थोरले साहेब - २३

या परिषदेनंतर कराड तालुक्यात वैचारिक घुसळण सुरू झाली.  परिषदेच्या दुसर्‍या दिवशी कार्यकर्ते आपापली मतं सभेच्या कामकाजाविषयी व्यक्त करू लागले.  त्यात दोन प्रवाह दिसून आले.  एक प्रवाह प्रस्थापितांची री ओढणारा होता, तर दुसरा प्रवाह माधवरावांच्या विचारांनी प्रभावित झालेला होता.  मसूरच्या परिषदेत गरिबांचे कैवारी कोण व विरोधक कोण याचा बोध झाला.  आपण स्वातंत्र्य चळवळीत कुठल्या वाटेनं जायचं हे या परिषदेच्या निमित्तानं निश्चित केलं.  साहेब माधवराव बागलांच्या विचारांशी सहमत होते.  ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा रंग देण्याचा काहींनी प्रयत्‍न केला.  साहेबांनी हा प्रयत्‍न हाणून पाडला.  केवळ माधवराव बागल सत्यशोधक चळवळीतून पुढे आलेले असल्याने त्यांचे विचार प्रस्थापितांच्या गळी उतरणे अवघड होते.  साहेबांची या परिषदेत जिल्ह्यातील अनेक प्रभावी कार्यकर्त्यांची ओळख झाली.  ते कार्यकर्तेही साहेबांच्याच विचाराचे होते.  त्यात किसन वीर, आत्माराम पाटील, पांडुरंग मास्तर, गौरीहर सिंहासने इ. साहेब परिषद आटोपून कराडला परत आले.  माधवराव बागलांच्या भाषणांचे पडसाद येथे येऊन पोहोचले होते.  साहेबांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. परिषदेतील कार्याचा इतिवृत्तांत दिला.  कार्यकर्त्यांचे समाधान झाले.  कराड येथील सर्व कार्यकर्ते साहेबांच्या विचारांशी सहमत होते.  

गौरीहर सिंहासने आणि साहेब यांच्या मैत्रीला सुरुंग लावण्याची एक घटना घडवून आणण्यात आली.  गांधी-आयर्विन करारानंतर अनेक राष्ट्रीय पातळीवरचे पुढारी देशभर दौरे करू लागले.  सातारा जिल्ह्यात पंडित मदनमोहन मालवीय यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.  पंडित मालवीय वाई, सातारा, कराड या भागात येणार होते.  कराडला आल्यानंतर त्यांनी कोयन-कृष्णा संगमाला भेट दिली.  गंगाकाठाचे हे पंडित दोन्ही नद्यांचा संगम पाहून हरखून गेले, असा उल्लेख त्यांनी सायंकाळच्या सभेत केला.  पंडितजीनं सायंकाळच्या सभेला आपल्या संस्कृतप्रचुर हिंदीमधून मार्गदर्शन केलं.  सभा सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे एक नाट्यपूर्ण प्रसंग घडला.  या सभेच्या अध्यक्षपदासाठी पंडितजींसोबत पुण्याहून आलेले न. चि. ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांच्या नावाची घोषणा केली.  हा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घेतला होता. कार्यकर्त्यांनी नुकतेच जेलमधून सुटून आलेले भाऊसाहेब बटाणे यांचे नाव सुचवले.  सभेत थोडा वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.  त्यात तडजोड म्हणून या सभेला दोघेही अध्यक्ष राहतील असा मार्ग काढण्यात आला.  सभा यथासांग पार पडली.  पंडितजीनं आपल्या मधाळ वाणीनं श्रोत्यांनी मनं जिंकली.

पुणे येथून प्रसिद्ध होणार्‍या 'ज्ञानप्रकाश' या दैनिकाचे साहेब वार्ताहर होते.  स्वातंत्र्य चळवळीच्या कार्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून स्वतःच्या हौसेखातर, स्वखर्चाने स्वीकारलेली ही वार्ताहराची जबाबदारी साहेबांना चांगलीच महागात पडणार होती.  साहेबांनी वार्ताहर म्हणून या सभेत घडलेला वृत्तांत 'ज्ञानप्रकाश'कडे पाठविला.  अध्यक्षपदावरून जी घटना घडली त्याचाही उल्लेख बातमीत होता.  तीन दिवसांनंतर 'ज्ञानप्रकाश'चा अंक कराडला पोहोचला.  अंक वाचून एकच खळबळ उडाली.  कार्यकर्ते गटागटानं एकत्र येऊन चर्चा करू लागले.  'ज्ञानप्रकाश' नं आपल्या वर्तमानपत्रात बातमीला शीर्षक दिलं होतं 'तात्यासाहेब केळकरांना अर्धे अध्यक्षपद.'  तोपर्यंत ही बातमी कुणी दिली असावी याची चर्चा सुरू झाली.  त्यांना कुणाला साहेब या दैनिकाला वार्ता पाठवितात याची माहिती होती त्यांनी ही घटना साहेबांवर उलटावी म्हणून गौरीहर सिंहासने यांच्या नावे 'असं काही घडलंच नाही' असं 'ज्ञानप्रकाश'च्या संपादकाला पत्र लिहून कळवलं.  'ज्ञानप्रकाश'मध्ये हे पत्र छापून आलं.  साहेबांनी स्वतःहून स्वीकारलेल्या वार्ताहराच्या विश्वासार्हतेलाच आव्हान दिलं गेलं.  साहेबांनी याचा छडा लावण्याचं ठरवलं.  त्यांनी आपले मित्र गौरीहर सिंहासने यांच्याशी चर्चा केली.  सिंहासने असं काही करणं शक्य नाही याबद्दल साहेबांना विश्वास होता.  गौरीहर व साहेबांनी पुण्याला जाऊन 'ज्ञानप्रकाश' च्या संपादकाची भेट घेऊन शहानिशा करण्याचं ठरवलं.  खर्चाचा प्रश्न आला तेव्हा सिंहासने यांनी खर्चाची व पुणे येथील त्यांच्या पाहुण्याकडे राहण्याची व्यवस्था केली.  पुण्याला पोहोचल्यानंतर या दोघांनी 'ज्ञानप्रकाश'चे कार्यालय शोधून काढले.  ते लकडी पूल, फर्ग्युसन कॉलेजमार्गे 'ज्ञानप्रकाश'च्या कार्यालयात पोहोचले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org