थोरले साहेब - २२३

साहेब दिल्लीत पोहोचले ते २१ जानेवारीच्या पहाटे तीन वाजता.  दिल्लीला व देशाला आणीबाणीच्या धुक्यानं घेरलं होतं.  ते धुकं आणीबाणी उठल्यानं विरू लागलं.  स्वच्छ प्रकाश व हवा खेळती झाली.  वातावरण पूर्वपदावर आलं.  लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या.  आणीबाणीचा रोष व्यक्त करण्याच्या संधीची वाट जनता पाहत होती.  जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतातील विरोधक एकत्र आले.  जनता पक्षाची स्थापना झाली.  आणीबाणीच्या काळात काँग्रेस पक्षातील राजकीयदृष्ट्या अपरिपक्व मंडळींनी जो हैदोस घातला त्याचा वचपा जनतेने मतपेटीद्वारा काढला.  काँग्रेस पक्ष पराभूत झाला.  आणीबाणीची देण म्हणून जनता पक्षाचा उदय झाला.  जनता पक्षानं दिल्लीची सत्ता काबीज केली.  काँग्रेसची धुळधाण उडाली.  मोरारजी देशाचे पंतप्रधान झाले.  काँग्रेस लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष ठरला.  साहेबांची काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदी निवड झाली.  मान्यताप्राप्‍त अशा विरोधी पक्षाचे लोकसभेतील स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पहिले विरोधी पक्षनेते म्हणून साहेबांना संधी मिळाली.  विरोधी पक्षनेता म्हणून साहोंनी लोकसभेत आपली भूमिका पार पाडली.

साहेबांनी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी यांच्या सहकार्यानं पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्‍न सुरू केला.  इंदिराजींच्या काळात जो एकाधिकारशाहीचा उदय झाला होता त्याचा परिणाम पक्षाला भोगावा लागला.  सामुदायिक नेतृत्वाची प्रथा निर्माण करावी या विचारानं साहेब आणि रेड्डी जाण्याचा विचार करू लागले.  इंदिराजींनी मनाला वाटेल तेव्हा प्रांताप्रांतांच्या सुभेदारांच्या नेमणुका करावयाच्या व मनात येईल तेव्हा त्यांच्याकडून सुभेदारी काढून घ्यायची या अनिर्बंध अधिकाराला लगाम घालण्याचा विचार पक्षात होऊ लागला.  पक्षांतर्गत लोकशाही व सामुदायिक नेतृत्वाची कास पक्षाला धरावी लागली.

साहेब आणि रेड्डी यांनी पक्षांतर्गत जी भूमिका घेतली त्याचा अर्थ इंदिराजींनी वेगळा लावला.  त्यांच्या एकाधिकारशाही नेतृत्वाला दिलेले हे आव्हान आहे असे वाटले.  सामुदायिक नेतृत्व त्यांच्या राजकीय विचारात बसणं शक्य नव्हतं.  इंदिराजींनी परत एकदा निष्ठावानांना एकत्रित करण्यास सुरुवात केली.  दरम्यानच्या काळात इंदिराद्वेषाने पेटलेल्या जनता पक्षाच्या राज्यकर्त्यांनी इंदिराजींना अटक केली.  दुसर्‍या दिवशी लगेच सोडून दिलं.  या दोन दिवसांत इंदिराभक्तांनी देशभर धुमाकूळ घातला.  काँग्रेस महासमितीचं अधिवेशन बोलावून त्यात इंदिराजींची अध्यक्ष म्हणून निवड करावी अशी मागणी इंदिराजींच्या निष्ठावानांकडून होऊ लागली.  ही मागणी काँग्रेस अध्यक्ष रेड्डी आणि साहेबांनी अमान्य केली.  उलट यूथ काँग्रेसच्या अतिरेकी कार्यामुळं काँग्रेसची सत्ता गेली त्या यूथ काँग्रेसला बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.  जनता पक्षातील राज्यकर्ते आपल्याला व आपल्या मुलाला अटक करतील त्या वेळी काँग्रेस पक्षानं रस्त्यावर उतरायला पाहिजे तसेच आणीबाणीत जी गैरकृत्ये करण्यात आली त्याबद्दल चौकशी झाल्यास पक्ष आपल्या पाठीशी एकसंध उभा राहावा ही अपेक्षा इंदिराजी बाळगून होत्या.  साहेब आणि रेड्डी आणीबाणीतील गैरकृत्याला पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत नव्हते.  उलट पाठिंबा दिल्यास पक्षाची प्रतिमा डागाळेल असं या दोघांचं मत होतं.

९८ मध्ये इंदिराजींच्या पाठिराख्यांनी एक परिषद बोलावली.  या परिषदेवर काँग्रेसजनांनी बहिष्कार टाकावा असं पत्रक साहेब आणि रेड्डी यांनी काढलं.  पक्षांतर्गत लोकशाहीला फाटा देऊन पक्षाला आपल्या गुलामीच्या दावणीला बांधण्याच्या इंदिराजींच्या प्रयत्‍नाला कार्यकर्त्यांनी विरोध करावा असे आवाहन करण्यात आलं.  परिषदेला जाणार्‍यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही या पत्रकात देण्यात आला.  देवराज अर्स यांनी ही परिषद भरविण्याकरिता पुढाकार घेतल्यानं त्यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आलं.  या परिषदेत काँग्रेसमधील बचावात्मक पवित्रा घेणार्‍या नेत्याचा निषेध करण्यात आला व पक्षाला आक्रमक नेत्याची आवश्यकता आहे व ते नेतृत्व इंदिराजीच देऊ शकतात अशा प्रकारची भाषणे या परिषदेत झाली.  इंदिराजींची पक्षाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.  पक्षाला 'इंदिरा काँग्रेस' हे नाव देण्यात आलं.  साम्यवाद, समाजवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद व धर्मनिरपेक्षतावादाला कालबाह्य ठरवून इंदिराजींनी स्वकेंद्रित व्यवहारवादाला राजकारणात जन्मास घातलं आणि त्या यशस्वी झाल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org