थोरले साहेब - ४६

मुंबई
९ ऑगस्ट १९४२

प्रिय सौ. वेणू,

माझ्यावर रागवली नसणार असं गृहित धरून माझ्या मनातील घुसमट या पत्रात लिहून मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं करीत आहे.  आपलं लग्न दोऊन दोन महिने लोटले.  नववधू अनेक स्वप्नं मनात घेऊन या नव्या विश्वात रमण्यास येते.  तरुणपणाच्या भावनेचा उन्मेष व्यक्त करण्याच्या ऊर्मी उरात बाळगून काही स्वप्नं रंगवायची असतात याची मला कल्पना आहे.  या भावनांचा विचार न करता, तुला न सांगता-न बोलता मी मुंबईला निघून आलो.  अपराधी मनानं मी हा निर्णय घेतला.  हा निर्णय घेताना माझ्या मनाला काय यातना झाल्या असतील याची तुला कल्पनाही येणार नाही.  तारुण्यातील भावनांनी जर बुद्धीचा ताबा घेतला तर मनुष्य ध्येयापासून दूर जाण्याचा धोका असतो.  मला माझ्या ध्येयापासून दूर करण्यास तू कारणीभूत झालीस असा ठपका तुझ्यावर येऊ नये असं मी ठरविलं आणि पुढेही मी प्रयत्‍न करीत राहीन.  त्यातलाच हा तुला न सांगता मुंबईला निघून येण्याचा माझा निर्णय.  तू माझं हृदय आहे तर स्वातंत्र्य चळवळ माझा श्वास आहे.  श्वास आणि हृदय यांचा समन्वय माणसाला जिवंत ठेवतो.  मला जिवंत राहण्यास श्वास आणि हृदय सारखेच महत्त्वाचे आहेत.  मी दोघांपासून दूर जाऊ इच्छित नाही.

आता थोडं मुंबईतील काँग्रेस महाअधिवेशनासंबंधी... ७ आणि ८ ऑगस्ट या दोन दिवसांत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची दिशा निश्चित झाली.  महात्मा गांधी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्या भाषणांनी अधिवेशनाचा नूरच बदलून टाकला.  'छोडो भारत'ची घोषणा नेहरू यांनी करताच सर्व कार्यकर्ते या घोषणेनं भारावून गेले.  नेहरू, मौलाना आझाद यांच्या भाषणांनी तरुणांच्या मनाचा ताबा घेतला.  सरदार पटेल यांनी संपूर्ण भारतातून आलेल्या प्रतिनिधींचा विश्वास संपादित केला.  अशा या भारावलेल्या नि मंतरलेल्या अवस्थेत मुक्कामाच्या ठिकाणी परतलो.  मध्यरात्र टळून गेली होती तरी त्या झपाटलेल्या वातावरणातच आम्ही वावरत होतो.  सकाळी सकाळी डोळा लागला.  

सकाळी जाग आली ती रस्त्यावरील 'चले जाव', 'करो या मरो' या घोषणांनी.  अख्खी मुंबई रस्त्यावर उतरलेली.  धावपळ, धरपकड, पोलिस आणि जनतेचा पाठशिवणीचा खेळ सुरू झालेला.  वर्तमानपत्र मिळण्याचा दुष्काळ.  कशीतरी एक-दोन वर्तमानपत्रं मिळविली.  रात्रीच राष्ट्रीय नेत्यांना अटक करून शहराबाहेर हलविल्याबद्दलच्या बातम्यांनी वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरलेले.  ९ ऑगस्टची सकाळ क्रांतीला सोबत घेऊन उगवलेली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org