थोरले साहेब - ५३

मला पाच-सहा दिवस कराडच्या तुरुंगात ठेवलं.  हळूहळू शहरभर मला अटक केल्याची वार्ता पसरली.  परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून माझी रवानगी इस्लामपूरच्या जेलमध्ये झाली.  या जेलचे देशमुख नावाचे अधिकारी कधी गोड बोलून तर कधी धमकावून साहेबांचा ठावठिकाणा विचारीत.  मधूनमधून दमदाटीही करीत.  'यशवंतराव कुठे आहेत ?' हा त्यांचा प्रश्न आणि त्याला माझं 'मला माहीत नाही' हे ठरलेलं उत्तर.  आणि हे खरंही होतं.  साहेब कुठे आहेत हे मला माहीतच नव्हतं.

माझे थोरले भाया आणि मधले भाया यांचं एकमेकांवर भारी प्रेम.  गणपतरावांना पकडल्यानंतर ज्ञानोबांचं घरात लक्ष नव्हतं.  सारखे बाहेर बाहेर राहायचे.  घरात कुणाशीही मनमोकळं बोलायचे नाहीत.  थोरल्या जाऊबाईही सतत चिंतेत असायच्या.  

एके दिवशी ज्ञानोबा आईला म्हणाले, ''मला असं कळलं की, मी आजारी असल्याचं प्रमाणपत्र जर तुरुंगाधिकार्‍याला दिलं तर गणपतची सुटका होऊ शकते.  माझ्या पाठीवर एक लहानसे आवळू आहे त्याची मी शस्त्रक्रिया करून घेतो.  शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र घेऊन जेलरला देतो व गणपतला जेलमधून सोडून आणतो.''

आई आणि मोठ्या जावेनं याला विरोध केला.  ज्ञानोबा ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.  त्यांनी आपल्या आवळूचं ऑपरेशन करून घेतलं.  आई नाइलाजास्तव दवाखान्यात त्यांच्यासोबत होत्या.  डॉक्टरांनी ऑपरेशन करून अर्ध्या-पाऊण तासानंतर जखमेच्या मलमपट्टीच्या सूचना देऊन ज्ञानोबांना घरी पाठवून दिलं.  घरी त्यांची घ्यावी तशी काळजी घेण्यात आली नाही.  जखम चिघळली.  त्यांची प्रकृती खालावली.  त्यात त्यांना न्युमोनिया झाला.  घरात कुणी कर्ता पुरुष नाही.  मी नुकतीच जेलमधून सुटून आले होते.  मी सतत त्यांच्या जवळ असायचे.  काय हवे ते विचारायचे.  आठ दिवस जीवन-मृत्यूचा खेळ मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत होते.  औषधपाण्याची आबाळ झाली.  आठ-दहा दिवसांत त्यांची जीवनज्योत मालवली.  या प्रसंगाचा माझ्या मनावर आघात झाला.  मी कित्येक तास बेशुद्ध होते.  माझ्या प्रकृतीवर जो परिणाम झाला तो कायमचा.  शांतारामबापूंनी पंधरा दिवसांनंतर ज्ञानोबा गेल्याची वार्ता पुणे येथे साहेबांची भेट घेऊन सांगितली.  तीर्थस्वरूप बंधूचा असा अंत व्हावा आणि त्या वेळी साहेबांना त्यांच्याजवळ राहता आलं नाही याची रुखरुख साहेबांना आयुष्यभर डाचत होती.  माझ्या तब्येतीचीही माहिती शांतारामबापूंनी साहेबांना दिली.  

वेळ सकाळची असेल.  एक कार आमच्या घरासमोर येऊन उभी राहिली.  कारमधून उतरले ते माझे एक जवळचे नातेवाईक.  ते घरात आले.  त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर ते म्हणाले, ''मला साहेबांनी पाठवलं आहे.  आपल्या प्रकृतीची इत्थंभूत माहिती शांतारामबापूंनी साहेबांना सांगितली.  पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरला आपली प्रकृती दाखवून औषधोपचार करण्याचे साहेबांनी ठरविले आहे.  त्यासाठी आपण माझ्यासोबत पुण्याला चलावं.''

मी आईसोबत चर्चा केली.  आईही म्हणाल्या, ''इथल्या उपचारांनी तुला गुण येत नाही, तर पुण्याला जाऊन चांगल्या डॉक्टरला दाखवून परत कराडला ये.''

मी आईची परवानगी घेतली.  माझ्या पाहुण्यासोबत पुण्यास जाण्यास निघाले.  साहेब पुण्यात ज्याठिकाणी राहत असत तिथे आम्ही आलो.  साहेबांनी शहरातील नामांकित डॉक्टरांना मला दाखविलं.  चार-सहा तासांनी मी बेशुद्ध पडत असे.  शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर्सना शर्थीचे प्रयत्‍न करावे लागत.  माझ्या प्रकृतीत तसा काही फरक पडेना.  मग साहेबांनी डॉक्टर्सच्या सल्ल्याने मला फलटणला पाठविण्याचा निर्णय घेतला.  कराडला पाठविण्याबद्दल मी आग्रह धरला तर साहेब म्हणाले,

''कराड येथे घरात कुणी कर्ता पुरुष नाही.  आई एकटीच आहे.  घर संपूर्ण दुःखी आहे.  अशा परिस्थितीत तू माहेरी गेलेली बरी.''  मला साहेबांचं म्हणणं पटलं.  माझ्या एका नातेवाईकासोबत मी फलटणला आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org