थोरले साहेब - १९५

रशियाचे संरक्षणमंत्री मेलिनोव्हस्की हे अध्यक्ष क्रुश्चेव्ह यांच्या जवळचे आहेत याची साहेबांना कल्पना होती.  लष्करी मदतीच्या बाबतीत भारतीय लष्करी अधिकारी आणि रशियन लष्करी अधिकार्‍यांची बोलणी मदतीच्या दिशेने सकारात्मक होऊ लागली.  साहेबांनी ज्या ज्या मागण्या रशियाच्या संरक्षणमंत्र्यांसमोर ठेवल्यात त्याची पूर्तता करण्याची तयारी रशियाने दर्शविली.  मिग-२१ विमाने व त्याच्या उत्पादनासाठी कारखान्याला लागणारी संपूर्ण मशिनरी मिळणार होती.  इतर साहित्य कुठलीही अट न घालता देण्याचं रशियानं मान्य केलं.  अमेरिकेतील कामगिरी निराशाजनक ठरली.  त्याची कसर साहेबांनी रशियातील भेटीत भरून काढली.  

साहेबांची आणि रशियन राष्ट्रप्रमुख क्रुश्चेव्ह यांची भेट ९ सप्टेंबर १९६४ ला झाली.  या रशियनप्रमुखानं भारताचं लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी मोलाची मदत केली.  रशियन पानबुडी, युद्धनौका साहेबांना दाखविण्यात आली.  साहेब जगातील पहिली व्यक्ती असावी की, ज्यांना हा सन्मान मिळाला.

शेवटी साहेबांकडे पाहून क्रुश्चेव्ह म्हणाले, ''मला भारताला हितकर मदत करून इतर राष्ट्रांपेक्षा वेगळं स्थान द्यावयाचं आहे.  आपण आमचे आवडते मित्र आहात.  आपल्याला मदतीचे झुकते माप देताना कदाचित मला महाग पडेल याची कल्पना नाही.  आपल्यासारखे सर्वोत्तम नेते याठिकाणी आहेत त्यांना उल्हासित ठेवावं लागले अन् तेही पडेल ती किंमत देऊन.''  क्रुश्चेव्ह मनमुराद हसले व साहेबही त्यांच्या हास्यात सामील झाले.      

चेकॉव्ह, टॉलस्टॉय आणि मॅक्झिम गोर्की या आधुनिक महामानवाच्या स्मारकस्थळांना साहेबांसोबत आम्ही भेटी दिल्या.  बोल्गाग्राडला भेट दिल्यानंतर युद्ध काय असतं याची कल्पना आली.  बुखाटेक या कलावंतानं आपल्या कुंचल्यानं दुसरं महायुद्ध साकारलेलं आहे.  हा कलाकार प्रथम सैनिक आहे व नंतर कलाकार.  दुसर्‍या महायुद्धात प्रत्यक्ष रणभूमीवर शस्त्र चालवून तेथील रक्तामांसाचा चिखल तुडविलेला आहे त्यानं.  युद्धात लढता लढता तो गंभीर जखमी झाला.  पुढे त्याच्या हातून ही कलाकृती नियतीला निर्माण करावयाची होती म्हणून तो वाचला.  

साहेबांना निरोप देताना हा उमदा बुखाटेक कलाकार म्हणाला, ''युद्ध काय असतं हे कुणीही दुर्लक्षिता कामा नये.  येथून पुढे तर नाहीच नाही.''

रशियासोबत झालेल्या लष्करी कराराची माहिती साहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवली.  पंतप्रधान लालबहादूर शास्त्री नाविकदलासाठी रशियाकडून सहकार्य घेण्याच्य निर्णयाबद्दल ठाम नव्हते.  त्यापूर्वी साहेबांनी ब्रिटिश सरकारसोबत सल्लामसलत करावी अशी इच्छा शास्त्रीजींनी व्यक्त केली.    

नोव्हेंबर १९६४ ला साहेब ब्रिटनला रवाना झाले.  ब्रिटनचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांच्यासोबत लष्करी साहाय्य मिळविण्याच्या अनेक चर्चेच्या फेर्‍या झाल्या.  या खलबतातून साहेबांना हे जाणवलं की, ब्रिटिश सरकारला भारताला लष्करी साहाय्य करण्यापेक्षा भारताची लष्करी गरज काय आहे हे जाणून घेण्यातच जास्त रस आहे.  हेरॉल्ड विल्सन आणि माऊंटबॅटन यांच्यासोबत अनेक चर्चेच्या बैठका झाल्या; पण हे सरकार निश्चित असा निर्णय घेऊन स्वतःला बांधून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हतं.  क्लेमंट ऍटली यांनी साहेबांच्या सन्मानार्थ जेवण दिलं.  तिथे ही प्रदीर्घ चर्चा झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org