थोरले साहेब - ३७

दोघी जावांना दिराची बराच वेळ फिरकी घ्यावयाची होती; पण आई तिथे आल्या आणि साहेबांची सुटका झाली.  आईनं साहेबांना शहरात गेल्यानंतर स्वतःची काळजी घेण्याबद्दल जतावलं.  म्हणाल्या - खाण्यापिण्याची आबाळ करू नको, अभ्यास मन लावून कर, तब्येतीला जप, आम्ही तुला काहीएक कमी पडू देणार नाही...

साहेब कोल्हापूरला शिक्षणाला आल्यानंतर त्यांनी वसतिगृहामध्ये राहायचं नाही असं ठरविलं.  येथील सर्व वसतिगृहे जातवार होती.  साहेबांच्या मनाला जातवार वसतिगृहांची कल्पनाच मान्य नव्हती.  आपल्या मित्राच्या सहकार्यानं साहेब शिवाजी पेठेत राहू लागले.  साहेबांसोबत सत्याग्रही म्हणून विसापूरच्या जेलमध्ये असलेले गांधीवादाचे कट्टर पुरस्कर्ते श्री. अनंतराव कटकोळ या शिवाजी पेठेत राहत असत.  त्यांनी साहेबांना स्वतंत्र दोन खोल्या राहण्यासाठी दिल्या होत्या.  वीर माने हेही साहेबांना मदत करीत असत.

डॉ. बाळकृष्ण हे राजाराम कॉलेजचे प्राचार्य.  कॉलेजचं वातावरण उत्साहवर्धक.  स्वतः डॉ. बाळकृष्ण विद्वान म्हणून प्रसिद्ध होते.  पंजाबमधून इथं आलेले.  त्यांना भेटण्याचा प्रयत्‍न साहेबांनी केला.  साहेबांना भेट मिळाली.  आपल्या आयुष्याची दोन वर्षे स्वातंत्र्य चळवळीत गेली; पण आता मला शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, असं त्यांनी मनमोकळेपणानं सांगितलं.  डॉ. बाळकृष्ण यांनी तू जोपर्यंत अभ्यासात लक्ष घालशील तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी राहील.  हे संस्थानी राज्य आहे.  इथल्या राजकारणात तू अजिबात लक्ष घालू नको, असं बजावलं.  साहेबांनी त्यांना येथील अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत विसापूरच्या जेलमध्ये होते.  त्यांचा माझा चांगला घरोबा निर्माण झालेला आहे हेही सांगून टाकलं.  सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मात्र मी अधूनमधून लक्ष घालीत राहीन.  अर्थात याबद्दल आपली काही हरकत नसेल तर, असे बाळकृष्णांना साहेबांनी सांगितले.  डॉ. बाळकृष्ण यांचा विश्वास साहेबांनी संपादन केला.  पहिल्या वर्षाचा अभ्यास अगदी सोपा होता.  संस्कृत विषय मॅट्रिकला सोडावा लागल्यानं साहेबांनी अर्धमागधी विषय निवडला होता.  या विषयाचा मात्र साहेबांना अभ्यास करावा लागला.

त्याकाळात महाराष्ट्रात कादंबरीकार म्हणून गाजत असलेले ना. सी. फडके साहेबांना तर्कशास्त्र शिकवीत असत.  त्यांची शिकविण्याची पद्धत साहेबांना तर्कशास्त्राची आवड निर्माण करून गेली.  दुसरे शिक्षक माधवराव पटवर्धन.  अतिशय विद्वान शिक्षक; पण ना. सी. फडकेंसारखे विद्यार्थ्यांत प्रिय नव्हते.  उत्तम कवी म्हणून साहित्यजगतात त्यांचा नावलौकिक झालेला.  इंग्रजी विषय प्रभावीपणे शिकवीत.  त्यांचं नावही अर्धे मराठी, अर्धे इंग्रजी 'माधव ज्युलियन' या नावाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये चर्चा असायची.  दुसरे इंग्रजीचे प्रोफेसर बोस.  यांचं शिकविण्याचं कौशल्य साहेबांना हायस्कूलमधील दत्तापंत पाठक यांच्यामध्ये पाहावयास मिळालं.  इंग्रजी कविता शिकवावी ती प्रोफेसर बोसांनीच.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org