थोरले साहेब - २४

'ज्ञानप्रकाश'च्या कार्यालयात गेल्यानंतर साहेबांनी तेथील कर्मचार्‍याला आम्ही कोठून व कशाकरिता आलो आणि आम्हाला संपादकांना भेटावयाचे आहे, असं सांगितलं.  लहानशा गावातील मुलं संपादकांना भेटायचं म्हणतात, असे म्हणत त्या कर्मचार्‍यानं या दोघांची उपसंपादकांशी भेट घालून दिली.  उपसंपादकांना साहेबांनी आपली ओळख करून दिली.

''अच्छा !  तुम्ही आहात का यशवंत चव्हाण ?''  असं म्हणून तुच्छतेच्या नजरेनं साहेबांकडं बघितलं.  मला वाटलं कुणी पोक्त वयाचे वार्ताहर असतील !  साहेबांनी गौरीहर सिंहासने यांचा परिचय उपसंपादकांशी करून दिला.

म्हणाले, ''ज्याच्या नावानं खोटी बातमी पाठविली ते हेच गौरीहर सिंहासने.''

''आम्हाला संपादक साहेबांची भेट घेता येईल का ?  भेट झाली तर आम्हाला खुलासा करता येईल, खर्‍या-खोट्याची शहानिशा होईल.''  हे साहेबांचं म्हणणं उपसंपादकांना पटलं.  

तेव्हा ते म्हणाले, ''थोडा वेळ बसा. प्रत्यक्ष संपादक काकासाहेब लिमये यांच्याशी तुमची भेट घालून देतो.''

थेड्या वेळानं उपसंपादक हे गौरीहर सिंहासने व साहेबांना काकासाहेब लिमयेंच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले.  साहेबांनी भेटण्यामागचा उद्देश यांच्या लक्षात आणून दिला.  त्यांनी साहेब व सिंहासने यांना बसवून घेतलं.  सिंहासने यांच्या नावानं आलेलं पत्र मागवून घेतलं.  सिंहासनेला एक कोरा कागद दिला.  त्यावर मजकूर लिहिण्यास सांगितलं.  दोन्ही हस्ताक्षरांची खातरजमा करून घेतली व म्हणाले,

''कुणीतरी गैरसमज निर्माण करण्यासाठी हा उपदव्याप केला असावा.  तुम्ही एक खुलासा करणारं पत्र लिहून द्या.  आम्ही त्याला प्रसिद्ध करू.''

काकासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सिंहासने यांनी एका कागदावर खुलासा लिहून दिला.  यथावकाश तो खुलासा 'ज्ञानप्रकाश'नं प्रसिद्ध केला.  स्वखर्चानं वार्ताहर होण्याच्या हौसेचा शेवट साहेबांनी असा केला.  त्या उपसंपादकांनी तुच्छतेच्या नजरेतून साहेबांकडे पाहिलेलं साहेबांना अखेरपर्यंत बोचत राहिलं.

वारणेच्या काठचं बिळाशी हे गाव एकदम स्वातंत्र्य चळवळीच्या प्रकाशझोतात आलं.  या भागातील चाळीस गावांतील पाटील मंडळींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.  सरकारी काम करण्याचे नाकारले.  गणपतराव पाटील आणि बाबुराव चरणकर यांच्या नेतृत्वाखाली जंगम सत्याग्रह फार मोठ्या प्रमाणावर पार पडला.  या पंचक्रोशीतील ब्रिटिश अंमल संपला.  पोलिस यंत्रणेच्या दडपशाहीखाली येथील जनता भरडली जाऊ लागली.  ब्रिटिशांनी या सत्याग्रहाला 'बिळाशीचे बंड' असं नाव दिलं.  या दडपशाहीच्या वार्ता कराडपर्यंत येऊन थडकल्या.  पांडूअण्णा शिराळकरर यांच्या माडीवर एक बैठक झाली.  त्या लोकांचे मनोधैर्य वाढविण्याकरिता दोन कार्यकर्त्यांना पाठविण्याचं या बैठकीत ठरलं.  त्यात साहेब व राघूअण्णा लिमये यांची बिळाशीला पाठविण्यासाठी निवड झाली.

बिळाशीला राजमार्गानं जाणं या दोघांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी आडमार्गानं जायचं ठरवलं.  सोबत गुप्‍त ठिकाणांची नावं दिली.  बिळाशीच्या देशपांडे यांनी या दोघांची व्यवस्था चोख ठेवली.  या भागातील लोक या दोघांना येऊन भेटू लागले.  त्यांना धीर देण्याचं काम या दोघांनी केलं.  देशपांडे यांनी रात्री पारावर बैठक बोलावली.  हळूहळू एका एका घरातून माणसं येऊन पारावर बसू लागली.  विनाविघ्न बैठक सुरू झाली.  या दोघांनी बिळाशीकरांना भरवसा दिला - तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागे पूर्ण जिल्हा उभा आहे.  महाराष्ट्र पातळीवरील नेत्यांनी तुमच्या कार्याची दखल घेतली आहे.  चळवळ जोमाने पुढे चालू ठेवा....

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org