थोरले साहेब - २०६

अवघ्या दहा मिनिटांत दिल्लीला बातमी येऊन धडकली.  सरकारनं संत फत्तेसिंग यांची मागणी मान्य केली.  संत फत्तेसिंग यांनी आत्मदहनाचा बेत रहित केला.  ही पीटीआयची बातमी वाचून साहेब अस्वस्थ झाले.  साहेबांनी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन लावला.  'सत्य काय घडलं ?' म्हणून विचारणा केली.  मुख्यमंत्री मुसाफीर प्रत्यक्ष येऊन भेटतो व सविस्तर वृत्तांत तुम्हास देतो म्हणाले.  

मुख्यमंत्री गुरुमुखसिंग मुसाफीर हे दिल्लीला साहेबांना भेटावयास आले.  

साहेबांनी मुसाफीर यांना विचारलं, ''मी फोनवर तुम्हाला काय सांगितलं ते तुम्हाला बरोबर ऐकू आलं ना ?'' साहेब.

''होय, मला स्पष्ट ऐकू आलं; पण त्यांना सांगताना मी वेगळंच सांगितलं.'' मुसाफीर.

''अहो, पण असं असत्य सांगून प्रकरण अधिक चिघळणार नाही का ?''  साहेब.

''आता तसं काहीही होणार नाही.  आमच्यात जे राजकारण चालतं त्यात असंच वागावं लागतं.'' मुसाफीर.

''संत फत्तेसिंग पुन्हा काही कुरापत काढून प्रश्न निर्माण करणार नाहीत का ?''  साहेब.  

''आता पुन्हा संत फत्तेसिंग या भानगडीत पडणार नाहीत याची मी तुम्हाला हमी देतो.''  मुसाफीर.

''आपण ज्या पदावर आहात त्या पदाकडून मला अशी अपेक्षा नव्हती.'' साहेब.  

''पंजाब प्रांताला या संकटातून पार करण्याकरिता माझ्यासमोर याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.  तुम्हाला माझं जे काही करायचं ते आता तुम्ही करू शकता.''  मुसाफीर.  

या प्रकरणातून एकदाची पंजाबची आणि साहेबांची सुटका झाली.  

नेहमी करते तसा यावर्षीचा साहेबांचा वाढदिवस मी साजरा केला.  राजकीय धामधुमीतही साहेबांनी वेळ काढला.  इंदिराजी, '१, रेसकोर्स' या बंगल्यावर येऊन साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मोठ्या आत्मीयतेनं देऊन जात असत.  या वाढदिवसाला मात्र त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात मला पत्र लिहून साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org