थोरले साहेब - २७

साहेबांना सकाळी जाग आली.  प्रथम साहेबांनी खोलीभर नजर फिरवली.  हातापायात बेड्या असलेला एक धिप्पाड कैदी त्यांना दिसला.  उंचापुरा, गोरागोमटा, दाढी वाढलेली अन् अंगात कैद्याचाच पोशाख.... साहेबांनी चाचरतच विचारपूस केली.

त्याने सांगितलं, ''मी तुरचीचा कृष्णा धनगर आहे.''

त्या काळी तुरचीचा तात्या आणि कृष्णा ही जोडी गाजत होती.  त्यापैकीच हा एक.  पुढे कृष्णाची आणि साहेबांची रास जमली.  बाहेरील चळवळीबद्दल साहेबांकडं कृष्णा विचारपूस करायचा.  साहेब त्याला चळवळीबद्दलची हकीकत सांगायचे.  एके दिवशी साहेबांना कराडच्या न्यायाधीशांसमोर उभं करण्यात आलं.  सोबत पांडूतात्या डोईफोडे होतेच.  दोघांवरील गुन्हे वाचून दाखवण्यात आले.  दोघांनी गुन्हे कबूल केले.  न्यायाधीशांनी दोघांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.  कायद्यानं साहेबांना कैदी ठरवलं.

विठाई आपल्या लेकाला भेटण्यासाठी घरच्या सर्व मंडळींसह कराडच्या जेलमध्ये आल्या.  सोबत शाळेतील एक गुरुजीही आले होते.  साहेबांना पोलिस पहार्‍यातच फौजदार कचेरीत आणण्यात आलं. फौजदारासमक्ष आईची आणि साहेबांची भेट होताच आईच्या मातृप्रेमानं डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली.  खेळायचं-कुदायचं वय... त्यात अठरा महिन्यांची सक्तमजुरीची सजा यामुळे आईला रडू कोसळलं.  गुरुजींनी आईला सावरलं.

गुरुजी म्हणाले, ''फौजदार साहेब मायाळू आहेत.  साहेबांनी माफी मागितली तर ते सोडून देतील.''

''काय बोलता तुम्ही गुरुजी ?  कुणाची माफी मागायची ?  काय गुन्हा केला म्हणून माफी मागायची ?'' आई कडाडल्या.

''माफी मागायची नाही.  तब्येतीची काळजी घे''  असे सांगून आई निघून आल्या.  भेट संपली.

पोलिस पहार्‍यात साहेबांना घेऊन रेल्वे पुणे मार्गावर धावू लागली.  वाटेत सत्याग्रही कैद्यांची संख्या वाढू लागली.  पुणे रेल्वेस्टेशनवर उतरतेवेळी सत्याग्रहींची संख्या आठ-दहा झालेली.  सत्याग्रहींना मालमोटारीत बसवून मालमोटार येरवड्याकडे निघाली. येरवडा जेलसमोर मालमोटार थांबली.  सत्याग्रही खाली उतरले.  एक अधिकारी आला.  कागदपत्रांची तपासणी केली.  बाबुराव गोखले यांना थांबवून घेतलं.  बाकीच्यांना मालमोटारीत बसण्याचं सांगण्यात आलं.  परत सर्व जण मालमोटारीत जाऊन बसले.

''यांना कॅम्प जेलमध्ये घेऊन जा'' त्या अधिकार्‍यांनी आदेश दिला.  कॅम्प जेल, येरवडा तुरुंगाच्या मागच्या मैदानाला तारेचे काटेरी कुंपण घालून त्यात तंबूच्या बराकी तयार करण्यात आलेल्या होत्या.  सत्याग्रहींच्या अंगावरील कपडे काढून घेऊन त्यांच्या अंगावर जेलचे कपडे चढवले.  तांब्या, वाटी व एक वळकटी त्यांना देण्यात आली.

कॅम्प जेल, बराक नं. १२ साहेबांच्या जीवनाला कलाटणी देणारं विचारविद्यापीठ.  या बराक नंबर १२ मध्ये साहेबांना प्रवेश मिळाला हे साहेबांचं भाग्य.  या बराक नंबर १२ मध्ये महाराष्ट्रातील नामवंत सत्याग्रही होते.  शालेय महाविद्यालयीन शिक्षण सोडून जे विद्यार्थी या कॅम्प जेलमध्ये आले होते त्यांना बराक नं. १२ मध्ये ठेवण्यात आलं.  असे पाच-सहा विद्यार्थी.  त्यापैकी साहेब एक.  सोबत पांडूतात्या डोईफोडे होतेच.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org