कोल्हापूरात साहेबांना आजाराने घेरलं. चार-दोन दिवस साहेबांनी ताप अंगावर काढला. साहेबांना फणफणून ताप चढला. अंगातलं सर्व अवसान गळालं. आजाराची गंभीरता साहेबांच्या लक्षात आली. कराडला जाण्याचा निर्णय घेतला. आहे त्या कपड्यानिशी साहेब बसने कराडला निघाले. तीन तासांच्या प्रवासात साहेबांना कसलंच भान राहिलं नव्हतं. हातापायात त्राण उरला नव्हता. कसंतरी करून साहेब बसस्थानकावरून घरी पोहोचले. साहेबांना अचानक आलेलं पाहून घरातील मंडळी आवाक झाली. गणपतरावांनी धावपळ करून डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरांनी मुदतीचा ताप असल्याचं सांगितलं. या तापाला पथ्यपाणी व विश्रांती हेच औषध असल्यानं साहेबांना एक महिना घरात पडून राहावं लागणार होतं. फळं आणि फळाच्या रसावर एक महिना काढायचा म्हणजे एक संकटच. पण साहेबांनी हा त्रास सहन केला. डॉक्टरांनी तपासून अजून पंधरा दिवस कराडला राहावं लागेल, असं सांगितलं. शिक्षणाचं हेही वर्ष वाया जाणार असं साहेबांना वाटू लागलं. प्राचार्य बाळकृष्ण यांना भेटून या आजाराबद्दल सांगावं अशी विनंती साहेबांनी गणपतरावांना केली. गणपतरावांनी कोल्हापूरला जाऊन प्राचार्य बाळकृष्ण यांची भेट घेतली. साहेबांच्या आजाराबद्दल सविस्तर कल्पना दिली. जवळजवळ दीड महिन्यानंतर साहेब कोल्हापूरला परतले. सर्वप्रथम साहेबांनी प्राचार्यांची भेट घेतली. आजाराची वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली. प्राचार्यांनी साहेबांना टर्म तर दिलीच दिली; पण त्यांचा परीक्षा फॉर्म विद्यापीठाला पाठविला. साहेबांनी या परीक्षेचं मनावर घेतलं. भुसारी यांच्या वाड्यात राहणारे नानासाहेब आयचित, आनंदराव चव्हाण हेही साहेबांसोबत अभ्यासाला होते. एकदाची परीक्षा संपली. परीक्षेच्या निकालाबद्दल मनात धाकधूक होती. कराड ते कोल्हापूर सारखी दगदग सहन करावी लागली. शेवटी परीक्षेचा निकाल लागला. साहेब चांगले गुण घेऊन पास झाले. साहेबांना आपल्यासोबत अभ्यास करणारे आयचित व चव्हाण पास झाल्याचा आनंद झाला. आनंदराव-चव्हाणांनी विद्यापीठात एक हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमावलं. विद्यार्थीदशेत आनंदरावांबद्दल जो जिव्हाळा निर्माण झाला होता ते शेवटपर्यंत टिकला नाही. पुढे राजकारणात दोघांत मतभेद निर्माण झाले. आनंदरावांविषयीचा विद्यार्थीदशेतला आदर मात्र कायम राहिला. आयचित यांनी शेवटपर्यंत साहेबांना साथ दिली.
१९३५ चा प्रांतिक सरकारे बनविण्याचा कायदा पास झाल्यानं राजकारणानं वेग घेतला. साहेब ज्युनियर बी.ए.ला असताना त्यांना कराडहून मित्रमंडळीचं बोलावणं आलं. १९३७ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका सर्व पक्षांनी लढविण्याचा निर्णय घेतला. नाही, होय म्हणता म्हणता काँग्रेस पक्षानं निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला. साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं. साहेब कराडला आले. मित्रमंडळींची बैठक घेतली. या बैठकीत तरुणासाठी एक तिकीट मागायचं ठरलं. त्याकरिता उमेदवाराची चाचपणी सुरू झाली. जिल्ह्यातील वरिष्ठ मंडळींचा आशीर्वाद असल्याशिवाय हे शक्य नव्हतं. जिल्ह्याचे वरिष्ठ नेते भाऊसाहेब सोमण यांनी भेटून त्यांनी तरुणांच्या पाठीशी उभं राहावं अशी त्यांना गळ घालावी असे म्हणत साहेब व मित्रमंडळ भाऊसाहेब सोमाण यांना भेटले व म्हणाले,
''ग्रामीण भागातील चळवळीमध्ये अग्रभागी असलेल्या एका तरुणाला उभं करावं असा आमचा विचार आहे. त्याला आपला आशीर्वाद हवा.''
सोमण यांनी शांतपणे या तरुणांचं ऐकून घेतलं. घाई न करण्याबद्दल सूचना दिल्या. श्रेष्ठीला ही गोष्ट पचनी पडेल असं मला वाटत नाही, तरीपण मी प्रयत्न करील, असं आश्वासन सोमण यांनी तरुणांना दिलं.
स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सामान्यांतील सामान्य माणूस व श्रीमंतांतील श्रीमंत माणूस सहभागी होता. काँग्रेसमध्ये शहरी भागातून उच्चभ्रू वर्गातील डॉक्टर, वकील ही मंडळी होती. ग्रामीण भागामध्ये जमीनदार व वतनदार वर्ग हा होता. काँग्रेस पक्ष या दोन वर्गामधूनच उमेदवार ठरवीत असे. सामान्य कार्यकर्त्याला वाव मिळण्याचा प्रश्नच नव्हता. साहेबांनी निवडक मित्रमंडळींची बोरगाव इथे बैठक घेतली. सोमण यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती दिली.