थोरले साहेब - ६३

''आई, फार वर्षांपूर्वी आमच्याकडून एक चूक झाली होती.  आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत गणपतदादाच्या विरोधात उमेदवार उभा केला होता.  त्या वेळेस साहेबांना आम्ही कोल्हापूरहून प्रचाराकरिता बोलावून घेतलं होतं काँग्रेसच्या.  आम्ही सर्वांनी गणपतदादाच्या विरोधात काँग्रेसचा प्रचार केला होता.  गणपतदादा त्या निवडणुकीत पडले होते; पण त्यांनी आम्हाला आणि साहेबांना माफ केलं होतं.  मनात कुठलाच राग न ठेवता पुढील चळवळीत आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं.  लहान भावांप्रमाणं वागवलं आम्हाला.  हे ॠणच आहेत आमच्यावर गणपतदादाचे.  यातून आम्ही मुक्त होऊ इच्छितो.'' हरिभाऊ लाड.

या सर्व मंडळींनी आईची मनधरणी केली.  नगरपालिकेत गणपतरावांना उभं करून निवडून आणतो म्हणाले.

आईंनी गणपतरावांना बोलावलं अन् विचारलं, ''गणपत, या सर्वांचं म्हणणं आहे, तुला निवडणुकीला उभं करायचं.  तुझी तब्येत ही अशी तोळामासा झालेली.  निवडणुकीची दगदग तुला सोसंल का ?  विचार करून तूच काय ते सांग या लेकरांना.''

गणपतराव बैठकीत आले.  वाघासारखा दिसणारा माणूस; पण शेळी करून टाकला बिमारीनं.  बैठकीत बोलताना पूर्वीची बोलण्यातील रग आणि आत्मविश्वास कायम होता.  गौरीहर सिंहासने यांनी नगरपालिकेच्या सर्व वॉर्डांतून आपण आपले उमेदवार उभे केले तर आपल्याला कसं यश मिळेल याचा वृत्तांत सांगितला.  

यावर गणपतराव म्हणाले, ''चांगली गोष्ट आहे.  करा की सर्व वॉर्डांतून उमेदवार उभे.  आणू सर्वांना निवडून !''

''आपण त्यांच्या पाठीशी राहावं, असं आम्हाला वाटतं.'' माधवराव जाधव.

''मी आहेच की तुमच्यासोबत.'' गणपतराव.

''सोबत राहून चालणार नाही.  गणपतराव, तुम्ही नेतृत्व करावं या निवडणुकीचं, असं आमचं मत आहे.'' माधवराव जाधव.

''नाही, मला जमणार नाही नेतृत्व करायला.  माझी तब्येत साथ देणार नाही मला.  मी आपला तुमच्यासोबत राहतो.'' गणपतराव.

''आपल्या वॉर्डातून तीन उमेदवार आम्ही निवडले आहे.'' गौरीहर सिंहासने.

''कोण आहेत ते तिघे ? आणि तीन उमेदवार निवडून कसं चालेल ?  चौथाही उमेदवार निवडला पाहिजे ना ?''  गणपतराव.

''होय.  गणपतराव, चौथा उमेदवार आमचा तुम्ही आहात.  तुम्ही नाही म्हणू नका.  तुमच्यामुळं बाकीचे तीन उमेदवार निवडून येतील.'' लिमये.  

''तुमच्यासोबत मारुती डांगे, बारटक्के, रावबा कदम हे उमेदवार असतील.'' शांतारामबापू.

''आई, गणपतरावांना आपण जर परवानगी दिली तर गणपतरावांना निवडून आणतो.'' लिमये.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org