थोरले साहेब - ५१

मामाचा जीव भांड्यात पडला.  मामा निवांत झोपले.  घोरपडी रेल्वेस्टेशनवर मामांना त्यांनी उठवलं.  तुम्ही येथे उतरा म्हणाला.  मामांनी तिकिटाचे पैसे त्याच्या हातावर टेकवले.  त्याने मामांना सलाम ठोकला.  त्याच्या सलामाचा स्वीकार करून मामा सुरक्षित पुण्याला पोहोचले.  

१ जानेवारी १९४३ चा दिवस.  ब्रिटिशधार्जिण्यांनी नववर्ष म्हणून साजरा केला.  माझ्या व कोतवाल कुटुंबाच्या लेखी हे वर्ष काळं वर्ष ठरलं.  डिसेंबरमध्ये माझ्या मधल्या दिराला अटक झाली.  साहेब परागंदा झालेले.  त्यांचा काही ठावठिकाणा नाही.  घरात आई हतबल झालेल्या.  गणपतराव एकमेव कमवते.  तेही जेलमध्ये.  घर कोलमडून पडण्याची वेळ आली.  अशा अवस्थेत मोठ्या दिरांनी घराला आधार दिला.  आईला हिंमत दिली.  आम्ही सर्वांनी कंबर कसून या संकटाला समोरे जाण्याचा निर्धार केला.  शिरवडे रेल्वे जळीतप्रकरणी बाबुराव कोतवालांना अटक झाल्याची वार्ता वार्‍यासारखी शहरभर पसरली.  'बुडत्याला काडीचा आधार' तसा बाबुराव कोतवालांचा आधार आमच्या घराला होता.  तोही आता संपला.  बाबुराव कोतवालांचं शाळकरी वय, चव्हाण घराण्याचा वारसा कोतवाल कुटुंबानं पुढे चालविला.  साहेबांनाही शाळकरी वयातच अटक झाली होती.  स्वातंत्र्याची चळवळ कराड शहरात व पंचक्रोशीत तरुणांच्या माध्यमातून चेतवीत ठेवण्याचं कार्य बाबुराव कोतवाल प्राणपणाने करीत.  पोलिसांची करडी नजर त्यांच्यावर होतीच.  साहेबांचा ठावठिकाणा बाबुराव कोतवालांना असतो, असा समज पोलिसांचा झालेला.  गणपतराव व बाबुरावांना अटक केली म्हणजे साहेब आपोआप शरणागती पत्करतील असा पोलिसांचा कयास.  बाबुराव कोतवाल व त्यांच्या सहकार्‍यांवर शिरवडे रेल्वेस्टेशन जळीतप्रकरणी कोर्टात खटला भरण्यात आला.  त्यांना करावासाची शिक्षा झाली.  कारागृहात गणपतराव व बाबुराव कोतवालांच्या छळाच्या कहाण्या कानावर येत.  दोघांनाही साहेबांच्या ठावठिकाणाबद्दल विचारणा करण्यात येत होती.  बाबुरावांना नरकयातना भोगाव्या लागू लागल्या.  त्यांना विवस्त्र करून मारझोड करण्यात येत.  बाबुरावांचे अंग फुटले; पण तोंडून शब्द फुटला नाही.  १७ दिवस यातना सहन करीत राहिले.  शेवटी त्यांना न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावली.  हीच कमी-जास्त हालत गणपतरावांची केली.  साहेबांचा पत्ता या दोघांच्या तोंडून वदवून घेण्यात पोलिसांना यश आलं नाही.

१४ जानेवारी भारतीय संस्कृतीतील स्त्रियांच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचा दिवस.  तिळसंक्रांतीला सुवासिनींना वाण देण्याची परंपरा अनादिकालापासून चालत आलेली.  आईनं सकाळपासून आमच्यामागं टुमणं सुरू केलं - 'अगं, लवकर तयार होऊन विठ्ठल-रुखमाईच्या मंदिरात जाऊन वाण वाहून या... सायंकाळी गल्लीतल्या सुहासिनींना हळदी-कुंकवाला बोलवा... वेणूची पहिली संक्रांत असल्यानं तिची खनानारळानं ओटी भरावयाची आहे... सौभाग्यलेण्याचं सामान मी व ज्ञानोबा बाजारात जाऊन घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही तयारीला लागा...' आई एकामागून एक सूचना आम्हाला देऊ लागल्या.  कोण जाणे, आज मला काही करावंसं वाटतच नव्हतं.  चित्त थार्‍यावर नव्हतं.  मन उदास झालं होतं.  सारखी साहेबांची आठवण येऊ लागली.  साहेब कुठं असतील, कसे असतील याची चिंता मनाला खाऊ लागली.  माझं कशातच मन लागेना.  आई आणि ज्ञानोबा बाजारात गेले.  माझ्या दोन्ही जावा माझ्याजवळ आल्या व मला म्हणाल्या,

''वेणू, चल आपण विठ्ठल-रुख्माईच्या मंदिरात जाऊन वाण देऊन येऊ.''

''नको अक्का.  माझं आज कशातच लक्ष लागत नाही.'' मी.

''असं नको म्हणून वेणू.  तुझी पहिली संक्रांत आहे.  स्त्रीच्या जीवनात पहिल्या संक्रांतीला फार महत्त्व असतं.'' सोनूताई

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org