते.  गृहमंत्री म्हणून मोरारजी देसाईंना प्रामुख्यानं या प्रसंगाला सामोरं जावं लागलं.  जनतेकडूनच जनतेला संरक्षण मिळालं पाहिजे हा विचार गृहखात्यासमोर आला.  साहेबांनी या कामात लक्ष घातलं.  सखोल असा अभ्यास केला.  या कामी साहेबांना न्या. गजेंद्रगडकर यांचे बंधू आणि माणेकशा यांचं साहाय्य लाभलं.  संपूर्ण मुंबई राज्यात पोलिसांना साहाय्यभूत ठरेल अशी समांतर होमगार्ड संघटना बांधली.  याचा फायदा सामान्य नागरिकांना झाला.  समाजातील सर्व स्तरातून या संघटनेला प्रतिसाद मिळू लागला.  मोरारजींनी या कामाबद्दल साहेबांचं कौतुक केलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org