थोरले साहेब - ५६

चव्हाणांच्या या डुबत्या घराला आधार देण्याचं साहेबांच्या मावस बहिणीचे पुत्र शामराव पवार यांनी मनावर घेतलं.  महाविद्यालयीन शिक्षण सोडून सोकरी पत्करली.  साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले.  साहेबांच्या मिरज, कराड येरझारा चालूच होत्या.  कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची उकल करण्याचं काम चालूच होतं.  गणपतरावांकडे मीही काळजीपूर्वक लक्ष देऊ लागले; पण त्यांच्या तब्येतीत काही फरक पडत नव्हता.  भूमिगत चळवळीबद्दल गांधीजींचा गैरसमज करून देण्यात आला होता.  या काळात गांधीजी विश्रांतीसाठी पाचगणीला आल्याचं साहेबांना कळलं.  भाऊसाहेब सोमण यांना आग्रह करून महात्मा गांधींची भेट घेण्यासंबंधीची विनंती केली.  सोमण यांना सोबत घेऊन साहेब महात्मा गांधींच्या भेटीला पाचगणीला गेले.  अर्ध्या तासाची भेट ठरली.  या भेटीत भूमिगत चळवळीबद्दल सविस्तर माहिती भाऊसाहेब सोमण व साहेबांनी महात्मा गांधींना दिली.

या भेटीत महात्मा गांधी म्हणाले, ''या चळवळीच्या सर्व प्रकाराबद्दल मी माझे मत व्यक्त करणार नाही; पण या चळवळीत काम करणारे सर्व जण देशभक्त आहेत हे मी मान्य करतो.  त्यांच्या काम करण्याच्या पद्धती माझ्या पद्धती नाहीत.''  या भेटीत दोघांचे समाधान झाले.  

गणपतराव आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू लागले.  प्रकृतीत म्हणावा तसा फरक पडताना दिसत नव्हता.  एकदा साहेब व त्यांच्यात वाद झाला.  

साहेब त्यांना म्हणाले, ''दादा, मी माझे आवडते काम सोडून घराकडे लक्ष केंद्रित केलं.  तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार करून का घेत नाहीत ?''

यावेळेला गणपतरावांनी थोडं मनावर घेतलं व ते मिरजेस राहावयास गेले.  इकडे १९४६ च्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली.  साहेबांचं नाव चर्चेत आघाडीवर होतं; पण साहेब तयार नव्हते.  कार्यकर्ते नाराज झाले.  कार्यकर्ते गणपतरावांकडे मिरजेला गेले.  साहेबांना समजून सांगण्याची जबाबदारी गणपतरावांवर सोपवली.  साहेबांना गणपतरावांनी धमकावणीच्या भाषेत सांगितलं, ''तुला उभं राहावयाचं नव्हतं तर घराकडं दुर्लक्ष का केलं ?  कशाकरता घराची राखरांगोळी केली ?  ते काही नाही.  तू माझं ऐकणार नसशील तर मीही या दवाखान्यात राहणार नाही.''  गणपतरावांनी साहेबांना निर्वाणीचा इशाराच दिला.  साहेब बंधू व कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर निवडणूक लढवण्यास तयार झाले.  सातारला कार्यकर्त्यांची बैठक झाली.  या बैठकीत साहेबांच्या नावाला कार्यकर्त्यांनी पहिल्या पसंतीची मान्यता दिली.  साहेबांसोबत के. डी. पाटील, व्यंकटराव पवार, बाबुराव गोखले यांना उमेदवारी मिळाली.  प्रचारात गणपतरावांनी हिरीरीने साहेबांचा प्रचार केला.  भूमिगत चळवळीचं कार्य व मित्रमंडळीच्या प्रयत्‍नाला यश आलं.  साहेब या निवडणुकीत निवडून आले.  गणपतरावांनी देहभान विसरून धाकट्या भावाला निवडून आणलं.  या निवडणुकीचा केवळ १५० रुपये खर्च साहेबांना करावा लागला.  हीच ती निवडणूक चव्हाण घराण्याची इतिहासाला नोंद घ्यावयास लावणारी ठरली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org