थोरले साहेब - २०२

यावर इंदिराजी चकार शब्दही बोलल्या नाहीत.  साहेबांची भूमिका कळल्यानंतर इदिराजींनी पंतप्रधानपदाची निवडणूक लढविण्याचं जाहीर केलं.  मोरारजी आणि इंदिराजी यांच्यात नेतृत्वासाठी निवडणूक होणार हे निश्चित झालं.  साहेबांनी आपली भूमिका मोरारजींना कळविली.

म्हणाले, ''मी इंदिरा गांधींसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.''

इंदिराजी निवडून आल्यावर त्यांनी मोरारजींना उपपंतप्रधानपद व अर्थ खातं दिलं.  गृहमंत्रीपद गुलझारीलाल नंदांकडेच ठेवण्यात आलं.  दोन वेळेस हंगामी पंतप्रधान राहूनही पंतप्रधानपदाची संधी आपल्याला दिली गेली नाही त्यामुळे नंदा दुखावले.  त्यात उपपंतप्रधानपद काढून घेऊन केवळ गृहमंत्रीपद देऊन आपली बोळवण करण्यात आली अशी नंदांची भावना झाली.      

साहेबांना भारतीय आत्मीयता काय असते याचं दर्शन संरक्षणमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालं.  भारतालाही साहेबांच्या रूपानं एका हिंमतवान, कर्तृत्ववान, राष्ट्रनिष्ठावान सुपुत्राची ओळख झाली.  साहेब कोचीनला नाविक दलाची प्रात्यक्षिकं पाहण्याच्या कार्यक्रमास जात असताना वाटेत मुंबईत मुक्काम झाला.  मुंबईत येताच त्यांची प्रकृती अचानक बिघडली.  डॉक्टरच्या सल्ल्यानुसार साहेबांवर तत्काळ शस्त्रक्रिया करणं निकडीचं ठरलं.  तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली साहेबांवर अल्सरसंबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली.  मुंबईत साहेब विश्रांतीसाठी थांबले असता मीही मुंबईला पोहोचले.

साहेबांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची बातमी वर्तमानपत्रांनी दिली.  भारतभर या बातमीला प्रसिद्धी मिळाली.  संगीतार्चा छोटेलाल 'मजहर' यांच्या वाचनात ही बातमी आली.  साहेब या आजारातून बरे व्हावेत म्हणून त्यांनी देवाकडे याचना केली.

शुद्ध हृदय से आज आप से ।
विनती करता हूँ भगवान ॥
शीघ्र स्वस्थ हो चौहान ।
हो प्रसन्न यद दो वरदान ॥
यह है सच्चा भक्त देश का ।
दीन जनों का प्यारा है ॥
ऐसे जन का संकट हरना ।
यह कर्तव्य तुम्हारा हैं ॥

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org