थोरले साहेब - ५५

साहेबांचे जेलमधील पाच महिने वाचन आणि चर्चेत कसे संपले हे कळलंही नाही.  सरकारनं दिलेलं प्रवासाचं वॉरंट घेऊन साहेब रेल्वेनं कराडला आले.  जानेवारी १९४४ च्या सुमारास साहेब घरी आले.  वर्षभराच्या ताटातुटीनंतर साहेबांना पाहून घरच्यांना आनंद झाला.  गणपतरावही सुटून आले.  त्यांनी व्यापारउदीमाकडे लक्ष दिलं.  पुढे नगरपालिकेचे अध्यक्षही झाले.  सर्व घर आनंदात न्हाऊन निघालं.  गणपतरावांना कारागृहात असताना क्षयाचा विकार जडला होता.  प्राथमिक अवस्थेत असल्यानं बरा होईल असा डॉक्टरांचा कयास होता.  याची आम्ही बाहेर कुठे वाच्यता केली नाही.  दोन-तीन आठवडे साहेबांनी घरच्यांसोबत घालविले.  कार्यकर्त्यांचा राबता चालूच होता.  मीच साहेबांना एक दिवस आपण दोघं फलटणला जाऊन येऊत म्हणून विनंती केली.  साहेबांनी माझ्या विनंतीला मान दिला.  मी व साहेब दोन दिवसांच्या मुक्कामाकरिता फलटणला पोहोचलो.

फलटण येथील मुक्कामाचे दिवस कसे गेले आम्हाला कळलेही नाहीत.  लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढा निवांत वेळ मिळाला मला व साहेबांना.  एकमेकाला समजावून घेता आलं या मुक्कामात.  कराडला परतायची आमची तयारी चालू होती तोच सातार्‍याचे पोलिस अधिकारी प्रतिबंधक स्थानबद्धतेचं वॉरंट घेऊन साहेबांना पकडण्यासाठी फलटणला हजर झाले.

साहेब त्या पोलिस अधिकार्‍याशी बोलू लागले, ''मी प्रथम माझ्या पत्‍नीला कराडला घरी सोडून येतो.  त्यानंतर मी तुमच्या हवाली होईल.  तोपर्यंत तुम्ही माझ्या आजूबाजूला राहण्यास माझी हरकत नाही.''

पोलिस अधिकार्‍यांनी साहेबांचं म्हणणं मान्य केलं.  मी तर पोलिसांचा धसकाच घेतला.  माझ्या डोळ्यांनी अश्रूंना मार्ग मोकळा करून दिला.  साहेब माझी समजूत घालू लागले.  मला वाटलं, मी साहेबांना विनाकारणच आग्रह करून फलटणला घेऊन आले.  साहेब इथं आले म्हणजे त्यांना अटक होते.  या घटनेनं माझं मन खाऊ लागलं.  अशा मनःस्थितीत आम्ही उभयतांनी फलटण सोडलं.  पोलिस पहार्‍यात कराड गाठलं.  साहेब आमचा निरोप घेऊन येरवड्याच्या प्रवासाला निघाले.

या काळात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत दिसू लागला.  अनेक नेत्यांना पॅरोलवर सोडण्यात येऊ लागलं.  साहेबांनादेखील कुटुंबाकरिता पॅरोलवर बोहर येऊन काही करावं असं वाटू लागलं.  तीन महिन्यांनंतर साहेब पॅरोलवर सुटून तुरुंगाबाहेर आले.  दोन महिन्यांच्या अवधीत कुटुंबाला उभं करण्याचा प्रयत्‍न साहेबांनी सुरू केला.  गणपतरावांचा आजार, त्यांच्यावर होणारा खर्च, पुतण्यांचा शाळेचा खर्च भागविताना साहेबांची दमछाक होऊ लागली.

साहेबांनी किसन वीर आबांना मला घराकडे लक्ष देणं किती आवश्यक आहे याची कल्पना दिली.  आबांनी साहेबांना पॅरोलची मुदत वाढून घेण्याची सूचना केली.  साहेबांनी तसा प्रयत्‍न केला.  त्यात त्यांना यश आलं.  गणपतरावांना मिरजेला माधवनगरमध्ये घर करून डॉक्टरच्या निगराणीखाली ठेवलं.  गणपतरावांसोबत त्यांची पत्‍नी व माझी नणंद राहू लागल्या.  खर्चात वाढ झाली.  साहेब मन लावून वकिली करू लागले.  मिळकतही वाढली.  माझा सुखाचा संसार सुरू झाला.  १९४५ ते १९४६ खर्‍या अर्थानं संसारसुख उपभोगलं.  मला दिवस गेले.  माझी मातृत्वाची इच्छा पूर्ण झाली.  आम्ही कन्यारत्‍नाला जन्म दिला.  पण हे सुख जास्त काळ उपभोगता आलं नाही.  माझ्या मुलीला काही दिवसांच्या आतच माझ्यापासून काळानं हिरावून घेतलं.  चव्हाण घराण्याची दुःखांची उतरंड कमी होण्याऐवजी वाढतच चालली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org