थोरले साहेब - २०९

साहेबांचं मन त्यांच्या विचारकार्याचा गाभा आहे.  'जिथे कुठे संगम होत असेल, मग तो दोन नद्यांचा संगम असेल, दोन विचारांचा संगम असेल... या संगमानं हजारोंचे जीवन सुसंपन्न होईल.  माणसामाणसांमध्ये असा संगम निर्माण झाल्यास त्यांचं जीवन उजळून निघले.  राग, ईर्षा, स्पर्धा, शत्रुत्व, द्वेष या संगमात विरून जातील आणि जीवनात नितळ प्रवाह निर्माण होईल. हे प्रवाही जीवन राष्ट्रउभारणीचं कार्य करील.'

हा विचार साहेब सतत राजकारण करीत असताना करीत असत.  मग यातून त्यांच्याविषयी अनेक गैरसमज निर्माण होत असत.  राष्ट्रपतींच्या निवडणुकीत साहेबांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना अनेकांनी 'कुंपणावरचे' म्हणून संबोधिले; पण साहेबांची पक्षावरील निष्ठा कुणी लक्षात घेतली नाही.  त्यांच्या मनातील संघर्षाचा वेध घेण्याचा प्रयत्‍न केला नाही.

अप्पासाहेब लबडे या कवीची कविता एका कार्यक्रमात साहेबांनी वाचून दाखविली.  कविता अशी -

''वाटांनी स्पर्धा खेळावी
वाटांनी वाटांना अडवू नये
थकल्या वाटेला आपल्यात सामावून घ्यावे
जुनीपानी भुतं मिरवणार्‍या वाटांच्या वाटेस मुळी जाऊ नये
एकमेकांना घेऊन वाटांनी क्षितिज गिळून घ्यावे...''

माझ्या मनात राजकारणाविषयी जे काही होतं ते मी माझ्या परिभाषेत मांडण्याचा प्रयत्‍न करीत आलोय.  या कवीनं माझ्या मनातील विचार कवितेच्या रूपानं मांडले आहेत.  मी राजकारणात याला 'बेरजेचं राजकारण' म्हणतो.  याच मार्गानं जाण्याचं साहेबांनी निश्चित केलं.

फरिदाबाद काँग्रेस अधिवेशनातील भाषण त्यांच्या मनातील राजकारणाचा आविष्कार मानावा लागेल.

साहेब या अधिवेशनात म्हणाले, ''आपण फुटीरपणाच्या राजकारणाला थारा देता कामा नये.  निंदानालस्ती या विचारापासून राजकारण दूर ठेवले पाहिजे.  वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्याचं टाळावं.  शीलावर शिंतोडे उडविण्याच्या विचाराला फारकत द्यावी.  निश्चित असं धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्याचं वचन देऊन जनसेवा करूया.  या मार्गानं गेल्यास देश व लोकशाही समाजवाद स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतील याबद्दल माझ्या मना कुठलीच शंका नाही.''

काँग्रेसच्या मूलभूत ध्येयधोरणाच्या विचाराने भारावलेल्या कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करावी.  त्यांच्या माध्यमातून काँग्रेसची तत्त्वे व विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत असा विचार साहेब सतत करीत असत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org