थोरले साहेब - २१०

डॉ. झाकिर हुसेन यांच्या निधनानंतर इंदिराजी आणि साहेबांची भेट झाली.  या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात दोघांत चर्चा झाली.  या पदाकरिता योग्य असा उमेदवार निवडण्याबद्दल विचारविनिमय झाला.  उमेदवार कोण असावा याबद्दल दोघांनीही मत बनवलेलं नव्हतं.  १७ मे रोजी कामराज यांनी इंदिराजी व साहेब यांची भेट घेऊन संभाव्य राष्ट्रपतीच्या नावाची चाचपणी केली.  या दोघांनीही ऐकून घेण्याची भूमिका पार पाडली.  कामराज यांनी अध्यक्षपदासाठी नीलम संजीव रेड्डी यांची निवड योग्य राहील असं मत व्यक्त केलं.  नीलम संजीव रेड्डी यांनी इंदिराजी व साहेबांची वेगवेगळी भेट घेतली.  इंदिराजींच्या भेटीत रेड्डी यांनी उभं राहावं, असं मत इंदिराजींनी सूचित केल्याचं त्यांनीच साहेबांना सांगितलं.

इंदिराजींनी १८ जूनला सायंकाळी एक बैठक बोलावली.  साहेबांना बैठकीला येण्याविषयीचं निमंत्रण इंदिराजींनी दिलं.  ठरलेल्या वेळेला साहेब इंदिराजींच्या निवासस्थानी पोहोचले.  तिथे जगजीवनराम, स्वर्णसिंग, फक्रुद्दीन अली अहमद हजर होते.  नीलम संजीव रेड्डी यांची साहेबांसोबत झालेली चर्चा जगजीवनराम यांनी सांगितली.  साहेब आणि कामराज यांच्यात झालेला संवाद जगजीवनराम यांनी इंदिराजींच्या कानावर घातला.  इंदिराजींनी गिरी यांनाही अंधारात ठेवलं नाही.  माझा कुणी उमेदवार नाही.  विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाला चालेल असा उमेदवार निवडावा असं सर्वांचं म्हणणं होतं.  इंदिराजी जपानच्या दौर्‍यावर गेल्या असताना इकडे सिंडिकेटवाल्यांनी नीलम संजीव रेड्डी यांना विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्‍न सुरू केला.  

उमेदवार निवडीच्या प्रक्रियेनं वेग घेतला.  दिल्लीत सुरू झालेली उमेदवार निवडीची लढाई आता बंगलोरच्या काँग्रेस अधिवेशनात पोहोचली.  १० जूनला काँग्रेस अधिवेशनाला सुरुवात झाली.  काँग्रेस अध्यक्ष निजलिंगअप्पा हे नीलम संजीव रेड्डी यांची निवड निश्चित करण्याच्या प्रयत्‍नाला लागले.  इंदिराजींनी पहिल्या दिवशी अधिवेशनाला हजेरी लावली नाही.  त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय आर्थिक धोरणात बदल करण्यासंबंधात एक टिप्पणी फक्रुद्दीन आली अहमद यांच्यामार्फत चिटणीस सादिक अली यांच्या हवाली केली.  या टिप्पणीतील धोरणाची चर्चा कार्यकारिणीत अग्रक्रमानं व्हावी असा आग्रह धरण्यात आला होता.  काँग्रेस पक्षातील तरुण तुर्क म्हणून ओळखल्या जाणार्‍या खासदारांनी एक दहा कलमी आर्थिक धोरण ठरविणारा कार्यक्रम पक्षाकडे पाठवून पक्षाच्या आर्थिक धोरणात त्याचा समावेश करावा असा आग्रह धरला.  यात चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत, आर. के. सिन्हा आणि चंद्रजित यादव यांचा समावेश होता.  प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण, नफ्यामध्ये कामगारांचा हिस्सा, औद्योगिक परवाना पद्धती क्रांतिकारक बदल, निर्यातीचं राष्ट्रीयीकरण व जमीन सुधारणा इत्यादी.

इंदिराजींनी ही टिप्पणी अध्यक्षाच्या नावे न पाठविल्यानं त्या टिप्पणीचा विचार करता येणार नाही असा निर्णय निजलिंगअप्पांनी घेतला.  काही सदस्यांनी ही टिप्पणी स्वीकारावी असा आग्रह धरला तर बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळं पक्षाला तडा जाईल असं मत स. का. पाटील यांनी व्यक्त केलं.

साहेबांनी इंदिराजी आणि सिंडिकेट यांच्यातील वादाला मुरड घालणारा एक मसुदा तयार केला.  त्यात इंदिराजींनी दिलेल्या टिप्पणीतील मुद्द्याचा मोठ्या चातुर्यानं मसुद्यात समावेश केला व सिंडिकेटमधील व्यक्तींनी आर्थिक धोरणात जे दोष दाखवले होते त्याची दखल घेऊन एक स्वतंत्र असा आर्थिक धोरणाचा मसुदा तयार केला.  इंदिराजी, मोरारजी व अन्य सदस्यांसोबत चर्चा केली.  या मसुद्याला या मंडळींची संमती घेऊन तो कार्यकारिणीपुढे मांडला.  ११ जुलैला या राष्ट्रीय आर्थिक धोरणाच्या मसुद्याला कार्यकारिणीनं मान्यता दिली.  दोन्ही गटांचं समाधान झालं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org